चतकोर चंद्र आणि
चांदण्या या एक दोन
कवितेच्या पानावर
आणि असणार कोण?
चतकोर चंद्र,तोही
हळू हळू झुरे,विरे
एका काळरात्री त्याचा
काही मागमूस नुरे
ऊतू गेल्या चांदण्यांत
नभ होई वेडेपिसे,
पूर्ण चंद्रबिंब त्याला
मनातल्या मनी दिसे.
मग पुन्हा चंद्रकोर
रात येई गिरवित
कले कलेने आकाश
पुन्हा चंद्र मिरवित.
दूर चंद्रमौळी घर
खेळे थंडगार हवा
दोन गारठले देह
आणि विझू विझू दिवा.
पोटातील अवसेला
भाकरीचा चंद्र हवा.
नको कोरडा श्रुंगार,
नको चांदण्यांचा थवा.
No comments:
Post a Comment