Monday, March 9, 2020

दिवस आणि रात्र

दिवसांचे खग टिपून उडाले
दाणे घटीका, तासांचे.

आकाशातून चांदणजाळे
रात्र फेकते भासांचे.     

खरे कोणते स्वप्न कोणते?
कुंठीतप्रज्ञा स्तब्ध जाणते!

कविकल्पना म्हणती कोणी
हेतुपुरस्सर कुणी नेणते.

दिवसांच्या साक्षीला डोळे
रात्रीसाठी मानस भोळे.

संध्याराणी मधेच खेळे
थवे चालले मासांचे.          (१)


मिटता डोळे द्रुश्य विरघळे
मनांतरीचे पाश मोकळे.

पुन्हा सकाळी तेच आवर्तन
तेच निरंतर ,परि वेगळे!

प्रत्येकास्तव विश्व निराळे
तरि गणगोती गोवू मेळे.

कोणी चकले कोणी हुकले
कोणी थकले, मिटले डोळे.

दचकुनी पुन्हा,उठती पळती
कळप गाठती त्रासांचे.              (२)

पूर्णविराम इथे भेटेना
मेल्यावरही स्म्रुती सुटेना

अल्पविरामी स्वल्प सांडले
दंडविधानी खूण पटेना

कंसामधले धूसरधुरकट
किल्मिष काही दूर हटेना

गाठोड्यातून शिल्लक क्षुल्लक!
गालबोट उपहासांचे.                 (३)

अचूक स्वतःला जे ओळखती
पुन्हा नव्याने नच धडपडती.

कधी कुणास्तव मनी न कुढती
हळू धीराने सुमार्ग चढती

उथळ उसासे अथवा उत्सव
उपेक्षुनि निजस्वरुपे घडती

त्या न गौरवून कुतर्की कुजणे
अनुमोदन दुस्वासाचे!               (४)


                          . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...