Monday, March 9, 2020

चिमणा चिमणी.

एक चिमणी,उडवत वेणी,
अंगणी माझ्या दिसे.

गाली गोबर्या फुगे फुगा
अन् लगेच खुदकन् हसे.

एक चिमणा,गोजिरवाणा,
अंगणी माझ्या बसे.

काळे,भोळे,रोखून डोळे,
अबोल काही पुसे.

चिमणा,चिमणी तेथे पाहून,
आले बुलबुल,पक्षी धावून.

फेर धरुनी खेळ रंगला,
अंगण गेले स्वरांत न्हाऊन.

खिडकीमधल्या थकल्या नेत्री,
कौतुकभरले हसे.......(१)


चिमण ओठीचा मिळता पापा,
झिणझिणला देहाचा खोपा.

विरली तगमग,फुलला चाफा.
अडखळल्या समयाच्या टापा.

घरभर भरले चंदन चांदण
सौख्याचे कवडसे.......(२)


चिमणचोचीला चिमणा चारा,
दूर दिसे तो दाखवू तारा.

विसरुन सारा विश्वपसारा,
बालस्वरांतून निथळो पारा.
..
चित्र उद्याचे कुणी सांगावे?
नसेल अंगण,चिमणी गावे,

चिमण्यांचेही होऊन रावे,
शोधीत जातील दुरची गावे.

लोभस या चित्रांचे उरतील,
घट्ट,स्मृतींतून रंगठसे....(३)


                     .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...