सांजसाउल्या सरकत आल्या
क्षितिजावरचे पिऊन केशर
दूर आक्रुती पैलतटावर
सख्या तुझी रे निवळे धूसर
व्योमपटी मेघांच्या वक्षी
रेखीत पक्षी,पळती नक्षी.
मनी मारवा झिरपत राही
शुक्रचांदणी पश्चिम कुक्षी
बटांत खेळुन जाई सांगून
तवमिलनाचा निरोप वारा.
किती युगे मी वाट पाहते
रोज मांडुनी संधीपसारा.
जोवर जागी जुनी आठवण
जोवर नेत्री दीप आशेचे
तोवर ये रे ऐलतटावर
भय मजला निष्ठुर निशेचे.
होईल अंबर झुलते झुंबर
चांदणचांदी वर्ख माखुनी
कुठले मिलन भुलता स्वप्नी
जाईल निद्रा वेस आखुनी
सरले यौवन थकली गात्रे,
सर्व रिकामी माझी पात्रे.
ये रे आता पुसण्याआधी
संधीकालची व्याकुळ चित्रे.
. 🍃संतोष
No comments:
Post a Comment