कवितेने अलगद यावे,
गुज स्वप्नांना सांगावे,
प्रतिभेचे थेम्ब जपोनी,
शब्दांचे मोती द्यावे.
कवितेने मखमल व्हावे
,
त्या श्रावण वाटांवरची.
घन गहिरी
साद टिपावी,
त्या सागरलाटांवरची.
कवितेने व्हावे घोडा,
तो अबलख बालपणीचा.
अन मुक्त स्वैर
फेकावा,
गगनाच्या फोडून काचा.
कवितेने सांत्वन व्हावे,
त्या गहिवरल्या डोळ्यांचे.
मग हळव्या कातरवेळी,
मायेचे अस्तर द्यावे.
कवितेने दर्पण व्हावे,
मन माझे मीच
पाहावे.
मग तेच करुनिया
साक्षी ,
मौनाचे अमृत प्यावे.
No comments:
Post a Comment