Wednesday, March 11, 2020

झुला


झुले पंचमीचा झुला,उडे पाखरू पोटात ,
आणि होऊनिया गाणे,आले माझ्या ओठात.

झोका गेला उंच नभा,थोडी भीती थोडे हसू,
का गं नयनांत पाणी?सुखाचे तेनको फसू.

गेले औचित्य सरोनी,आता कृत्रिम झोपाळा,
मनीं शैशव स्मृतींचा,झुले,फांदीला हिंदोळा.

झोका इथे वर्तमानीं,भिडे उंच भविष्याला,
मागे खेची भूतकाळ ,खेळ अखंड चालला.

झोका दिला कुणी कोणा?दिसे पावलांची खूण,
सय आली उगी सये,मन गेले शहारून.

झुले पंचमीचा झुला,किती खेळला रंगून,
आली सासरची हाक,खेळ गेला कि भंगून!

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...