Thursday, June 4, 2020

क्षण सुचण्याचा

क्षण सुचण्याचा जणु स्फोटासम
परि चांदणे त्यातून फुटते.

मौनमिठी मन सोडून उठते,
खूण पुन्हा पुर्वीची पटते.

स्फोटच! पसरे परि शांतता
शितल शामल शब्दशहारा.

गाफील होतो तर्क जरासा
उठे तयाचा शिष्ट पहारा.

या स्फोटांच्या जखमांमधुनी
स्रवते अत्तर घाव मखमली.

गंध दरवळे धूपाचा अन्
तेजातच ती जाणीव लपली.

ह्या स्फोटांतून होते क्रांती.
युद्ध चळवळी मागून येती.

इथेच विरतो कोलाहल अन्
इथेच मिळणे अंती शांती.

ज्यांना झाले घाय इथे ते
शूर शिपाई मनसीमेवर.

हेच सुरेश्वर अन् लयसागर
गाणे यांचे अचूक समेवर.

नियमित नेमिक अन् चौकोनी
चाकोरीचे जे अभिमानी.

घायाळांचे तुम्हा आवाहन
एक तरी घ्या घाव ईमानी.

क्षण सुचण्याचा आला गेला
छेडून दीड दा शब्द सतारी

स्पंदन उरले तेच गुंजते
पुनःप्रत्यये साक्षात्कारी!

                              . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...