Monday, March 30, 2020

सदाफुली

        सदाफुली

पुष्पवाटीका ती फुललेली
व्रुक्ष तरु अन् नाजूक वेली.

रुपगंध अगणित रंगांनी,
अंगांगी नक्षी सजलेली.

कुठे दरवळे धुंद मोगरा
कुठे सुखावे कुंद हासरा

नाजूकसाजूक जुई सायली
कुठे मालती फुलवी फुलोरा.

सुवर्णचंपक तो घमघमता
निशिगंधाची सुगंधऋजुता

गेंद गुलाबी पीत टपोरे
प्राजक्ताची नम्र सहजता.

परंतु दारी बिनवासाची
सदाफुली ही आली कोठून

कुजबुज झाली,सूर उमटला
अहो त्वरेने टाका उपटून!

फिकट कुसुंबी देह शहारे
सदाफुलीचा विझला चेहरा

गंधहीनशा आयुष्याचा
प्रश्न टोचला आत बोचरा.

परि अचानक सूर व्रुद्धसा
घुमला तेथे अनामिकाचा.

ओळख पटली सदाफुलीला
अर्थ कळाला अस्तित्वाचा.

" वसंत येता फुलणाऱ्यांनो
  एवढेच रे असूदे ध्यानी

 शिशीर शैत्यता साहून फुलते
 सदाफुली ही नित्य, ईमानी.

झडता वठता अन् गारठता
खतपाण्याविण कितीदा रुसता!

ऋतुचक्रांतील मोजून महीने
येता जेव्हा, तेव्हा हसता.

सदाफुली ही चाकरमानी
रोज नव्या आशेने फुलते

नव्या कळ्यांची जपुनी स्वप्ने
विसंबुनी वाऱ्यावर झुलते.

फुलणे हा निजधर्म फुलांचा
असो केतकी वा कोरांटी

येता बहरां, सर्वही सुंदर
भेद, तुलना या निरगाठी!"
   
                         . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...