Monday, May 19, 2025

एकांत

 एकांताच्या वाटांवरती 

कधी निळाई आणि हिरवळ..

कधी शून्य शब्दांची मैफील

आठवणींचा दुरुन दरवळ.


कधी स्वप्नचंद्रांच्या पुनवा

कधी मंदसा एक काजवा

कधी नव्या आशेचा रुजवा

सुखदुःखाचा कधी ताजवा .


कधी बाभळी माळावरची

अन् छाया त्या निवडुंगाची.

कधी हासरी जुई सायली

पायी मखमल प्राजक्ताची.


कधी गच्च मेघांच्या खाली 

फक्त उकाडा पाऊस नाही.

कधी धुंद धारांचे नर्तन,

मनी गारवा पेरत जाई.


वेळ स्वतःला पारखण्याची

स्वयं प्रकाशे लुकलुकण्याची.

विलंबित तालातील बंदीश

स्वतः स्वतःशी गुणगुणण्याची.


देऊन जाते बरेच काही,

थोडी आशा फुलण्यासाठी 

घेउन जाते वचने काही

पुन्हा नव्याने लढण्यासाठी .


                      .🍃 संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...