Saturday, July 25, 2020

मुरलीमाधव


हळुवार फुंकरीमधुनी
तो कृष्ण स्वरांसम वाहे
जी निर्मळ अंतर्बाही
ही मुक्त बासरी आहे.

लालस ओठाची शय्या
तिजसाठी ही स्वरमाया
ते नादब्रह्म कवळाया
आतुर ही मुरली आहे.

जो निर्गुण अन निःसंगी
जो भोग भोगता योगी
त्याचे चित् यौवन भोगी
ही मुरली राधा आहे.

ते गुंजन इंन्द्रियरंध्री
अद्वैती लागे तंद्री
नर नाही,नाही पुरंध्री,
तो मुरलीमाधव आहे.
.........

तो नाद गोकुळी घुमता
गोपींची तुटली ममता
नादाशी हो समरसता
ही कृष्णभुलावण आहे.

ती भूमि गोपजनांची
अन प्रीती सरलमनांची
ती कदंबछाया वनीची
स्मृतिगंधीत केशव आहे.

तो उद्धव दिङ्मुढ झाला
अन कृष्णामृत हे प्याला
तो आतून गोपी झाला
हे  ज्ञान सुकोमल आहे.

ही स्वयंसिद्ध अभिलाषा
ही निखळ प्रीतीची भाषा
नच आशा येथ निराशा
हे भाग्य सुगंधित आहे.

आणखीन सुचलेल्या काही ओळी....


No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...