Thursday, April 9, 2020

पवन पाहुणा

पवन पाहुणा टकटक दारी,
करुनी विचारी, आत येऊ का?

बावरली ती गवाक्षद्वारी!
आणि म्हणे, मी दार लावू का?

त्याची खटपट फटीफटीतून
कडीकोयंडा हलवून पाही

भिरभिर चाहूल चहूबाजूंनी
जरा जीवाला उसंत नाही.

कुणी म्हणे, आला तर आला!
पाहुणाच तो!फिरेल मागे.

उरांत धडधड घेऊन का गं
असे पाहसी रागे रागे!

"तुज ना माहीत खोड तयाची
पुरती आहे मी हे जाणून."

येईल, जाईल, स्वच्छंदी तो!
परि मनी दर्या येई उधाणून.

घुसळून आठव स्म्रुतींचे ताटव
विसळून क्षण ये स्वप्नी उसळून

 मीपण वितळून जाईन मी त्या
 नादावून नादांते मिसळून.

म्हणून टाळते मजला भिती
नव्हेच त्याची परि इतरांची.

काय बहाणे सांगू कोणां
विस्कटता घडी निजवस्त्रांची.

वाट पाहते त्या दिवसाची
लाजफुले गळतील पायाशी.

तनमन सारे उधळून त्याला
एकत्वे कवळीन ह्रदयाशी!

                              . 🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...