Friday, August 14, 2020

भाष्य

जाईजुईच्या कोमल कविता

वेलींवरती नाही उरल्या.


बाभूळकाटा निवडुंगांनी

मनामनातील जागा भरल्या.


पुळचट पौरुष सज्जनतेचे

सर्जनतेला कोण विचारी? 


जरा विखारी दिमाख दावी

तोच पुढारी, तोच विचारी! 


करपून गेल्या स्वातंत्र्याचा

फक्त कोळसा उरला हाती


कीती उगाळा शून्य परिणीती

करतल काळे, कष्ट! फजिती! 


कशास यात्रा महापुरुषांच्या

कशास शपथा छाती ठोकून.


शब्द पुरेसा, का अवडंबर

काय मिळाले कविता घोकून?


गजबजलेली गर्दभगर्दी

दिव्य तयांची गायनशाळा.


रसिकजनांची अंगतपंगत

सहिष्णुतेचा मनी उमाळा.


कर्तुत्वे जी थोर खरोखर

मुकपणाने करत निर्मीती.


खळबळ होते डबक्यांमधुनी

दर्दुरचित्ती कर्दमप्रीती!


भरकटलेली भुंकभाषणे

कोण कुणाचे तोंड धरावे?


मनी चिडावे?गप्प बसावे?

रोज लढाई! रोज हरावे?


मौनाच्या डोहावर थिजला

निब्बरतेचा तवंग काळा


हंस उडाले मोरही गेले

छद्ममुनीश्वर उरला बगळा.


तेवत ठेवा दीप चिमुकले

घ्रुत श्रद्धेचे नित्य मिळूदे.


अग्निहोत्र खंडित ना होवो

खंडितबुद्धी त्यात जळूदे.


सूर्यकिरण सम सात्विकतेचा

तेजोमय सहवास घडावा.


संतचरणरज सौभाग्याने

कुश्चळ काळा कली झडावा.


                            . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...