पाऊस
ऋतू बदलला की सृष्टी बदलते, नवं रुप घेते. मग सृष्टीचा अविभाज्य भाग असलेला माणूस आणि त्याचं मन हेही बदलत असलं पाहिजे.नाही का?
आठवतोय पहिला पाऊस?
कसा येतो बरं....
उन्हाच्या झळा असह्य होत असतात,घामानं नको नकोसं झालेलं असतं. न राहावून पुटपुटत असतो आपण...
आज काय गरम होतय नाही?
पटकन पिकल्या केसांचं कुणीतरी म्हणून जातं,पाऊस येणार बहुतेक आज !
आणि तसा तो येतोही, आमंत्रणाची वाट पाहात असल्यासारखा!
लहानपणी पहिला म्हणून भिजायची मुभा घेऊन येणारा, हवाहवासा वाटणारा पाऊस आता अनोळखी राहिलेला नाही, पण त्याची पुरती ओळख झाली असंही म्हणता येत नाही.
त्यामागचं कमी दाब, मोसमी वाऱ्यांचं शास्र आता माहित झालं असलं तरी थोडा वेळ तरी ते विसरून लहान मुलांच्या अनिमिष डोळ्यांनी पाऊस भोगावा असं वाटायला लागतं..
पाऊस हा फक्त डोळ्यांनीच नाही तर सर्वांगाने,पंचेंद्रियांमार्फत अनुभवण्याचा विषय आहे.
झरझर झरणाऱ्या सरी हवेत रेघा मारल्यासारख्या, क्षणभराचं आपलं अस्तित्व मातीशी एकजीव करून टाकतात आणि कस्तुरी अत्तरात मिसळल्यासारखा तो सुगंध नाकावाटे थेट मेंदूचा ताबा घेऊन टाकतो.
पावसात जाण्याचं कितीही टाळलं,तरीही हातांच्या तळव्यांना निदान ओंजळभर तरी पाऊस झेलावा वाटतोच आणि ज्या श्रद्धेनं एखादा वैष्णव 'विष्णोपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहं 'म्हणून तीर्थ प्राशन करेल त्याच श्रद्धेनं ती ओंजळ ओठाला लावावीशी वाटते.
पावसाचं वय किती ?कुणाला माहित? पण प्रत्येकाबरोबर पाऊस त्याच्या वयाचा होतो आणि त्याच्या अनुभवसृष्टीतला भाग नव्हे तर एक सुहृद बनून जातो.
लहानपणीचा ये रे ये रे पावसा किंवा सांग सांग भोलानाथ म्हणताना अनुभवलेला पाऊस,
थोडं मोठं झाल्यावर ओहोळ, नाल्यात कागदाच्या होड्या सोडताना अनुभवलेला पाऊस.
कुमारवयात पावसावर केलेल्या, त्यावेळी उत्कट वगैरे वाटलेल्या अल्लड कविता, वहीच्या मागच्या पानांवर लिहिताना साक्षी असणारा पाऊस,
अडनिड्या वयातली पावसाच्या लयीबरोबर वाढणारी श्वासांची लय स्वतःच्या संततधारेत विरघळवून टाकणारा पाऊस,
कॉलेज मध्ये चित्रपटांमधला पाऊस प्रत्यक्षात अनुभवतोय अशी स्वप्ने कधी कधी दिवसासुधा पहायला लावणारा पाऊस.
लग्नानंतर येणारा प्रेमात चिंब भिजलेला पहिला पाऊस,
दुपटी भिजवणारा दुसरा किंवा तिसरा पाऊस,
आणि डबा घेऊन रोज कामाला जाणाऱ्या चाकरमानी माणसासारखा कधी मधी रजा घेत पण नेमाने येणारा पाऊस.
उतारवयात कधी कंटाळवाणा, संधिवातामुळं नकोसा झालेला,तर कधी अचानक वाफाळत्या चहाबरोबर चिरतरुण होत जुन्या आठवणींचे तुषार अंगावर घेताना शहारलेला पाऊस.
पाऊस हा अंतहीन आहे.
बाहेर थांबला तरी आत बरसून जातो आणि,
बीज पेरल्यासारखा आपला एक ओला थेंब ठेऊन जातो,
वर्षभर जपण्यासाठी!
परत भेटण्यासाठी!
.🍃संतोष
No comments:
Post a Comment