Thursday, March 12, 2020

मराठी

मराठीस मरणकळा?
विचारांती हे बरळा!

जोवरी रवी चंद्र कळा
तोवरी तिज प्रसवकळा.

वय वर्षे शतसहस्त्र
शारदीय धवलवस्त्र

पांघरुनी मिरवितसे
बुक्क्याचा भाळी टिळा.

गहन गद्य, स्फुरित पद्य
नाट्यछटा ललित ह्रद्य.

विश्वरुप दावितसे,
आदि अंत तीच मध्य...


केशवसुत सुनित गात
होनाजी, शुभ प्रभात.

फंदी फटका घुमतो
रामजोशी कवन गात.

दीपस्तंभ कुसुमाग्रज
रविकिरणी काव्यकुंज.

अगणित नभी नक्षत्रे
गदिमा प्रकाशपुंज.

त्या शांता कोकीळशा
शालीन स्वर ऋजु भाषा.

बहिणाई बोल चढे
अहिराणी उन्मेषा

गुढगुंजन जीए, ग्रेस.
"तें" चा तो नाट्यवेष.

पुलकित जन पु.ल.स्पर्श
नाट्यगीत उधळी हर्ष.

विंदांचे कर दानी
महानोर आबादानी.

मधुरस्निग्ध बोरकर
तपोपूत सावरकर.

सारस्वत गोकुळात
दंग रंगी शब्द संग.

विरहगीत गाई कुणी
मुक्त मत्त कुणी विहंग.

अर्थ झरे तो पान्हा
प्राशिताच शब्दांना.

अम्रुत जरि स्वर्गीचे
मत्कंठी उतरेना

नित्य नवा दिन आम्हास
मराठीच श्वास ध्यास

संतकाव्य आश्रयास
सर्व कला पदी निवास.

आंग्ल जरी ज्ञानकोश,
मराठी, विचारकोष!

स्फुरणाला अनुवादी
तोच मुळी आत्मदोष.

पहा मनोदर्पणात
खोटे जर हे भाषण.

माय तीच! तिच्यातून
जगताचे मग दर्शन.

                       . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...