Monday, March 9, 2020

गळे



ते स्वरांचे पंख लेऊन,
इंद्रधनुचे अंग होती.

चौकटीतच रांगणार्या,
पाखरांना रंग देती.

खेचुनी त्यांनी धरेवर,
आणली तारांगणे.

अन् श्रुतींच्या चांदण्यांनी
भारली ही अंगणे.

कोणी भिक्षा मागुनी,
संन्यस्त,त्याची लाज नाही.

अन् स्वयंभू मंदिरे जी,
त्यांस त्यांचा माज नाही.

दृश्य ज्यांना दर्शने,ते
सूरप्राशी हंस झाले.

की स्वरांच्या नागिणींनी
नादजहरी दंश केले?

विव्हळती अजुनी सुखाने,
विद्ध ज्यांची अंतरे.

शब्द होती कोकीळा,अन्
धुंद तरती अत्तरे.

रिचवुनी आकंठ प्याले,
ऊर्ध्व त्यांची ती दिशा.

नकलुनी त्या ,मद्यमार्गी,
मुर्ख हे,झाली दशा.

आज येथे पंडितांचे
पसरती गोतावळे,

प्राण केवळ शोधती परि
अमृताचे ते गळे. 

                 .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...