Sunday, March 28, 2021

सिकंदर आणि सिंधू


मत्त हत्तीच्या मदात भिजला अश्व यशाचा माझा,

मी प्रुथ्वीपती, मीच सिकंदर ,मीच येथला राजा!


पायी पर्शिया,अर्धा आशिया, सिंध बलोच ही आहे.

जगती जिंकून घेईल मजला कोण असा तो आहे?


न्रुप थोर अन् महावीर मी भूमीवर लोळवले,

पराक्रमाची शर्थ करोनी राज्य असे मेळविले.

तारांगण ही कवेत घेईन,चुरगाळीन नक्षत्रे,

पौरस,दारस क्षुल्लक राजे,हलवीन मी न्रुपछत्रे.


ओलांडीन मी समुद्र साती,पोलादी ही छाती,

आहे वांच्छा,सूर्य गिळावा,चंद्र पिळावा हाती.

ज्वालामुखी चा लाव्हा बनुनी,पोळावे दिनरात,

वन्ही होऊन वन जाळावे तसे रिपु समरात.


खडकावरती घेई धडका जसा जलधि फेनिल,

अथवा दाटे,घेरुन टाके,क्रुष्णमेघ नभ नील.


कराल दाढांतुनी कालीची,जिव्हा,वीजेचा लोळ,

कुरूक्षेत्रीच्या शंखध्वनीपरि,अवचितघनकल्लोळ.


तसा दरारा माझा,देतो दहा दिशांना आज्ञा,

झुकवुन माना,गजपती,हयपती,नडे,कुणाची प्राज्ञा?


दिसे पुढे ती खळखळ वाहे विशाल पात्री, सिंधू.

नदी नव्हे ही महानदचि जणू नावासम वा सिंधू!


सिंधू जर का ओलांडीन मी,भारतभू घेईन,

आणि खरोखर त्रिखंड जिंकून जगजेता होईन.

परि जिद्द ही पटे न सर्वां सैन्य अतां चुळबुळते,

पुढे जावया पद रेटेना,निष्ठाही डळमळते।


भुकेजलेले कोणी,कोणी धीर खचोनि पडे, 

कुणी जाहले उतावीळ ते नेत्र पश्चिमेकडे.

वाट अडवुनी नागिण पडली तशीच सिंधू पुढे,

आणि सिकंदर प्रिय सैनिकांमाजी एकटा पडे!


कधी न अडला घोडा आता परत फिराया वळे,

अंतरातला विश्वविजेता मूकपणाने जळे!



उपसंहार:-


हिच सिंधू जी हिंदरक्षिता,ग्रीकभक्षिणी झाली,

पुढे मौर्य अन् चाणक्याला सूचित करूनी धाली.

जनगणमन म्हणताना का ही जिव्हा अडे तिजपायी?

सिंध,सिंधु ही खंडीत धुंडीत विभागलेल्या देहीं.

मला वाटते प्रश्न विचारी,सिंधु भारतीयां ही! 

मम पात्री ह्या रवीबिंबाला अर्घ्य कोण ते देई?

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...