घन वरुषावा, घन वरुषावा,
अन् पुन्हा ऋतू मनी हरुषावा
या रुक्ष कोरड्या जगण्याला
लवलवता नव अंकुर यावा..
घन वरुषावा....
पाऊसधारा,भिजला वारा
ते गीत जुने फिरुनी गाती
हा राग जुना पण उपज नवी
तो गुणगुणती हिरवी पाती.
तो रंग सावळा विरघळूनी
जनमनांत श्रावण बहरावा
घन वरुषावा....
ही तहानलेली मनहरणे
पळतात मृगजळा पाहोनी..
त्यां भरकटल्या वाटांवरती
हो नितळ जळाचा शिडकावा..
घन वरूषावा...
हे जग लहरी,ना तू सखया..
ऋतू येता येशी नेमाने...
ही तप्त उन्हे अन तप्त मने
त्यां उरी भेटशी प्रेमाने.
ही ओसंडून वाहे सरिता
अन् वाटा उदरी घेताहे,
तो बोल तुला का लावू मी
करतो मानव ते भरताहे.
तू युगायुगांचा रहिवाशी
तुज कसा पाहुणा म्हणवावे ..
हे चक्र फिरे,परि दान उरे,
ते तृप्त मनाने वेचावे.
तू जलदाता, जीवनदाता
तो प्रेमळ कर शिरी असू द्यावा.
घन वरुषावा...
.🍃 संतोष
No comments:
Post a Comment