हिरमुसलेली परी पंखहीन
पाय चालली ओढत ओढत.
दुःख अनामिक घेउन पदरीं
पिसे खुणांस्तव सोडत सोडत.
पवना जा रे हळुच अलगद
मौनकळी फुलते का बघ ना!
जा पक्ष्यांनो शीळ ऐकवा
अळिमिळी सुटते का बघू ना!
काय करावे उमगेना त्या
खारुताईला पडले कोडे!
उगाच बुलबुल घिरट्या घाली
बोलून पाही वाडेकोडे!
पारंब्या पसरून पाहतो
वड म्हातारा मिश्कील हासे.
ठावे सारे काही त्याला,
परि वागणे तटस्थ भासे.
कलला दिनकर पश्चिमेकडे
अंधुक झाली द्रुष्ये भवती.
निशा नाचवी नवीन पात्रे
रातकिडे ते किरकिर करती.
कसे कळावे मनातले अन
कसे खुलावे हसू लाघवी.
नभी चांदण्या चिंतीत वरती
आणि चंद्रमा रात्र जागवी.
मिटले डोळे तिचे परी नच
निद्रा घाली तिजवर पाखर,
अंधुकश्या मनीच्या स्वप्नांची
अश्रूंतच विरघळली साखर!
कोण परी ही?नव्हे कल्पना!
नव्हेच आशा, नव्हे निराशा
नव्हे घडीव सोनेरी भाषा.
अनुकंपा नच ,नव्हेच समता.
ही आपुली संवेदनक्षमता!
संवेदनक्षमता ही आपुली
पहा कशी ती मलूल झाली!
कसे जपावे तिला,मलाही ठाऊक नाही!
कसे रुचावे तिला जगातील घाऊक काही?
ती यावी परतून म्हणून करा काहीही,
द्या बुडी खोल वा पहा दिशा दाहीही.
असले काही उत्तर तर
द्या धाडुनी मजला.
हा विशाल वाडा तिच्याविना
शब्दांचा सजला!
.🍃संतोष
No comments:
Post a Comment