Thursday, March 12, 2020

अनुभव


अनुभवास येई जे त्यां,मी सत्य म्हणू का भास म्हणू?
तर्कबलाने सिद्ध होईना,म्हणुनी त्यां,आभास म्हणू?

कर्म विपाकाच्या सूत्रांतून, आणि कवींच्या मिथ चित्रांतून,
हृदय स्पंदनी,भक्तजनांच्या,नित श्वासांतून,अन गात्रांतून!

कर्मफलांचे वर्तुळ मोठे,म्हणुनी 'दर्शन' वाटे खोटे,
कुणा कळेना स्पष्टपणे,ते,कुणा पटेना,प्रचितीवाचून.

आस्तिक नास्तिक ह्या तर संज्ञा ,उकल घडे जैसी ज्या प्रज्ञा,
बुद्धी गज सम हाले,चाले,'अहं'माहुते करता आज्ञा.

अनंत धारा पचवून ,रिचवून,सार तयांचे मनीं सामावून ,
अखंड वाहे हि सत सरिता,नेई काळ प्रवाह हि वाहून .

पुरे तमाशा ,सवंग बाता,शब्द तुणतुणे,तोडू आता.
हसणे ,रडणे,हुकमी रुसणे,स्वतःच फसणे,फसवू जाता.

स्वतःस पडल्या प्रश्न कंटकी,स्वतःस जखमी केल्यावाचून,
ये मिळोनि,उत्तर औषध ,विज्ञानातून वा धर्मातून.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...