Thursday, August 6, 2020

निःशब्द

निःशब्द तळ्याच्या काठी, 
मी झाड चिंब भिजलेले.

निःशब्द धरेच्या पोटी 
मी बीज पुन्हा रुजलेले. 

निःशब्द आता हा वारा 
डोंगरापलीकडे निजला. 

स्वप्नात हळू हुळहुळला  
त्यां हरिततृणांचा शेला.

निःशब्द कोटरी पक्षी 
पंखांत खुपसुनी चोची 

भवताली ती न्हालेली 
अन पिले पर्णपाचूंची.

निःशब्द शब्द सुचताना, 
जंव शिशु स्तनी लुचताना. 

मौनात षड्ज घुमताना, 
त्या फिक्या हरकती ताना.

निःशब्द तृप्तता सारी, 
नभ नीलार्द नयनी भोगे, 
 
ते सांगून झाले अवघे, 
जे होते कथनाजोगे.

तो जाईल पाऊस आता 
त्या दूर देशीच्या गावा. 

मी वेळूच्या गात्रांचा 
तो मंतरलेला पावा.

                               .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...