Thursday, March 12, 2020

पक्षी


ऋतू ग्रीष्माचा ,सूर्य भडकला ,पर्णहिनशा वृक्षीं,
शीर्ण जाहल्या पंखांसंगे कुणी टेकला पक्षी .

कुणी पांथस्ते,पुसिले त्याला ,कोण,कुठून तू आला ?
कुतूहल पाहुनी त्याचे ,खग तो ऐसे त्यासी वदला....

" म्हणशील वेडा पक्षी का ह्या ग्रीष्मामाजी पळतो ?
शीतल राने, वा उद्याने सोडूनि येथे जळतो?

याच तरुवर बांधून घरटे मम् माता पितरांनी,
चोच चोचीने घास आणुनी ,वाढविले या रानी.

मातृवृक्ष हा माझा म्हणुनी,नेमे येथे येतो .
बालपणीच्या आठवणींतून उगाच थोडे रमतो .

भविष्य या वृक्षाचे मित्रा, मजला नाही ठावे !
वठेल किंवा फुटेल पल्लव ,तुटेल अथवा घावे.       

वेडा अथवा पिसा म्हणो कुणी,फरक मजला तेणे,
जोवरी पंखी उडण्याचे बळ,तोवर येथे येणे  .“

परदेशी पांथस्था ऐसे ,बोलुनी उडुनी गेला,
शैशव स्मरुनी ,वाटसरूही ,मग थोडा घुटमळला .

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...