Thursday, March 12, 2020

रात्र.(1)


देत तमाची चाहूल ,रात्र सांज पावलांनी,
भरे  काळोखाचे झाड  ,नभी चांदण फुलांनी ,

रात्र काळीं,रात्र भोळी, टिळा चांदव्याचा भाळीं
रात्र सुंदर सावळी,साऱ्या दिशा कुरवाळी.

रात्र स्वप्नांना अंकुर,रात्र कल्पना गोपुर,
रात्र अंधाराची साय,भिजे चांदणे टिपूर .

रात्र निजल्या डोळ्यांची, रात्र भिजल्या दवांची,
पेंगुळल्या पाखरांची . रात्र शिणल्या जीवांची

रात्र जागत्या धुनींची, तपी तपत्या मुनींची
रात्र विरही मनांची  ,रात्र आतुर क्षणांची.

रात्र नव्हे भयकारी,नव्हे वासना विखारी,
रात्र अद्भुताचा रस ,प्राशी मन निर्विकारी.

रात्र शांततेचा डोह,पोही मन,मीन होय.
रात्र डोळियांच्या डोळी,पाही मन,लीन होय.

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...