ते फक्त तीनशे होते
परि भीष्म द्रोणसे होते!
हातांत खुल्या तलवारी,
अन् पाय अचलसे होते!
ती झुंड मुसंडी मारे
म्लेंच्छांचे आले भारे
मारा मारा कापा रे!
दुमदुमले ते हाकारे.
दमदार बाहू फुरफुरले
उरी तेज चंडीचे भरले
अंगात रुद्र संचरले,
शत अभिमन्यू रणी शिरले.
गरगरा फिरे तो बाजी
जंव सूर्य ग्रहांच्या माजी
घेऊनीया बंधू फुलाजी
प्राणांची लावीत बाजी.
ती फिरते नच समशेर,
जणू चक्र सुदर्शन फिरते.
शिशुपाल शेकडो कंस
हतवीर्य करोनी चिरते.
जणू अग्नीकुंड धगधगते
समिधांसम रिपुंना गिळते
किती यत्न लाविले बळ तें,
परि वाट पुढे ना मिळते!
तनु लालतांबडी झाली
रक्ताने भूमी न्हाली.
वस्त्रांची झालर झाली,
परि शस्त्र न येई खाली.
तो थकला जिद्दी सिद्दी,
कोठून ही झाली बुद्धी!
हा सैतान की ह्या सिद्धी?
खिंडीत सैन्यअवरूद्धी!
मग मागविली बंदुक,
बाजींवर धरिला रोख
ती गोळी सुटे निर्धोक,
बाजींचा जाई झोक..
तरीही धडपडती,उठती,
नच नेत्र आपुले मिटती.
कर शस्त्र धराया झटती,
शिवराय..तोफ..पुटपुटती.
व्याकुळ प्राण कानांशी,
'मी शब्द दिला शिवबांसी'
रोखीन घोडखिंडीशी,
जाऊ न देई मसूदाशी.
अन् तोफ खुणेची झाली,
स्मितरेषा वदनी आली.
क्रुतक्रुत्य जीवने झाली
त्या पावन खिंडी खाली.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment