Friday, August 14, 2020

भाष्य

जाईजुईच्या कोमल कविता

वेलींवरती नाही उरल्या.


बाभूळकाटा निवडुंगांनी

मनामनातील जागा भरल्या.


पुळचट पौरुष सज्जनतेचे

सर्जनतेला कोण विचारी? 


जरा विखारी दिमाख दावी

तोच पुढारी, तोच विचारी! 


करपून गेल्या स्वातंत्र्याचा

फक्त कोळसा उरला हाती


कीती उगाळा शून्य परिणीती

करतल काळे, कष्ट! फजिती! 


कशास यात्रा महापुरुषांच्या

कशास शपथा छाती ठोकून.


शब्द पुरेसा, का अवडंबर

काय मिळाले कविता घोकून?


गजबजलेली गर्दभगर्दी

दिव्य तयांची गायनशाळा.


रसिकजनांची अंगतपंगत

सहिष्णुतेचा मनी उमाळा.


कर्तुत्वे जी थोर खरोखर

मुकपणाने करत निर्मीती.


खळबळ होते डबक्यांमधुनी

दर्दुरचित्ती कर्दमप्रीती!


भरकटलेली भुंकभाषणे

कोण कुणाचे तोंड धरावे?


मनी चिडावे?गप्प बसावे?

रोज लढाई! रोज हरावे?


मौनाच्या डोहावर थिजला

निब्बरतेचा तवंग काळा


हंस उडाले मोरही गेले

छद्ममुनीश्वर उरला बगळा.


तेवत ठेवा दीप चिमुकले

घ्रुत श्रद्धेचे नित्य मिळूदे.


अग्निहोत्र खंडित ना होवो

खंडितबुद्धी त्यात जळूदे.


सूर्यकिरण सम सात्विकतेचा

तेजोमय सहवास घडावा.


संतचरणरज सौभाग्याने

कुश्चळ काळा कली झडावा.


                            . 🍃संतोष

Lessons

In midst of fire,

sweating with desire,

We plan to hire,

Someone to fetch pleasure.


In tides of sorrow,

When path is narrow,

We try to borrow,

boat of happiness.


Life is a mess,

lacks easyness,

more or less,

it's just a perception!


Try hard like a hell,

still u may fail,

But don't ever tell,

That you lost the game!


Success waits at corner,

Experience we can garner.

Still you've to be  learner,

Lessons are plenty,time is less!


            .🍃 $antosh

साई.

एखाद दुसरी कफनी,

पाच घरं भिक्षा.


पडकी मशीद,हेच देऊळ,

भक्ती हीच दिक्षा.


दोन धर्मज्योतीतूनी 

प्रज्वलित धुनी.


ऐसा साई पथदर्शी,

वंदू मनोमनी.


सोनेमाती नाही केला,

भेद जयाने,

 

भारंभार सोने त्याला,

करोडोंची दाने.


जावा लेकों,करा गर्दी,

दावा दंभ दाने,


साई शोधे भिक्षा,

दिली जैसी बायजाने.


                  .🍃संतोष

Tuesday, August 11, 2020

वारी (हिंदी )

नया बसेरा,नया सबेरा,

जहाँ रुके बस,लगता डेरा.


जुबान बोले विठ्ठल विठ्ठल, 

नामसुधा की बरसे धारा. 


कौन मुसाफिर?या बंजारे? 

ये तो वैष्णव भाई हमारे!


कहे माऊली हर यात्री को, 

पंढरपूरकी राह सिधारे. 


शतको बिते,अविरत चलते, 

हरिगुन गाते और गंवाते.


ज्ञानेश्वर जय, तुकाराम जय!

धुन में नाचे,और नचाते.


भेद नही,ना तेरा मेरा,

सब कुछ उस विठ्ठल ने घेरा!


अहंभाव सब पिघलही जाता 

जब इक दुजेके पद छूता. 


'रामकृष्णहरी' मंत्र सुनाते 

हर दिन उत्सव पर्व मनाते.


सिर पर तुलसी,गले मे माला

अभंग,ओवी,अमृत प्याला!


मुक्त पवन सी ये रसशाला 

वारी का ये रूप निराला.


नर नारी और नन्हें बालक 

सबका विठोबा है प्रतिपालक!


भंवरे आये, या मधुमक्खी 

खुली पंखुडी इन फुलोंकी.


चमकधमक,खाली पैमाना, 

चकाचौंध में खो ना जाना. 


अगर तुम्हे हैं रस को पाना 

एक दफा, वारी में जाना.


                                   .🍃संतोष

पाऊस बोलका.

झिम्माड झिम्माड झालं गं सई, 

पाऊस बोलका थांबत नाही! 


किती ही बडबड, तुषारांची ही लड!

मुर्दाड! दारात उभाच बाई!

पाऊस बोलका थांबत नाही.. 


खिडकीत टपून, पाहतो वाकून 

खोचला पदर तसाच राही, 

पाऊस बोलका थांबत नाही.. 


दारांच्या फटींशी,कड्यांच्या मुठींशी, 

थेंबांच्या टिपऱ्या खेळत राही,

पाऊस बोलका थांबत नाही.. 


निथळे मालती,पाहते खालती, 

शहारे शेवंती, जाई नि जुई.

पाऊस बोलका थांबत नाही.. 


पानांत थेंबोळे,सरकती पागोळे 

आकाशाचे तळे आटत नाही? 

पाऊस बोलका थांबत नाही.. 


आता ये मनात, स्मृतींच्या बनात.

तिथे काही कुणी हटकत नाही.

पाऊस बोलका थांबत नाही..


झिम्माड झिम्माड झालं गं सई,

पाऊस बोलका थांबत नाही...

पाऊस (ललित लेख )

   पाऊस

ऋतू बदलला की सृष्टी बदलते, नवं रुप घेते. मग सृष्टीचा अविभाज्य भाग असलेला माणूस आणि त्याचं मन  हेही बदलत असलं पाहिजे.नाही का? 

आठवतोय पहिला पाऊस? 

कसा येतो बरं.... 

उन्हाच्या झळा असह्य होत असतात,घामानं नको नकोसं झालेलं असतं. न राहावून पुटपुटत असतो आपण...

आज काय गरम होतय नाही? 

पटकन पिकल्या केसांचं कुणीतरी म्हणून जातं,पाऊस येणार बहुतेक आज !

आणि तसा तो येतोही, आमंत्रणाची वाट पाहात असल्यासारखा!

लहानपणी पहिला म्हणून भिजायची मुभा घेऊन येणारा, हवाहवासा वाटणारा पाऊस आता अनोळखी राहिलेला नाही, पण त्याची पुरती ओळख झाली असंही म्हणता येत  नाही.

त्यामागचं कमी दाब, मोसमी वाऱ्यांचं शास्र आता माहित झालं असलं तरी थोडा वेळ तरी ते विसरून लहान मुलांच्या अनिमिष डोळ्यांनी पाऊस भोगावा असं वाटायला लागतं..

पाऊस हा फक्त डोळ्यांनीच नाही तर सर्वांगाने,पंचेंद्रियांमार्फत अनुभवण्याचा विषय आहे.

झरझर झरणाऱ्या सरी हवेत रेघा मारल्यासारख्या, क्षणभराचं आपलं  अस्तित्व मातीशी एकजीव करून टाकतात आणि कस्तुरी अत्तरात मिसळल्यासारखा तो सुगंध नाकावाटे थेट मेंदूचा ताबा घेऊन टाकतो.

पावसात जाण्याचं कितीही टाळलं,तरीही हातांच्या तळव्यांना निदान ओंजळभर तरी पाऊस झेलावा वाटतोच आणि ज्या श्रद्धेनं एखादा वैष्णव 'विष्णोपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं 'म्हणून तीर्थ प्राशन करेल त्याच श्रद्धेनं ती ओंजळ ओठाला लावावीशी वाटते.

पावसाचं वय किती ?कुणाला माहित? पण प्रत्येकाबरोबर पाऊस त्याच्या वयाचा होतो आणि त्याच्या अनुभवसृष्टीतला भाग नव्हे तर एक सुहृद बनून जातो. 


लहानपणीचा ये रे ये रे पावसा किंवा सांग सांग भोलानाथ म्हणताना अनुभवलेला पाऊस, 

थोडं मोठं झाल्यावर ओहोळ, नाल्यात कागदाच्या होड्या सोडताना अनुभवलेला पाऊस.

कुमारवयात पावसावर  केलेल्या,  त्यावेळी उत्कट वगैरे वाटलेल्या अल्लड कविता, वहीच्या मागच्या पानांवर लिहिताना साक्षी असणारा पाऊस, 

अडनिड्या वयातली पावसाच्या लयीबरोबर वाढणारी श्वासांची लय स्वतःच्या संततधारेत विरघळवून टाकणारा पाऊस, 

कॉलेज मध्ये चित्रपटांमधला पाऊस प्रत्यक्षात अनुभवतोय अशी स्वप्ने कधी कधी दिवसासुधा पहायला लावणारा पाऊस. 

लग्नानंतर येणारा प्रेमात चिंब भिजलेला पहिला पाऊस, 

दुपटी भिजवणारा दुसरा किंवा तिसरा पाऊस, 

आणि डबा घेऊन रोज कामाला जाणाऱ्या चाकरमानी माणसासारखा कधी मधी रजा घेत पण नेमाने येणारा पाऊस.

उतारवयात कधी कंटाळवाणा, संधिवातामुळं नकोसा झालेला,तर कधी अचानक वाफाळत्या चहाबरोबर चिरतरुण होत जुन्या आठवणींचे तुषार अंगावर घेताना शहारलेला पाऊस.

पाऊस हा अंतहीन आहे.

बाहेर थांबला तरी आत बरसून जातो आणि, 

बीज पेरल्यासारखा आपला एक ओला थेंब ठेऊन जातो, 

वर्षभर जपण्यासाठी! 

परत भेटण्यासाठी!


                                .🍃संतोष

Thursday, August 6, 2020

रामलला हम आयेंगे

*रामलला हम आयेंगे* 
*मंदिर वही बनायेंगे* 



सब मिलकर ये गायेंगे 
उत्सव पर्व मनायेंगे.

रामलला हम आयेंगे 
मंदिर वही बनायेंगे....|धृ |

अब वो पुराने दाग मीटेंगे 
संशय, भ्रम के मेघ छ्टेंगे 

सगुणरूपमे फिरसे हमारे 
रामलला जी खुद बैठेंगे..

रामलला तुम आस हमारी 
राह तकी कितनोने तुम्हारी 

शतको बिते,थी लाचारी 
फिरसे उठी गर्दन ये हमारी. 

अब न रुकेंगे अब न थमेगे 
यही गीत दोहरायेंगे.... 

*रामलला हम आयेंगे,* 
*मंदिर वही बनायेंगे.*

केवट आये,दर्शन पाये 
शबरी मिठे बेर खिलाये 

लछमन सीता हो हमसाये 
पवनपुत्र चरणोंमे गाये. 

मर्यादा पुरुषोत्तमजी के 
गुन मे हम खो जायेंगे. 

*रामलला हम आयेंगे* 
*मंदिर वही बनायेंगे.*

जब तक सुरज चांद गगन मे 
रामलला के चरण अवध मे. 

गरिमा के इस मंगल पथ मे 
डह न जाय, कोई अपने मद मे 

तना हो सीना लेकिन नत हो 
यही सूत्र अपनायेंगे.

*रामलला हम आयेंगे* 
*मंदिर वही बनायेंगे......* 

🙏🙏🍃🌸🌷🌸🍃🙏🙏

                             .🍃संतोष

तू

ओसाड वैराण,निराशेचा माळ 
तेथ तू वेल्हाळ,तृणफुल.

गदगदा हालते,आयुष्याचे झाड 
दृढ माझे खोड,मुळे तुझी.

केस पिंजारून,येते काळरात, 
इवल्या दिव्यात,वात तुझी. 

प्रसूती होताना, प्राणांतवेदना, 
तेथ स्वर तान्हा,साफल्याचा. 

अचकट विचकट,गर्दी रासवट 
तेथे डोळे धीट,तुझ्या बळे. 

उंच सप्तकात,स्वरांचे प्रपात 
षड्ज पंचमात,तूच सुप्त 

जीवनाचा ठेका,चालला लयीत
ताल अनाघात,तुच तेथे. 

अस्तित्व दावीशी,असे रात्रंदिशी 
आम्हाला हवीशी,तर्कतृष्णा 

तर्कांचे भोंवरे,तेथ मती फिरे 
पैल ते हाकारे,ऐकु नेदी 

सामोरी ठाकते,रोज ते चैतन्य 
आम्ही दृष्टिहीन,अंधभक्त. 

आता सांजवेळी,झुकुदे डहाळी 
तुझी तूच माळी,गळा फुले.

                                . 🍃संतोष

निःशब्द

निःशब्द तळ्याच्या काठी, 
मी झाड चिंब भिजलेले.

निःशब्द धरेच्या पोटी 
मी बीज पुन्हा रुजलेले. 

निःशब्द आता हा वारा 
डोंगरापलीकडे निजला. 

स्वप्नात हळू हुळहुळला  
त्यां हरिततृणांचा शेला.

निःशब्द कोटरी पक्षी 
पंखांत खुपसुनी चोची 

भवताली ती न्हालेली 
अन पिले पर्णपाचूंची.

निःशब्द शब्द सुचताना, 
जंव शिशु स्तनी लुचताना. 

मौनात षड्ज घुमताना, 
त्या फिक्या हरकती ताना.

निःशब्द तृप्तता सारी, 
नभ नीलार्द नयनी भोगे, 
 
ते सांगून झाले अवघे, 
जे होते कथनाजोगे.

तो जाईल पाऊस आता 
त्या दूर देशीच्या गावा. 

मी वेळूच्या गात्रांचा 
तो मंतरलेला पावा.

                               .🍃संतोष

Thursday, July 30, 2020

बरगद दादा

     बरगद दादा

बरगद दादा गांव के बुढे 
खफा हैं,कहते,यूं मुंह मोडे, 

'नहीं खेलने कोई आता 
पंछी भी रुख मोडे जाता.' 

बेबस और बेचैन बडे है 
इसी बात पें यूंही अडे है.

उमर है कितनी,कौन बताये
किसे बिठाके साल गिनाये? 

लंबी मुंछे हवा पें डोले 
कहते,खेलो इनपे झुले!  

धूप लगे तो छांव दिलाते 
हवा के झोंके लोरी गाते...


चिंटी,तितली,किडेमकौडे  
सबका घर हैं बरगद दादा 

ढिलेढाले तेवर है और  
जीवन इनका सिधा साधा.

नभ की निली चादर ओढे 
बतियाते हैं तेज पवन सें 

कभी पुरानी यादे लेकर 
करे गुफ्तगु अपने मनसे.

ऐसे मेरे बरगद दादा, 
जरा हटिले,लेकिन प्यारे!

झुरियां जैसे, पहने गहने, 
जड से जुडे है सिर पें सितारे !

                               .🍃संतोष

Wednesday, July 29, 2020

स्वगत

आकाशाच्या निळ्याशार तबकात रुईचा कापूस पिंजून ठेवावा तसे हे मेघांचे पुंज.

निळ्या नभांगणावर निरनिराळ्या नक्षींच्या रेखाकृतींनी रांगोळ्या रेखाटणारे..
का,
व्यवहारशुन्य विद्वत्तेच्या व्यासंगाप्रमाणे व्यर्थ, रिक्तपणाचे पांढुरके अस्तित्व दाखवणारे?

वाऱ्याच्या अद्रुष्य कुंचल्यातून स्वतःतच निरनिराळ्या आक्रुत्यांचे आभास अवकाशात तयार करणारे..
का,
विखुरलेल्या ठिपक्यांमधुन पाठशिवणीचा खेळ खेळणारे आणि पकडल्यानंतर एकमेकांशीच एकरूप होऊन जाणारे?

आकाशाची खोळ उसवून हा निसर्ग नावाचा पिंजारी कसले विलक्षण आणि विचित्र खेळ खेळत असतो नाही?

आपल्या पक्षी हा निरर्थकाचा
विभ्रमविलास निव्वळ!

ना तिथे गर्भार स्त्रीच्या जडशीळ पावलांप्रमाणे पर्जन्य कुशीत जपुन हळूहळू येणारे सावळमेघ आहेत,

ना प्राची किंवा संध्येच्या रंगखुणा..

ना निशेचा चांदणचुऱ्यात चमचमणारा नक्षत्रनखरा.

तरीही या निरर्थकतेत काहीतरी जादू आहे नक्की, नजर खिळवून ठेवणारी.

ते काही असो, माझ्या आयुष्यातील चार क्षण त्यांनी शुभ्रधवल केले एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.

 *वलयांकित अभ्रांचा विभ्रम*
 *विरळ वायुच्या करांत खेळे.*

*निरर्थकांच्या भासआक्रुत्या*
*पिंजुन पडती कापुसगोळे!*

*पाठशिवणीचा खेळ खेळता*
*विस्कटली वाऱ्यावर वस्त्रे.*

*जलदांनो जा मुक्तपणाने*
*रेखाटत झुलणारी चित्रे !*

                             . 🍃संतोष

Tuesday, July 28, 2020

सावन

नभ पिघलासा, घन पगलासा,
सावन मे खेले ये होली!

ये रस बरसा, जो था तरसा ,
वो तृप्त हुआ, मन का माली.

नवकुसुमित फुलोंकी गालोंको
चुमे नन्हीं बुंदनिया,

वो महक उठी, सौंधी खुशबु
माटीपर छनकी पैजनियां?

ये कविता की, पुस्तक से निकले,
शब्द दूरसे तकते है,

अब तो ,सावन के, कुछ टुकडें
खिडकी के बाहर दिखते है!

वो मोर पपिहें, यादोंकी
बादल मे खोये गुम से हुएं,

और छत पे बजते थे ताशें,
बूंदोंके, वो भी थम से गएं.

ये समय समय की बात है
लेकीन,अब भी सावन गाता है!

मीठा मल्हार भले न सही,
ईक धुनकी मस्त लगाता है

वो सूर उसका है ज्यों के त्यों!
जो मिल जाये तो क्या कहना!

महसूस करें भीगे पल को,
हर बात जरुरी है कहना?

                                   .🍃संतोष

Saturday, July 25, 2020

मौनाचा जोंधळा

मौनाचा जोंधळा झाला लाही लाही
तेव्हा जगा झाली जाणीव ती काही.

परि पुढे ठाके नित्याचा बाजार
होता दर भाव पुरता बेजार.

बरे होते जुने अव्यक्त जीवन
मुठीतला जीव अबोधसे मन.

मातीत रुजलो असतो भिजलो
खोल कुशीमधे असतो निजलो

तिथेही वेदना आहेच सोसणे
परि नवा जन्म!अंकुर फुटणे.

किंवा घरोट्यात रिती होता मूठ
सोडून आकार निराकार पीठ.

त्रयस्थ द्रुष्टीने दोन्ही एक व्यथा
एक एकांताची दुजी जनकथा.

जन्म सृजनाचा,मृत्यू वारी भूक!
कोणासाठी खेद, कोणाचे कौतुक?

सारी तत्वज्ञाने, वांझेची अपत्ये
जन्म,भूक,मृत्यू हीच तीन सत्ये.

                                 . 🍃संतोष

मुरलीमाधव


हळुवार फुंकरीमधुनी
तो कृष्ण स्वरांसम वाहे
जी निर्मळ अंतर्बाही
ही मुक्त बासरी आहे.

लालस ओठाची शय्या
तिजसाठी ही स्वरमाया
ते नादब्रह्म कवळाया
आतुर ही मुरली आहे.

जो निर्गुण अन निःसंगी
जो भोग भोगता योगी
त्याचे चित् यौवन भोगी
ही मुरली राधा आहे.

ते गुंजन इंन्द्रियरंध्री
अद्वैती लागे तंद्री
नर नाही,नाही पुरंध्री,
तो मुरलीमाधव आहे.
.........

तो नाद गोकुळी घुमता
गोपींची तुटली ममता
नादाशी हो समरसता
ही कृष्णभुलावण आहे.

ती भूमि गोपजनांची
अन प्रीती सरलमनांची
ती कदंबछाया वनीची
स्मृतिगंधीत केशव आहे.

तो उद्धव दिङ्मुढ झाला
अन कृष्णामृत हे प्याला
तो आतून गोपी झाला
हे  ज्ञान सुकोमल आहे.

ही स्वयंसिद्ध अभिलाषा
ही निखळ प्रीतीची भाषा
नच आशा येथ निराशा
हे भाग्य सुगंधित आहे.

आणखीन सुचलेल्या काही ओळी....


वारी (2020)

यंदा वारी झाली नाही
विठूस बोले ती रखुमाई.

शांत कसा रे, नेम मोडला
तुला काही का वाटत नाही?

विठू म्हणे तुज दिसले नाही?
पुंडलिक अन श्रावण काही?

हजार लाखों पाय चालले
उत्तरेकडे उत्तर शोधत.

आषाढीच्या आधी यंदा
वारी माझी झाली बाई!

वो बात कहाँ

नर्म हाथोंकी बात,
गर्म होठोंमे कहाँ?

शर्म जो कह सके वो
बात अदाओंमे कहाँ?   ।१।

सब्र के छांवतले,गम जो पले,
वो खालिस!
गिलेशिकवोंकी मेहमाँको ये
एहसास कहाँ?           ।२।

बूँद की किश्तमे,उनको मिली है,
ये बारिश।
जिनको बादल है मिला,
बात वो, छिंटोंमे कहाँ?    ।३।

शाम ढलते ही, डरे लोग
जलाते है दिये।
चांदनी रात की, वो बात,
उजालोंमे कहाँ?     ।४।

खुद को जिंदा दिखाने के लिये ,
सज रही लाशे,
मौत को आँख दिखाये,
यहां औकात कहाँ?  ।५।

हुआ संतोष मुझे,
आईना पाकर ऐ दोस्त!
खुदका चेहरा दिखे,
बडी इससे यहां ,बात कहाँ?  ।६।

                                .🍃संतोष

तूच

समईची ज्योत शुभ्र
त्यात निळी झाक तुझी।

धेनुव्रुंद भरकटता
वेणुस्वरे हाक तुझी।

नेत्रदले दोन परि
चित्ती चित्र एक तुझे।

क्रुष्णवर्ण अभ्रपुटे
नीलाकाश रुप तुझे।

नाजुकशा सुमनांगी
अरुपाचा गंध तूच।

नादलुब्ध गोकुळात
रासमग्न धुंद तूच।

रेखीव त्या रांगोळ्या,
भरताना रंग तूच।

कमलदली गाभ्याला
लुचणारा भ्रुंग तूच।

वियोगात मिलनाची
बीजरुप आस तूच।

मेघांच्या झाकोळी
चपलेचा भास तूच।

गोपींच्या निजरंगी
रंगुनी श्रीरंग तूच।

भोगुनीया बाह्यसुखे
अंतरी निःसंग तूच।

भिरभिरत्या पंखांना
कोटरी विश्रांती तूच।

थकलेल्या डोळ्यांना
निद्रेतील शांती तूच।

सळसळत्या पात्यांचा
संगरी आवेश तूच।

सलत्या भलत्या जखमा
निरवित निःशेष तूच।

सुखदुःखे शीतउष्ण,
तू गौरी क्रुष्ण तूच।

म्रुत्यू उत्तर देता,
भिडणारा प्रश्न तूच।

मुंगीच्या धडपडत्या
पाऊलात जिद्द तूच।

हपापल्या प्रगतीला
रोखण्यास हद्द तूच।

गहिवरला नेत्र जसा
पतितांचा मित्र तूच।

परि दांभिक दैत्यांना
कुरुक्षेत्री शस्त्र तूच।

थरथरत्या हातांना
चिमुकलाच स्पर्श तूच।

चिवचिवत्या चिमण्यांच्या
नयनांतील हर्ष तूच।

तूची सख्या प्रणयरंग
परि अनंगहीन संग।

कलीमलभय घडो भंग
ये भजनी,करवी दंग।

                             .🍃संतोष

नभ गाभुळलेले

नभ गाभुळलेले,भरला सावळगाभा
ते क्षितिज वाकले,कृष्णछटांची शोभा.

ते पाझरले रस,सृष्टी चातक झाली,
निमिषांत सुगंधी अत्तरशिंपण खाली.

ती आळस झटकून तृणें उंचवित मान,
अन विझे निखाऱ्यापरी तापले रान.

सर शुभ्र जलाची जशी सोवळी राधा,
तो कृष्ण सावळा मेघ, सावळी बाधा.

की दाटून आले आठव अलगद ओले,
अन थेंबांमधुनी आत्मनिवेदन झाले?

तो नाद सुगंधी रेशीम पांघरलेला,
जलथेंबांचा जणू कशिदा वरि विणलेला.

तो शीळ घालतो हलके भिजला वारा,
अन पिंपळ पसरे पायी पर्ण पसारा.

ती पेंगुळलेली फुले सावरून बसली,
अन जलमोत्यांची माळ घालुनी हसली

जल नेत्रांमधले जळात मिसळून जावे,
अन ग्रीष्मझळांचे पर्व पालथे व्हावे.

तो येतो नेमे ,तरी नवोन्मेषाने,
का उगा जळावे क्षुद्र अशा क्लेशाने?

हे शांत धरातल,शांत मनाचा पारा,
नभ आत उतरता,आता अंतरी धारा.

                                .🍃संतोष

Monday, July 6, 2020

गीतांजली 4(भावानुवाद )

The rain has held back for days and days,my God,in my arid heart.
The horizon is fiercely naked,not the thinnest cover of a soft cloud,not the vaguest hint of a distant cool shower.
Send thy angry storm, dark with death,if it is thy wish and with lashes of lightening, startle the sky from end to end.
But , call back,my Lord, call back this pervading silent heat, still and keen and cruel, burning the heart with dire dispair.
Let the cloud of grace bend low from above like a tearful look of the mother on the day of father's wrath.

Ravindra nath thakur/Tagore.
Geetanjali.

शुष्क माझिया ह्रदयभुमीवर
मेघ क्रुपेचा तव वर्षेना.

फिकट पांढरे क्षितिज बोडके
म्रुदुलमेघ एकही झाकेना.

शितलशा जलधारेचीही
खूण दूरवर कुठे दिसेना.

प्रभो! किती हे दिवस कंठले
उष्ण काहीली मज सोसेना.

तव इच्छा ही! कभिन्न काळ्या
यमदूतांची येवो सेना.

परजत हाती क्रुध्द वादळे
वीज आकाशी करुदे दैना.

परंतु देवा! घे माघारी
ह्रदयांतरिची दाहनिराशा..
चिवट क्रूर ज्वालेची भाषा..

बाप गरजतो निजपुत्रावर
तेव्हा जैसी पाहे माता

तिच्या नेत्रीच्या जलमेघापरि
क्रुपाघना!!
शिरी झर तू आता...
शिरी झर तू आता ....

मूळ कविता.. रविंद्रनाथ ठाकूर /टागोर
( गीतांजली)

भावानुवाद. . 🍃संतोष

गीतांजली 3(भावानुवाद )

Thou hast made me endless, such is thy pleasure.
This frail vessel thou emptied again and again,and fillest it ever with fresher life.
This little flute of reed thou hast carried over hills and dales and hast breathed through it melodies eternally new.
At the immortal touch of thy hands my little heart loses its limits in a great joy and gives birth to utterance effable.
Thy infinite gifts come to me only on these very small hands of mine.
Ages pass and still thou pourest and still there is  room to fill.
--- Ravindra nath thakur/Tagore
Geetanjali.

निज आनंदे अंतहीन त्वां केले.
मम पात्र रिकामे केले.

हे पुनःपुन्हा जरि करिसी,
जीवनरस नूतन भरसी.

ही वेळूची, घेऊन माझी मुरली,
तव मुर्ती दऱ्यांतून फिरली.

तव पद गिरीकंदर फिरले
मधुस्वर मुरलीचे झरले.

तव अमरहस्तस्पर्शाने
मम ह्रदय आमोदे भरले

अस्फुटशा आनंदाचे
ते बोल ओठी थरथरले.

ते अनंत तव उपहार
शिशु हातांना हो भार.

युग युगामागुनी जाते
तव दानाला ये भरते!

ही ओंजळ अविरत भरते
तरी... रिक्त काहीशी उरते!

मूळ कविता.
रविंद्रनाथ ठाकूर /टागोर
गीतांजली.

भावानुवाद. . 🍃संतोष

गीतांजली 2 (भावानुवाद )

I am like remenant of a cloud of autumn uselessly roaming in thy sky.
My Sun, ever-glorious! Thy touch has not melted my vapour making me one with thy light and thus I count months and years separated from thee.
If this be thine wish and if it is thy play, then take this fleeting emptiness of mine, paint it with colours, gild it with gold, float it on the wanton wind and spread it in varied wonders.
And again when it shall be thy wish to end this game at night,I shall melt and vanish away in the dark and in the smile of white morning shall permeate in a coolness of purity, transparent.
-- Ravindra nath thakur/Tagore 
Geetanjali.

उरला सुरला मेघ हिवाळी,
निरुद्देश मी तैसा भटकत.

तेजस्वी हे हिरण्यगर्भा,
तव स्पर्शा मी अजून वंचित.

बाष्परुप होऊन मिळावे,
प्रकाशांतरी तव स्पर्शाने,

यांस्तव मी हे दिवस कंठतो,
मोजित वर्षे आणि महीने.

हीच खरोखर जरी तव इच्छा,
अन् लीला जर तुझीच सगळी,
तरी घेऊन जा रिक्तपणा हा,
चंचल जैसी जळी मासोळी.

मढव तयाला मग सोन्याने,
अन् रंगांनी टाक रंगवून,
तरंगू दे त्यांं मुक्त वायूवर,
विविधाश्चर्यांवरी दे पसरुन.

आणि पुन्हा जर झाली इच्छा,
संपवण्याची खेळच अंती,

वितळुन विलया तमांत जाईन,
फिटेल सारी मग ती भ्रांती.

धवल प्रभातीच्या स्मितातून,
परिवर्तीत मी येईन होऊन.

स्वरुप घेऊनी करीन धरातल,
आरस्पानी ,शुद्ध ,सुशीतल.

..गीतांजली
( रविंद्रनाथ ठाकुर/ टागोर)

भावानुवाद. .🍃संतोष

गीतांजली 1(भावानुवाद )

  I was not aware of the moment, when I first crossed the threshold of this life.

What was the power that opened me out upon this vast mystery, like a bud in the forest in midnight.

When in the morning, I looked upon the light, I felt in a moment that, I was no stranger in this world, that the inscrutable power without name and form has taken me in its arms in the form of my own mother.

Even so, in death, the same unknown will appear as ever known to me

And because I love this life, I will love death as well.

The child cries out when, from the right breast the mother takes it away to find its consolation in the left one in the very next moment.

Ravindranath thakur /Tagore
Geetanjali.


निबिड काननी,उमले कलिका,
मध्यरात्रीच्या गूढ कुशीतून,

माझे माझ्या नकळत झाले
जीवनात या तसे पदार्पण.

किरणपाखरे दिसता विहरत,
ओळखीचे हे भासे त्रिभुवन,

अनाम आणि अरुप शक्ती,
मातेसम मज घेई कवळुन.

परिचीतसे ठाकेल समोरी,
अनोळखी ते तत्वच अंती.

मृत्यूचा क्षण येता जवळी,
फिटेल सारी मग ती भ्रांती.

जगण्यावर या प्रेम खरोखर,
यांस्तव मजला आहे ठाऊक,

मृत्यूवरही धरीन प्रीती,
अंतकाळ तो येता सन्मुख.

स्तनामृताचा वियोग घडता,
रडे तान्हुले जरी परंतु,

क्षणीच दुसऱ्या, दुज्या स्तनातून
मिळे तयाला जेवी निजसुख.

--- गीतांजली
( रविंद्रनाथ ठाकुर/टागोर)

भावानुवाद .. .🍃संतोष 

Sunday, July 5, 2020

श्रावण

श्रावणातले ऊन ल्यावे,
सोन्याचे लखलखणारे.

श्रावणातले ऊन प्यावे,
जलधारांनी भिजणारे.

हा लपंडाव खेळावा,
किरणांनी धारांसंगे.

ओलेता गंधीत वारा ,
ते गुज लतांना सांगे.

हा खेळ चिरंतन चाले,
किती पर्व ऋतुंचे सरले.

परि साक्ष कुणाची घ्यावी,
हे दिगंत मंतरलेले.

मन झोक्यांवरती झुलते,
मोहूनी अंतरी फुलते.

जाणुनी भासमय सारे,
का स्वप्नांवरती भुलते?

दरवर्षी श्रावण यावा,
रंगांचा उत्सव व्हावा.

त्या स्निग्ध उष्ण स्पर्शाने,
जगण्याला मोहर यावा.

संक्रांत

स्निग्धमधुर सण संक्रातीचा,
करी सुखावह शिशीर शैत्यता।
मधुर क्षणांची करुनी पखरण,
परस्परांतील विसरु कटुता।

स्निग्ध तिळाला गुळात घोळून,
प्रेम,माधुरी,तयात मिसळून,

करु साजरा,तिळगुळ देऊन,
श्यामल सुंदर वसने लेऊन।

सुर्य करितसे,मकर संक्रमण,
दिन दिन व्रुद्धी,पुढती येथून.
तशीच होवो,सौख्य व्रुद्धी ही,
अशी शुभेच्छा,मंगल चिंतून!

                   🍃 संतोष

कविता राणी

शब्दसुमांंच्या हिंदोळ्यावर,
कविता राणी, ही झुलते,

व्यर्थ बोलणे,'कविता करणे',
 (ती) होते,घडते,वा फुलते! (१)

तीक्ष्ण तीरांसम,कधी शूलांसम
खोचक बनूनी ही सलते,

सलते,परि मग बनुनी सांत्वना,
पुसते नेत्रांतील जल ते.        (२)

मऊ मखमली, कधी मुलायम,
रेशिम पेरित ही जाते,

नभी तळपत्या कधी सुर्यासम,
तेजाशी जडवी नाते।           (३)

मुग्धमनांच्या भावक्षणांतून
उगाच केव्हा ही रमते,

प्रतिभा सखीसह मुक्त विहरते,
स्वच्छंदी पण तीस गमते.     (४)

हीच्याच प्रसवांतूनी जन्मली,
जगतामाजी ही भाषा,

तिमिरतळांतून बनुनी शलाका,
हीच जागवील नवआशा.     (५)

काक शहाणा

चिऊकाऊच्या गोष्टी मधला,काकच आज शहाणा।

गबाळग्रंथी वेष,बोलतो,फिरवून डोळा काणा।

जरी शेणाचे घरकुल माझे,वाहून जाई नेहमी।

अनुदानातून पुन्हा बांधणे,हाच शिरस्ता नामी।

उदार तत्पर सुगृहिणी तू,देशील मज अंतर?

लोकशाहीच्या अंगणातले बांधव आपण जर।

शपथा घालून घटनेच्या,मी करीन उखळ पांढरे,

पटते तोंवर, समता,ना तर करीन माझे खरे!

                   🍃.संतोष

विवेक

निर्गुण आणि निराकार,
अमूर्त आणि व्योमाकार,
अशा शब्दांची पिसे चार,
खोचून भरविती बाजार!

जिवंत दु:खे टाळत जाती,
पूर्वसुरींचा गरिमा गाती.
प्रश्न कठीण,त्या,सोडून भिडणे,
प्रतिप्रश्नांच्या वळती वाती ।

झडकरि सोडून पदर तयांचा,
रुढी भ्रष्टांना दूर करुया,

अनुभव चमके,तेथ नमूया,
जरी कस लागे ,नित्य श्रमूया।

परलोकाचे आमिष नको
परि नास्तिकतेचे दंश नको,
सात्विक परिमल गंध हवा,
पण तर्कदुष्ट तो दर्प नको.

विवेक मनीचा,धर्म आजचा,
सर्व सुमंगल त्या पाठी,

नच समजा उपदेश,
प्रार्थितो ,
उकलण्यास अवघड गाठी.
                .🍃संतोष

वेडे मन

काळा,घट्ट दाटलेला,
भवताल अंधाराने.
परि वेडे मन माझे,
गाई प्रकाशाचे गाणे।

भुई तापली,रापली,
धग उष्ण उसास्यांची.
परि वेडे मन माझे,
गाई गीते पावसांची।

कोलाहल कर्णकटू,
माजूनिया, कानी दडे,
परि वेडे मन शिंपी,
शांत एकांताचे सडे.

अश्या शहाण्या मनाला,
म्हणू बाई कसे वेडे.
कधी चढे,कधी पडे,
घाली जीवाला साकडे।

               .🍃संतोष

नारायणा!

मधुकैटभांचे पुरे रे पुरावे,
हवा रोकडा धर्म नारायणा!

इथे भग्नमूर्ती,तुझी क्षीण किर्ती,
कशी साहवे तीव्र,अवहेलना.

जरि तू अकर्ता,तरि विघ्नहर्ता,
त्वरे या विवर्ता आता थांबवी.

"गतीस्त्वं भवानी", हजारो रुपांनी,
आता नाचूदे रे,पुन्हा शांभवी.

तुझी स्मित भाषा,कळेना आम्हासि,
अगा ज्ञानराशी,तुलां सांकडे.

कळावे,वळावे,स्वरुपी मिळावे,
असा योग दे रे,आम्ही बापुडे.

            .🍃संतोष

फुलपाखरू

आज तिचा दिवस,म्हणून
काढली उसनी आठवण.

पदर डोई,नजरेत भुई,
अशीच 'स्मृती' साठवण.

सतीत्वाचे जीर्ण पट,
पुराणांचे जुने मठ,

कहाण्यांतले गळके घट,
दिसली नाही तिथं.

तुटक्या बेड्या कुरवाळणारी,
उरली ओशाळ भुतं.

घर,दार,परस,अंगण,
भरुन तिचेच श्वास,

माजघरातून उंबरठ्याचे
आखलेले प्रवास.

दिसली नाही, तसा झाला
अहंकार जागा,

भित्रं माझं मन!,
तिच्या सुरक्षेचा त्रागा.

कोषांत मऊ नात्यांच्या मग,
शोधू लागलो धागे,

वाटले की ती भेटणारच
इथं आगे मागे.

कोष म्हणाले,पुरे आता,
नको व्यर्थ झुरु..

वर बघ ,झालंय कसं,
तिचं फुलपाखरू...

           .🍃संतोष

शब्दचि आले घन बनुनी

ते शब्दचि आले घन बनुनी.
आशय मग झरतो,सर बनुनी....

सरसर ये धनूतुनि तिरांसम.
दुडकत ये अवखळ पोरांसम.

रुद्रापरि कधी वाजत गाजत.
नवयुवती सम कधी ये लाजत.

प्रगट कधी अन् मुग्ध कधी,
ये,अर्थवाही निर्झर बनुनी..

ते शब्दचि आले घन बनुनी.(१).

टपटपल्या " स्मृती" पागोळ्यांपरि.
जळी भिजला हा ऋतुच कळ्यांपरि.

थरथरल्या अधरांवर भाषा.
धरतीची सोज्वळ अभिलाषा.

पुरवी कधी,नुरवी कधी..
ये भूमिवरि अमृत बनुनी.

हे शब्दचि आले,
शब्दचि न्हाले.
शब्दचि धाले.
...घन बनुनी..(२)

                .🍃संतोष

पाऊस 1

सोनसळी नागिणीचा
दंश त्या आभाळा,

भिनला हा ऋतु,अंगी,
जलद सावळा.

धरतीच्या उरीपोटी
पाहुनिया तडे,
मेघ ओते भुईवर
घड्यांवर घडे.

ऐसा दानशूर कोण
आहे खरं सांगा,
साक्षी याला,महावृक्ष,
पर्वतांच्या रांगा.

लहरीपणाचा त्याला
लावू नये टिळा.
चौकटी मोडून ,मुक्त
निसर्गाची शाळा.

रिक्त होऊनिया सांडे
ऐसे त्याचे दान,
मोजती मानव त्याला
एककांमधून.

फुत्कारत्या नागांपरि
इंधनांचे लोळ,
पर्वतांचा खून पडे,
वृक्षांचा कल्लोळ.

ऐशा मानवाला हक्क
आहे तो कितीसा?
आधी कर्तुत्व तपासा,
मग पर्जन्याला पुसा.

पाऊस पडत असताना

पाऊस पडत असताना,
झेलावा अलगद ओला,

अन् स्वत:शीच धरलेला,
मग सोडावा अबोला.

मन म्हणते ,गाऊ गाणे
श्वासांचे होती तराणे,

नाचावे,आपण गावे
धारांत शुचिर्भूत व्हावे.

जो सचैल येथे न्हाला,
थेंबांतून अम्रुत प्याला.

चेहर्यांचे रंग दिखाऊ,
विरघळता,सोज्ज्वळ
झाला.

जन हसले तर मग हसूदे
कुणी रुसले तरीही रुसुदे.

आपुली ओळख आपणाशी,
पटल्यावर मग जग फसूदे.

पाऊस हा नसतो पाणी,
जो फक्त ढगांतून झरतो,

पाऊस हा उत्सव असतो,
जो सरल्यावरीही उरतो.

तो खुणा ठेवतो ओल्या,
अन् शपथा देऊन जातो.

त्या शपथांसाठी पुन्हा,
दरवर्षी फिरुनी येतो.

Saturday, June 27, 2020

पहाट

आली पहाट कोवळी,
केशरानी गंधाळून.
सज्ज फुले,वेली पाने,
दंव मौक्तिक माळून.

शुभ्र मऊ धुक्याच्या त्या,
दुलईत लुप्त वाट.
गिरीमाथे डोकावीत,
धूसरसा दिसे घाट.

थोडा कुंद,तरी धुंद,
शीत मंद, वात वाहे.
चाळवले चराचर,
सृष्टी हळू जागताहे.

स्वप्नचंद्र विरुनिया,
झाला कापूर नभात.
बालरवी करी स्मित,
झाली मंगल प्रभात.

जाई निशा,येई उषा,
किरणांनी दिप्त दिशा.
जागे नवा कार्योत्साह,
नव्या दिनी,नवी आशा.

         .🍃 संतोष

खगांंच्या नभी,चालल्या रम्य पंंक्ती

खगांंच्या नभी,चालल्या रम्य पंंक्ती,
किती आकृतीबंध साकारले।
कुणी त्या दिले ज्ञान,शिक्षा कुणाची?
मिटेना कधी गुण रक्तातले।

पिले कोकीळेची,जरी काकसंगी,
गातात गाणी, मधुरताच अंगी।
जळी मत्स्य पोही,उपजता लीलेने,
प्रतिक्षिप्त क्रिया,घडे सुप्त ज्ञाने.

तशी मानवाला, मिळे स्वप्नदृष्टी।
विचारी मनाला,खुले आत्मसृष्टी।
कृती ही तयाचे असे मूर्त रुप।
जशी ज्याची वृत्ती,तसे त्या स्वरुप।
             
                                .🍃संतोष

आकडे

बातमी तशी ताजी ताजी,
गणिताच्या तव्यावर,
भाषेची भाजी!

बावन्नकशी सोन्याचे,
पन्नास,दोन असे तुकडे,

बत्तीशी काढू नका बरं,
सरळ अर्थ होतील वाकडे.

आकडेमोड की आकडेफोड,
आकड्यांनाच येतेय आकडी,

सरळ रस्ता सोडून मधेच,
कशासाठी वळणं वाकडी?

चांगदेवपासष्ठी म्हणजे काय?
दत्तबावनी पदार्थ काय?

एकवीस मोदक मोजायचे कसे?
आपलेच व्हायचे पोरात हसे!

पाढे पढवून होतात पोपट?
शिक्षा सोडाच,वर्ज्य चापट!

नवीन वर्ष,नवीन युक्ती,
पोरांमाथी शिक्षण सक्ती!

शिक्षण नावाची नवरीच नकटी,
करायचयं खरंच लग्न?

दहा वीस लाख हुंडा हवा,
नाहीतर सत्राशे विघ्नं !

                     .🍃संतोष

प्रवास पक्षी

बरसत असता,पाऊसधारा,
मन माझे जणू प्रवास पक्षी.

कुडकुडणारा देह चिंबसा,
इवल्या नेत्री,तुषारनक्षी.

नको नकोसा ओलेता क्षण,
अंगी बिलगता,हवाच वाटे.

विस्कटलेल्या पंखांमधुनी,
जुन्या स्मृतींचे रेशीमकाटे.

संकोचाचा टिचभर पडदा,
गेला फाटून निवले लोचन.

हजार नेत्रांतुनी निखळले,
सर मोत्यांचे गेले शिंपून.

एकच घटिका,अमृतघुटका,
प्राशुनी परि हे नवसंजीवन,

पुन्हा अनामिक,अनंत व्योमी,
नव्या प्रवासाचे आवाहन.
             
                  .🍃संतोष

Tuesday, June 23, 2020

सांग नरा रे

सांग नरा रे इतुके भोगून,
अजुनी कसा हा जीव उपाशी?

किती शोषल्या नाही गणती,
तरी तुझी का नजर अधाशी?

किती कळ्यांनी फुलण्या आधी
 मूकपणे अंगार झेलले,

किती जिवांनी खेळ त्यागूनी,
पोक्त तुझे संसार पेलले.

त्यागून असले पौरुष घे रे,
मांगंल्याची जोडुन नाती,

नात्यांतील उज्ज्वल उर्जेने,
विझणार्या उजळव त्या ज्योती.

कधी वाटते ही तर वृत्ती,
नाही तिजला लिंगभावना.

जेथे विकृत घुसमट तेथे,
जळमटते उपभोग वासना.

अद्वैताचा पडुनी पाऊस,
देहखुणा मनीच्या निवळाव्या.

नाद वेणुचा पुनश्च ऐकून
गाई आपुल्या घरी वळाव्या.

                 . 🍃संतोष

Thursday, June 4, 2020

कविंची चाळिशी

जे न देखे रवी ते आम्ही पाहतो.
असा माज आम्ही उरी वाहतो!

असा माज त्याचे शिरी होत ओझे
पळे चालली श्वास आयुष्य मोजे.

दिले जे तीने, ते, तिचे ऋण बाकी!
भरु  रिक्त प्याले श्रमे मुर्ख साकी.

फुटेना तरु पालवी म्लान झाली,
कितीदा तुरे व्यर्थ छाटायचे.

जुन्या फांदीला बांधू ग्रीष्मात झोके,
उगा हेलकावे किती घ्यायचे?

अकाली पिके त्या फळां नाही गोडी
तरी ताजवे धूर्त तोलायचे?

नसे गायनाची कळा ती गळ्याते,
तरी घोकले काही रेकायचे!

आम्हा पुर्वजांची मिळालीत काही
तारांगणे खेळण्या आयती.

तिथे शोधू तारे जुने अन् निनावी
करु सर्व ग्रंथालये पालथी.

आताशा कवींना छळे चाळीशी
विशींचे उमाळे पुढे आळशी!

परि साथ देते जुनी मान्यता.
हसू ओळखीचे! मिळे धन्यता.

असे धन्य जगणे! चकाकीत चकणे!
बुडाला रवी अन् फिके चांदणे.

                             . 🍃संतोष

क्षण सुचण्याचा

क्षण सुचण्याचा जणु स्फोटासम
परि चांदणे त्यातून फुटते.

मौनमिठी मन सोडून उठते,
खूण पुन्हा पुर्वीची पटते.

स्फोटच! पसरे परि शांतता
शितल शामल शब्दशहारा.

गाफील होतो तर्क जरासा
उठे तयाचा शिष्ट पहारा.

या स्फोटांच्या जखमांमधुनी
स्रवते अत्तर घाव मखमली.

गंध दरवळे धूपाचा अन्
तेजातच ती जाणीव लपली.

ह्या स्फोटांतून होते क्रांती.
युद्ध चळवळी मागून येती.

इथेच विरतो कोलाहल अन्
इथेच मिळणे अंती शांती.

ज्यांना झाले घाय इथे ते
शूर शिपाई मनसीमेवर.

हेच सुरेश्वर अन् लयसागर
गाणे यांचे अचूक समेवर.

नियमित नेमिक अन् चौकोनी
चाकोरीचे जे अभिमानी.

घायाळांचे तुम्हा आवाहन
एक तरी घ्या घाव ईमानी.

क्षण सुचण्याचा आला गेला
छेडून दीड दा शब्द सतारी

स्पंदन उरले तेच गुंजते
पुनःप्रत्यये साक्षात्कारी!

                              . 🍃संतोष

भूत भयाचे

भूत भयाचे भूतांपाठी
भूतदया ना भूतकाळाला.

भीतभीत ते भविष्य भेटे
क्वचित कधी ये सौख्य गळाला.

आले म्हणता जळी पळाले
दुःखसागरी ते मीनासम.

चरफडणाऱ्या हातांसंगे
पुन्हा नव्याने तोच दिनक्रम.

टीचभर पोकळ खोळ भराया
आयुष्याच्या रित्या ओंजळी.

क्षण सोन्याचे अवतीभवती
कधी न दिसले, चाल आंधळी.

भिरभिर पक्षी, निळ्या नभाचा
थांग शोधती म्हणुनी वेडे?

चकवाचांदण मनी तुझ्या रे
विकारवेलींचे त्यां वेढे.

बुद्धी म्हणते म्हणून शहाणा
पोर मानवी परि अर्धवट.

अर्ध्या हळकुंडाने पिवळा
डुचमळणारा अर्धा हा घट.

फुंकर येता पडती पत्ते,
कुठे बंगला कुठे इमारत.

स्वप्नमनोरे चढणे पडणे
जीवघेणी ही उगाच कसरत.

अमृतभरल्या तळ्यात पोही
अन् घाबरतो बुडीन म्हणोनी.

स्वप्ने बघतो आगबोटीची
वाट पाहुनी जात शिणोनी.

कीट अडकती जाळ्यामाजी
कोळी त्यातून निवांत फिरतो.

आपले जाळे आपण विणावे
जीव जिथे स्वच्छंद विचरतो.

जगलो म्हणता येण्याजोगी
एकतरी खूण उरी असावी.

जरा वृद्धपण मग चंदेरी
मिरवीत मरणा वाट पुसावी.

                         . 🍃संतोष

ख्वाईश

गुमसुमसी मनके किनारे खडी थी.
सूकूं के लम्होंकी वो ख्वाईश अकेली!

उसे अब अचानकसे मिलनेको आयी
सपनोंकी कश्ती मे ,नीली सहेली!

था फैला अंधेरा,कोहरा घना था
बहाने बहुत हमने उसमे पिरोये.

अभी ये घडी आ गयी जब मिलनकी
छाने लगे, बेरुखीके वो सांये!

वहां दूर, मजबूर, मजदूर पैदल.
कल का उठाये हुएं बोझ जाये.

छत है,गरम जेब, मुझको सताये
तनहा पलोंकी ये खाली घटांये.

जो है वो नहीं, जो नही उसको मांगे
अजब मनका बच्चा है कितना हटीला

पूरब चले कौम, पश्चिम को भागे
कभी साथ चलता, कभी ये अकेला.

नेता यूं बातोंमे उलझे हूए है,
कल का वो सूरज, है किसके हवाले?

बातोंकी कश्ती है, बातोंकी नदीयां
यहां तेज तैराक किसको बचाले?

बडा पेचिदा है सवालोंका ताला
न चाबी, न हल, ये तो मुश्किल समा है

चलो दिल को सहला सके उसको माने
सच तो है कडवा, जमाना थमा है!

हर इक आंसू पोंछे
हर इक गुल हो खिलता
मुन्कीन नहीं ये तो सपना सुहाना.

चलो अब टटोले जो है टोकरी मे
गया वो फसाना! है फिरसे कमाना.

                                . 🍃संतोष

माझ्या कवितेच्या शिरी

माझ्या कवितेच्या शिरी
नको किरीटकुंडले.

नको लौकिककुंकुम
नको शिरपेच, फुले.

नको पायांत पैजणे,
नको जोडव्याचा काच.

नको मदाऱ्याच्या पुढे
मिंध्या मर्कटाचा नाच

नको प्रवासाला तिच्या
रुढ आखलेली वाट.

कधी होऊ नये तिने
कुण्या दरबारी भाट.

परि माझ्या गणराया
तुला एकच मागणे.

जिथे प्रसवती शब्द
तेथे येऊन रहाणे.

शिरी वत्सल रहावा
नित्य हात शारदेचा.

मूढ वैखरीत माझ्या
अंश रुजावा परेचा.
                               . 🍃संतोष

वळीव (१)

ऊन जाळते माध्यान्हीचे
वैशाखाला फुटली उकळी

दाहक होतो वारा देखील
मलूल झाली तृणे कोवळी.

धगधगत्या रवीकुंडामाजी
होम चालला उठती ज्वाळा.

चढला पारा दिशा तापल्या
चरमसीमेवर उभा उन्हाळा.

या रणरणत्या शापझळांना
वळीवाचा उःशाप हवा,

गजमेघांच्या शुंडांमधुनी
धरणीला अभिषेक हवा.

हलता पात्रे नभभुमीवर,
वळीव आला तो धुसमुसळा.

गेला नाचून जीवन शिंपुन
आला, गेला, सरे सोहळा.

स्वल्प दिलासा, पुन्हा काहीली,
परंतु हाती, ओलेते क्षण!

वर्षाराणी येईल तोवर
असेच ठेवू हे सांभाळून..

                             . 🍃संतोष

Monday, April 27, 2020

फुंकर

             
पहिली फुंकर देव मारितो
प्राण उठे देऊन आरोळी.

रडण्याने हसताहे कोणी
स्तन्य दाटते!क्षोभ नसावा!

फुंकर घाली घास निवाया
लेकुरवाळी कुणी माऊली.

तशीच फुंकर ऊन सुखावर
देव मारितो,धीर धरावा!

फुंकर मारुन चुल चेतवी
सुगरण कोणी पाक कराया

तशीच फुंकर विपरिततेची
निग्रह अग्नी तीव्र करावा!

फुंकर घुमवी शंखनाद तो
मंगलमय मंदिर गुंजते.

ध्येयपथावर गुरुवाक्याचा
तसाच कानी मंत्र घुमावा!

फुंकर वाहे मुक्त वायुची
कलिकागाली गोड खळीतुन.

तसाच उन्मेषाचा वारा,
नाविन्याच्या बनी फिरावा!

फुंकर खेळे चपळ, वेणुतून
रंध्रांतून थरथरती सृजने.

तसा मोकळ्या मनवेणुतून
मुक्त मारवा मग ऐकावा!

जाते फुंकर शेवटची ती
दूर प्रवासाच्या ओढीने

तोवर पल्ला गाठून आपला
दीप स्वतःचा तो उजळावा.

                            . 🍃संतोष

Monday, April 13, 2020

संधीकाल



सांजसाउल्या सरकत आल्या
क्षितिजावरचे पिऊन केशर

दूर आक्रुती पैलतटावर
सख्या तुझी रे निवळे धूसर

व्योमपटी मेघांच्या वक्षी
रेखीत पक्षी,पळती नक्षी. 

मनी मारवा झिरपत राही
शुक्रचांदणी पश्चिम कुक्षी

बटांत खेळुन जाई सांगून
तवमिलनाचा निरोप वारा. 

किती युगे मी वाट पाहते
रोज मांडुनी संधीपसारा. 

जोवर जागी जुनी आठवण
जोवर नेत्री दीप आशेचे

तोवर ये रे ऐलतटावर
भय मजला निष्ठुर निशेचे.

होईल अंबर झुलते झुंबर
चांदणचांदी वर्ख माखुनी

कुठले मिलन भुलता स्वप्नी
जाईल निद्रा वेस आखुनी

सरले यौवन थकली गात्रे, 
सर्व रिकामी माझी पात्रे.

ये रे आता पुसण्याआधी
संधीकालची व्याकुळ चित्रे.

                             . 🍃संतोष

Thursday, April 9, 2020

पवन पाहुणा

पवन पाहुणा टकटक दारी,
करुनी विचारी, आत येऊ का?

बावरली ती गवाक्षद्वारी!
आणि म्हणे, मी दार लावू का?

त्याची खटपट फटीफटीतून
कडीकोयंडा हलवून पाही

भिरभिर चाहूल चहूबाजूंनी
जरा जीवाला उसंत नाही.

कुणी म्हणे, आला तर आला!
पाहुणाच तो!फिरेल मागे.

उरांत धडधड घेऊन का गं
असे पाहसी रागे रागे!

"तुज ना माहीत खोड तयाची
पुरती आहे मी हे जाणून."

येईल, जाईल, स्वच्छंदी तो!
परि मनी दर्या येई उधाणून.

घुसळून आठव स्म्रुतींचे ताटव
विसळून क्षण ये स्वप्नी उसळून

 मीपण वितळून जाईन मी त्या
 नादावून नादांते मिसळून.

म्हणून टाळते मजला भिती
नव्हेच त्याची परि इतरांची.

काय बहाणे सांगू कोणां
विस्कटता घडी निजवस्त्रांची.

वाट पाहते त्या दिवसाची
लाजफुले गळतील पायाशी.

तनमन सारे उधळून त्याला
एकत्वे कवळीन ह्रदयाशी!

                              . 🍃संतोष

Monday, April 6, 2020

वहाणा

माझ्या दारातले तुझे
तळ झिजलेले जोडे
करी हळवे उगाच
मना आठवांचे वेढे.

काय असेल उमर
किती कापले अंतर?
किती काटे किती फाटे
कीती कर्दमाचे थर.

किती तुडवली राने,
किती घाटांची वळणे.
किती दगडांची ठेच,
किती ओलांडली बने.

किती रापले तापले
बंध बंदांचे ईमानी.
नाही डगमगू दिली
तुझी चाल स्वाभिमानी.

रुप ओबडधोबड,
अंगी खिळे टोचखुणा.
कसा शोभावा शेजारी
कुणी राजस देखणा.

म्हणे अशी अडगळ
ठेवू नयेच घरात
असे सूचनाशिंतोडे
येताजाता उडतात.

खरे आहे! का गुंतावा,
माझा निर्जीवात जीव.
जाता जीव ओलांडून
जीर्ण शरीराची शीव.

जरी पटते बुद्धीला
परि धजावेना मन.
वाटे करारी पाऊल
पुन्हा येईल चालून.

माझ्या पायी शोभतात
मऊशार पादत्राणे.
किती रंग रुप कळा
नामवंत ती निशाणे.

वाट खुणावे दूरची
देते धावण्या आव्हान.
उरी आशेचा समुद्र
होते चालही बेभान.

परि ठाकता समोर
पुढे निसरडी वाट,
चुके काळजाचा ठोका,
सुटे निग्रहाचे बोट.

तेव्हा डोळ्यांपुढे येती
तुझ्या व्रुद्धशा वहाणा.
येतो भुलण्याचा गांव
तरी पाऊल चुकेना!


                             . 🍃संतोष

Monday, March 30, 2020

सदाफुली

        सदाफुली

पुष्पवाटीका ती फुललेली
व्रुक्ष तरु अन् नाजूक वेली.

रुपगंध अगणित रंगांनी,
अंगांगी नक्षी सजलेली.

कुठे दरवळे धुंद मोगरा
कुठे सुखावे कुंद हासरा

नाजूकसाजूक जुई सायली
कुठे मालती फुलवी फुलोरा.

सुवर्णचंपक तो घमघमता
निशिगंधाची सुगंधऋजुता

गेंद गुलाबी पीत टपोरे
प्राजक्ताची नम्र सहजता.

परंतु दारी बिनवासाची
सदाफुली ही आली कोठून

कुजबुज झाली,सूर उमटला
अहो त्वरेने टाका उपटून!

फिकट कुसुंबी देह शहारे
सदाफुलीचा विझला चेहरा

गंधहीनशा आयुष्याचा
प्रश्न टोचला आत बोचरा.

परि अचानक सूर व्रुद्धसा
घुमला तेथे अनामिकाचा.

ओळख पटली सदाफुलीला
अर्थ कळाला अस्तित्वाचा.

" वसंत येता फुलणाऱ्यांनो
  एवढेच रे असूदे ध्यानी

 शिशीर शैत्यता साहून फुलते
 सदाफुली ही नित्य, ईमानी.

झडता वठता अन् गारठता
खतपाण्याविण कितीदा रुसता!

ऋतुचक्रांतील मोजून महीने
येता जेव्हा, तेव्हा हसता.

सदाफुली ही चाकरमानी
रोज नव्या आशेने फुलते

नव्या कळ्यांची जपुनी स्वप्ने
विसंबुनी वाऱ्यावर झुलते.

फुलणे हा निजधर्म फुलांचा
असो केतकी वा कोरांटी

येता बहरां, सर्वही सुंदर
भेद, तुलना या निरगाठी!"
   
                         . 🍃संतोष

Saturday, March 28, 2020

खरी परीक्षा

वेळ कातरे वेळेला अन्
आम्ही म्हणू की काळ कंठला.

वेळ आल्यावर काळ खुणावे
निमिषामध्ये मिटला खटला.

न्याय कोठला कुणी मांडावा
स्पर्शमात्र अन् घट सांडावा.

भरला ज्याने त्याला माहीत,
कुठला दावा! कुणी भांडावा?

अतर्क्य सारे चुकतो ठोका
क्षणात थांबे जीवनझोका.

धुतले कितीदा हे कर, काया.
संशय मनीचा ये चावाया

इथे तिथे अन् अवतीभवती
गडद दाटते काजळभीती

परि मेघांना विषाक्त काळ्या
किनारती त्या ज्योती धवळ्या.

धन्वंतरीची घेऊन सेना
पहा झुंजती लक्ष्य चुकेना.

खाकी जागी देत पहारा
एकच लाठी परि दरारा.

संयम थोडा धीर जरासा
मनास द्यावा मनी भरवसा.

अंतर राखून राखू अंतर
जपू जाणिवा भेटू नंतर.

भय हे शाश्वत तसे धैर्यही
म्रुत्युंजय मर्त्यांत वीरही!

नियम जगाचा हाच पुरातन
शिशीर संपता वसंत नूतन

तिमीरातून ये दूत उषेचा
तोवर थोडा जोर निशेचा

फोल चळवळी हवी तितिक्षा.
आता आपुली खरी परीक्षा!

                             . 🍃संतोष

हा राम

हा राम त्रेतायुगनिवासी,
कलियुगातही नांदतो.

भिन्न रुपी,भिन्न स्थानी,
सकल जगती स्पंदतो.

तो बालस्वरुपी दावी लाघव,
तुलसीला शरयूतटी.

तो मध्यभारत,दंडकी,
प्रक्षाळिला गोदातटी.

श्रीरामनामे मत्त,फक्कड
कबीर विहरी हंस तो

अन् दादू पिंजारी दयालु
संसृतीभय पिंजतो.

ती दख्खनात निनादली
श्रीरामदासी गर्जना,

रयत झाली मारुती,अन्
छिन्न मुघली वल्गना.

भद्राचलीचा रामदासु
त्यांस घाली साकडे.

श्रीरामविग्रह स्थापितोे,
त्या पर्वती,आंध्राकडे.

जे तमिळ प्रांती त्यागराजे,
दिव्य कीर्तन मांडले,

ते गायने,कर्नाटकी,
निजवैभवे ओसंडले.

संरक्षिण्या,नवभारता
दे मारुती सम तू धृती,

दे संयमी युगधर्म जेथे
नांदती बहु संस्कृती.

जे रावणासम गांजती,
त्यां मारण्या कोदंड दे.

परि पेटण्या नवचेतना,
नवअस्मितांचे बंड दे.

ये मुक्त करण्या जानकी
अन् त्रस्त ती मंदोदरी.

ये गूह्यकाला भेटण्या,
ती मिटव विषमाची दरी.

निजधर्म अन् विज्ञान यांना,
सांधण्या सेतू हवा.

तंत्र आणिक मंत्र यांतील
सूत्र तू, तूचि दुवा.

कोटी तेहतीस देवता ह्या,
अब्ज झाल्या सांप्रती,

दे बुद्धि आम्हा,वाढुदे,
सुदृढ,अल्पच संतती.

ये सांगण्या की,व्यर्थ ती
प्राचीन,दुष्कर कंदरे,

पार्थिव मंदिर!त्यासवेे,
मज अब्ज ही हृद् मंदिरे.

                   .🍃संतोष

Wednesday, March 25, 2020

बंधन (lock down)

बंधन है या मुक्ती है?
अनुशासन या सख्ती है?

कर विचार ये समय उचित है
क्यूं प्यारे तू चंचलचित है?

शरीर बंधा है?वो तो था ही!
हम शायद ये भूल गये थे

घर की चौखट! वो तो थी ही
हम कुछ ज्यादा टहल रहे थे!

वक्त मिला है करलो बातें
कुछ अपनोंसे और कुछ खुदसे.

बचपन ढूंढो जीलो थोडा
घुटन न समझो अपनी जिद से.

चलो गुजारे चंद तो दिन है
हसते गाते कट जायेंगे.

सूरज तो निकलेगा फिरसे
भय के बादल छंट जायेंगे.

                         . 🍃संतोष

Tuesday, March 17, 2020

खलाशी

भरकटलेल्या तारुमधले
आम्ही खलाशी वल्ही मारु.

कुणा खुणावे रंग नभीचे,
कुणी ढोसतो मजेत दारु.

शीड दहादा शिवुन झाले
तरी फाटते काय करावे?

दोर धराया नुरले कोणी
जाई होडी तिकडे जावे!

दिशा कोणती? कुणा काळजी?
दैवावरती ठेवू हवाला.

मिळे खावया तोवर राजे
शीण कशाला उगी जिवाला?

दूर चंद्रमा दूर तारका
दूर स्वर्गीचे ते नंदनवन.

खारट पाणी इथे सभोती
तेच वजू अन् तेच आचमन.

करु गलाटा गलबत हलवू
धाक दाखवू अन् बुडण्याचा.

कप्तानीचे स्वप्न उराशी,
यत्न करु तुंबळ लढण्याचा.

कसे वाचलो येथे तरलो
नवल वाटते नावेलाही!

भकलो, चुकलो, तरीही टिकलो.
शिकलो नाही, तरीही काही.

इतुके आता नव्हे पुरेसे.
वल्ही मारुन कष्ट उपसणे

वेळ पातली! आपुले आपण
सुकाणू आता हाती धरणे!

                            .🍃संतोष

चार दिस असे

चार दिस असे,
चार दिस तसे!
मनासारखं दान कधी उलट फासे.

व्रुत्तीच्या वेलांट्या,मनाच्या कोलांट्या!
तोंडदेखलं स्मित दिसे कसनुसे.

सभ्यतेच्या व्याख्या, जरी घोटल्या घोकून,
अंतरीचे सारे,पहा दृष्टीतून दिसे.

प्रकाशाचे झोत,की अंतरीची ज्योत?
एकांतप्रमोद,की स्नेही गणगोत?

विचारांच्या वर्दळीत ,जीव स्तब्ध बसे,

चार दिस असे,
चार दिस तसे.
मनासारखं दान,कधी उलट फासे!

सणांचे मोती

करी स्वागत वर्षाचे,
चैत्र उभारुन गुढी,
शुद्ध नवमीला चाखू,
रामजन्मोत्सव गोडी ।१।

याच मासी पौर्णिमेला,
जन्मे भक्त हनुमंत.
वंद्य द्वय,दास,देव,
ज्यांसी वर्णितात संत.।२।

शुद्ध तृतीया अक्षय,
वैशाखाचा शुभ दिन,
पौर्णिमेला,तरुतळी,
गौतुमासी प्राप्त द्न्यान.।३।

वेध लागे पर्जन्याचा,
होता सुरु ज्येष्ठ मास.
वटपूजा,पौर्णिमेस,
सवाष्णींचा उपवास.।४।

बोले आषाढ गर्जोन,
सवे पर्जन्याच्या धारा.
येई आषाढीची वारी,
विठू जाई शेजघरांं.।५।

आला श्रावण लाजत,
झुला पंचमीचा झुले.
दंग माहेरवाशिणी,
खेळ कौतुकाचा चाले.।६।

सोनसाजरा श्रावण,
गेला खेळून,हसून.
आला भाद्रपद मास,
अंगी सोवळे नेसून.।७।

येती ग्रुही गजानन,
सवे गौराई नटून.
फुलापानांची आरास,
मनी भाव ये दाटून.।८।

आला म्हणता म्हणता,
घेतो निरोप भादव,
रुणझुणतो कानांत
आश्विनाचा पदरव.।९।

घट बसती घरात,
रात्र सरे जागरात ,
आदिशक्ती अंंबाबाई,
प्राण फुंकते घटांत.।१०।

लूटू दसर्याचे सोने,
सण विजयादशमी,
कोजागिरी पौर्णिमेला,
प्रेमे न्याहाळी लक्षुमी.।११।

सण मोठा दिपावली,
येतो आश्विनाच्या अंती.
द्वारी दिव्यांचा प्रकाश,
मनी तेजाळल्या ज्योती.।१२।

बंध नात्यांचे रेशमी,
पाडवा नि भाऊबीज
पुढे कार्तिकीची वारी,
विठोबासी निजगुज.।१३।

फिटे व्रताचे पारणे,
पुर्ण चातुर्मास होई.
लागे लग्न तुळशीचे
मग मुहुर्तांची घाई.।१४।

येई मास मार्गशीर्ष,
शाल अंगी लपेटली,
पौर्णिमेला, शुभ दिनी,
दत्तमुर्ती प्रगटली.।१५।

वाढे कडाका थंडीचा,
मास पौष आला भरा,
सण संक्रांतीचा आला,
आधी तोंड गोड करा.।१६।

माघ गणेश जयंती,
शुद्ध तृतीयेला येते,
धन्य महाशिवरात्र,
शिव भक्तीत रंगते.।१७।

येते फाल्गुनात होळी,
सण रंगपंचमी चा,
वर्ष सरे,स्मृती उरे,
चक्रखेळ हा मासांचा.।१८।

बारा मासांत,सणांचे,
ऐसे विखुरले मोती,
यत्न गुंफण्याचा केला,
देतो श्रोतीयांंच्या हाती.।१९।

            🍃.  संतोष

Thursday, March 12, 2020

मराठी

मराठीस मरणकळा?
विचारांती हे बरळा!

जोवरी रवी चंद्र कळा
तोवरी तिज प्रसवकळा.

वय वर्षे शतसहस्त्र
शारदीय धवलवस्त्र

पांघरुनी मिरवितसे
बुक्क्याचा भाळी टिळा.

गहन गद्य, स्फुरित पद्य
नाट्यछटा ललित ह्रद्य.

विश्वरुप दावितसे,
आदि अंत तीच मध्य...


केशवसुत सुनित गात
होनाजी, शुभ प्रभात.

फंदी फटका घुमतो
रामजोशी कवन गात.

दीपस्तंभ कुसुमाग्रज
रविकिरणी काव्यकुंज.

अगणित नभी नक्षत्रे
गदिमा प्रकाशपुंज.

त्या शांता कोकीळशा
शालीन स्वर ऋजु भाषा.

बहिणाई बोल चढे
अहिराणी उन्मेषा

गुढगुंजन जीए, ग्रेस.
"तें" चा तो नाट्यवेष.

पुलकित जन पु.ल.स्पर्श
नाट्यगीत उधळी हर्ष.

विंदांचे कर दानी
महानोर आबादानी.

मधुरस्निग्ध बोरकर
तपोपूत सावरकर.

सारस्वत गोकुळात
दंग रंगी शब्द संग.

विरहगीत गाई कुणी
मुक्त मत्त कुणी विहंग.

अर्थ झरे तो पान्हा
प्राशिताच शब्दांना.

अम्रुत जरि स्वर्गीचे
मत्कंठी उतरेना

नित्य नवा दिन आम्हास
मराठीच श्वास ध्यास

संतकाव्य आश्रयास
सर्व कला पदी निवास.

आंग्ल जरी ज्ञानकोश,
मराठी, विचारकोष!

स्फुरणाला अनुवादी
तोच मुळी आत्मदोष.

पहा मनोदर्पणात
खोटे जर हे भाषण.

माय तीच! तिच्यातून
जगताचे मग दर्शन.

                       . 🍃संतोष

भय

हे कुठले भय अन् कसले?
जे खोल अंतरी बसले,

त्या जुन्याच प्रश्नशरांच्या,
व्याकुळ अग्रांनी डसले.

कर मना घरे वाळूंची,
अन् सजव शंख,शिंपांनी,

घे मौज करोनी,तुजला
ती लाट पाहते दुरूनी.

गरगरता वादळवारा,
का कुशल पुसे होडीला?

श्वासांची मुद्दल सरता,
ये कोण येथ जोडीला?

आशेची मूर्त घडविता,
ती ठेच लागुनी भंगे.

परि मनांस खोडील चाळा,
ते तिच्याच प्रेमी रंगे.

दुःखाच्या गर्भी सुख ते,
परि अल्पच आयु त्याते.

नवकल्पितसुखस्वप्नाने,
ते सुखच दुःखद होते.

दु:खाची माया गहिरी,
अनुभवअंकावर निजवी.

त्या उथळ सुखांचे डोळे
अंजन घालुनीया भिजवी.

हा जन्म घेऊनी येतो,
मृत्यूची सोबत छाया,

परि धैर्य मनाचे नाही,
हे स्वतःलाच पटवाया.

हा व्यर्थ वाहतो वारा,
शिड होडीचे उभवावे.

भय तयांस अर्पण करुनि,
तो नेईल तेथे जावे.

जो यत्न करावा तो तो,
तोकडाच का मग वाटे

भरतीच्या फुटती लाटा,
ओहटीला ते जल आटे.

स्वच्छंद वाहता वारा,
गिरीगात्रांतच गोठावा.

जलकणयुत जलदांचा,
मग तेथे बांध फुटावा.

जीवन सुमनांची माला,
परि काट्यांसह विणलेली.

जीवन ही पावन गंगा,
परि डुबक्यांनी शिणलेली.

या आंदोलीत खेळाला,
ना अंत असे ना आदि,

पट मांडून कुणी खेळवितो,
आपणाला करुनी प्यादी.

जो चेतवीतो वन्हीला,
तो फुंकर घालून विझवी.

जो जाणिवेस जागवितो,
तो नेणिवनिद्रा निजवी.

चरचरत्या जखमा कोणी,
झाकुनिया, खेळे झिम्मा!

इवल्याशा घावाचेही,
का कौतुक वाटे आम्हां?

झाले आणि होतीलही,
स्त्री पुरुष हिरण्मयदेही,

काळास प्रार्थना इतुकी,
लघु दीप तेवूदे गेही.

त्या दीपांनी ओवाळू,
तेजाने लोचन क्षाळू.

जे स्वीकृतात घुसमटले,
ते आपुले पण प्रक्षाळु.

                   .🍃 संतोष

काळ

भिंतीवर टांगून घड्याळे,
कुणी म्हणाले 'काळ जिंकला!'

काय म्हणावे त्यांना,त्यांचा,
दर्पपरीने कान फुंकला.

परिमाणे शत होती,पुन्हा, होतीलही तो काळ मोजण्या,

हाती लागणे,शक्य नसे तो,अर्थ नसे या व्यर्थ बोलण्या.

तोच होउनि महाकाल मग,दाविल अंती रुप आगळे,

स्थिर काळ अन् आम्हीच भ्रमतो,कळेल जेव्हा,मिटती डोळे!

                    .🍃संतोष

एकांत

एकांताचा महाल सजता,
कोण येतसे बनुनी पाहुणा?

आळस,कंटाळा की शांती?
गजबज? का,कुणी दूत देखणा?

ज्याचे त्याला असते माहित,आपुले अंतर जरी, खूपदा,

एकांतातच होते ओळख,
पुन्हा नव्याने, पुन्हा एकदा.

चहुबाजुंनी जरी उसळल्या,
कोलाहल गर्दी च्या लाटा,

शोधाव्या टीचभर बोटीतून,
निवांत एकांताच्या वाटा..

माझ्या एकांताच्या दारी,
कवितांची सुंदर रांगोळी,

उन्मेषी रंगांची उधळण,
अक्षय अक्षरदीप दिवाळी. ✨

                             . 🍃संतोष

गोपाळकाला

आखलेल्या रेखीव रस्त्यांवर,
शोभिवंत पुष्पांची दाटी

शिष्ट रीतींचे कुशल कशिदे,
जरतारी वसनांच्या काठी.

गावंढ्या त्या गोपाळांना
कशी मुळी ती शिस्तच नाही,

राजपथावर उभवुन पुच्छे,
हुंदडल्या यांच्या त्या गाई.

हुंगून सुमने गेली झिंगून,
गोपाळांची अवघी पोरे

सौंधावर जरी झाली कुजबुज,
मना तुला ती भीड नको रे,

खेळ रंगला,पडले रिंगण,
सुटे शिदोरी,भरले अंगण,

लाज सोडुनि चला खावया,
काल्याला कसचे आमंत्रण?
                 .🍃संतोष

केरसुणी


कोपर्यात शांत उभ्या आहेत
आमच्या केरसुणी बाई,
अंग मोडून रोज करतात
घरातली  सफाई.

ज्याच्या हाती जातील त्यांना,
तैशी येई गती.
काम तेच असले तरी
त्याच्या तर्हा किती?

चुकून फुटल्या काचा,
सुटून सांडला ओचा,
केरवारे नेमाचे,
बाळ पसारे प्रेमाचे.
काडी कचरा, कपटे काय.
आवरून थकतात केरसुणी बाय.

दिसली कुठे टापटीप ,
कौतुक दाटलं मनि
विसरू नका ,राबली आहे.
कुणी केरसुणी.

स्वराज्य ते साम्राज्य


इतिहासाच्या खुणा शिरावर
मिरवीत सह्यकड्यांचा परिसर.
संगमरवरी,ताज जरी ते,
गडकोटांची त्यांना ना सर.

कातळ,डोंगर गर्द कानने,
घुमती त्यातून ती शिव कवने.
रक्त सांडूनि चूल मांडली ,
फुलली त्यातून मग सुखस्वप्ने.

विसर कसा पडणार गड्या रे,
इथेच पडला बाजीप्रभू तो.
इथेच चिरला अफजल,
गर्जे, नरसिंहापरी शिवप्रताप तो.

मुरारबाजी इथेच नडला,
शीर उडाले तरीही लढला.
कोंढाण्यावर तानाजीचा,
होम होऊनि,भगवा चढला.

बाळाजीचे इथेच कर्तब,
पेशवाईचे वाजे डिंडिम,
बाजीराव तो सदैव झुंजत,
रिपुरक्ताचे लावी कुंकुम.

मरहट्टी हट्टाने,तट्टे,अटकेचेही,पाणी प्याली.
महाराष्ट्राच्या छत्राखाली,राज्य भोगते,तेव्हा दिल्ली.

पानिपताचे देत दाखले,नको निधर्मी ते बदसल्ले,
अब्दाली जरी गेला आता,जिवंत अजुनी,त्याची पिल्ले.

वेडी




फिरे वेडी रस्त्यातून ,अजागळ वेष ,
जटा दाटलेल्या शिरी भान नाही लेश

हसे काय स्वत:शीच,फेकी कधी धोंडे ,
कृश काया ,कुपोषित ,सुकलेली बोन्डे.

घृणायुक्त कटाक्षांची तिला बोच नाही
टवाळांच्या बोलण्याची जिवा खोच नाही .

उच्छिष्ट खाऊन किंवा वेंगाडून मुख ,
कशीतरी मीटे तिच्या पोटातली भूक .

रस बीभत्स सावेव ,हे हि रूप तीचे.
टाळू पाहे मन स्मृती ,बंधन भीतीचे.

लाट बाई लाट


लाट बाई लाट
पोळ्या लाट .
पायात गोळे
कंबर ताठ .

सुटला पाहिजे
नाजूक पदर .
तरीच होईल
थोरात कदर .

पोळी हवी
गोल गोल.
तेव्हा निघतील
कौतुक बोल. 

वाट बाई वाट
पुरणाचा घाट
चटण्या लोणची
भरलेलं ताट .

स्वयंपाक केला
खपून खपून
टीचभर पोटात
गेला लपून .

लढा


फ्रॉकमध्येच पोर,
तरी जीवा घोर.

कायद्या माथी फोडतो खापर,
वाटतं वाचू नये पेपर.

उगी मन होतंय कष्टी,
दृष्टी आड बरी सृष्टी..

गढूळ,किरट्या, फिरत्या नजरा,
झटकून गेल्या पुढे.

सावित्रीच्या लेकी लढल्या
अदृश्यसे लढे.

वाटलं नव्हतं,नजरा अशा अजगर बनून वळतील,
अल्लड अवखळ बागडणारी सुंदर हरणं गिळतील!

पुन्हा एकदा नवीन युद्ध पदर खोच बाई
नजरा वयात येण्याआधी घडव होऊन आई.

आहे आता सोबत त्याची, एकाकी ना लढा,
तोडून तुटेल ,सोडवून सुटेल, अवघड तसला तिढा.

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...