झिम्माड झिम्माड झालं गं सई,
पाऊस बोलका थांबत नाही!
किती ही बडबड, तुषारांची ही लड!
मुर्दाड! दारात उभाच बाई!
पाऊस बोलका थांबत नाही..
खिडकीत टपून, पाहतो वाकून
खोचला पदर तसाच राही,
पाऊस बोलका थांबत नाही..
दारांच्या फटींशी,कड्यांच्या मुठींशी,
थेंबांच्या टिपऱ्या खेळत राही,
पाऊस बोलका थांबत नाही..
निथळे मालती,पाहते खालती,
शहारे शेवंती, जाई नि जुई.
पाऊस बोलका थांबत नाही..
पानांत थेंबोळे,सरकती पागोळे
आकाशाचे तळे आटत नाही?
पाऊस बोलका थांबत नाही..
आता ये मनात, स्मृतींच्या बनात.
तिथे काही कुणी हटकत नाही.
पाऊस बोलका थांबत नाही..
झिम्माड झिम्माड झालं गं सई,
पाऊस बोलका थांबत नाही...
No comments:
Post a Comment