फुंकरीने चेतवी रे,
आतला निद्रिस्त वन्ही,
दे शलाका भेट त्यांना
पेरला अंधार ज्यांनी।
साहूदे ते तेज उजळो
जीव आता झगमगोनी,
कोंडलेला श्वास वाहो
बंध सारे सोडवोनी।
म्लान रानी सळसळूदे
आज हिरवी पर्णभाषा।
क्लांत भाळी उमटूदे रे
ती उद्या ची भाग्यरेषा।
वठून गेली स्वप्नशाखा
अंकुरावी हीच वांच्छा,
पुष्पराशींच्या परागां
भ्रुंगव्रुंदांची प्रतिक्षा।
प्रार्थना! आकाशवेडे
पंख दे तू पाखरांना,
म्रुगजळातून पार ने त्या
धावणाऱ्या लेकरांना।
साचल्या साऱ्या सलांचे
बांध फोडी,वाहू दे।
जाचल्या ज्या दुःखबेड्या
त्या सुटोनी जाऊ दे।
कोवळ्या किरणांत काही
कल्पनांना न्हाऊ दे।
ओवळ्या ओठांस आता
सूक्त सोज्वळ गाऊ दे।
मंगलांचे मन्मनी मंजुळ
आता स्वर झरो।
किल्मिषांच्या काजळीची,
काळजातील खूण विरो।
.🍃संतोष
No comments:
Post a Comment