Monday, March 9, 2020

प्रतिभा

ऋतुचक्रांतील प्रसवपळांचे
हिशेब कसले कसल्या नोंदी?

बहुप्रसवा ती माता प्रतिभा
तिमिरतनुवर प्रकाश गोंदी.

भोग भोगुनी असे योगिनी
जन्म देऊनी पुन्हा कुमारी

ते अनुभवणे तिचे जसे की
वीज शिरावी नेणीवकुहरी.

जाणीव तिजला कसे म्हणावे?
पुर्णपणे जी उमलत नाही.

शब्द अक्षरे वरि भिरभिरती
अर्थ रसाला बिलगत नाही!

ती का राही कलेत केवळ?
चहुबाजुंनी तिची प्रभावळ

गेल्यावरती निघून कळते
तिचा पसरता प्रसन्न दरवळ.

ती चिमणीच्या चार्यामधुनी
 वात्सल्याची खूण दावते

किंवा अवखळ पोरापाठी
लाज सोडुनि मुक्त धावते.

तिला न सीमा लिंग वयाची
पुरुषालाही बनवी माता.

रुक्षरानटी मनातसुद्धा
प्रीत पेरते जाता जाता.

छे! हे भलते! ही का प्रतिभा?
तीला हवी ती स्वप्नपिपासा!

अन् द्रुश्यांची गुढगुंजने
कळण्यासाठी काव्यमिमांसा!

जे न उमटले स्पष्टपणे ते
सर्वच काही धूसर नसते

 संकेताने कळते कोणा
कुणी चिकित्सा करुन फसते.

                            . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...