Wednesday, March 3, 2021

वैनायक वृत्त

 *ये मृत्यो ! ये तू ये यावयाप्रती*

*निघालाच असशील जरी ये तरी सुखे.* 


काय आहे हे? काहीतरी अद्भुत लिहिलं आहे एवढं मात्र जाणवतय?  

या आहेत सावरकरांच्या एका कवितेच्या पहिल्या ओळी... 


अक्षरश: हजारो पानांचे सावरकरांचे साहित्य हे विविध लेख,नाटकें,ग्रंथ, कमला आणि गोमांतक यांसारखी खंडकाव्ये आणि इतर स्फुटकाव्य यांनी समृद्ध आहे. 


थोर व्यक्तींना असामान्यत्व किंवा देवत्व प्रदान करून आपली सुटका करून घ्यायची आपली खोड जुनी आहे.

त्यातून अंदमान येथे त्यांनी काव्य कसे रचले, पाठ केले याच्या फक्त कथा आपण ऐकत आलो आहोत.

म्हणूनच त्यांच्याच एका पुढे प्रसिद्धी पावलेल्या कवितेतून त्यांची त्यावेळी काय मनोभूमिका असेल हे जाणून घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.. 

 

तुरुंगात केलेलं काव्य कसं जन्माला आलं असावं याचा तर्क त्यांचं चरित्र वाचताना बांधता येतो. 


आजूबाजूला नैराश्य पसरलेलं,शरीर यातना सहन करत कुपथ्य,अपचन यांना वेळोवेळी बळी पडत असलेलं, 

यावेळी मनातल्या नैराश्यावर मात करण्यासाठी काव्य प्रतिभेचा त्यांनी उपयोग करून घेतला असावा.

शरीरावर तुरुंगाधिकारी ताबा दाखवू शकत होते, 

मन तर मुक्त होतं ना !ते त्यांनी कवितेत गुंतवून टाकलं.


सुरुवातीला अनुष्टुभ सारखा सरळ  छंद त्यांनी कमला या महाकाव्यात वापरला परंतु त्याचे नियम त्यांना सुरुवातीला आठवेनात,ते कुणाकडून मिळतील अशी शक्यताच नव्हती. स्मरण शक्ती ला ताण दिल्यानंतर पुढे ते आठवले. 


मात्र नंतर त्यांनी स्वतःच  स्वतःला अनुकूल होईल असे जे वृत्त निर्माण केले होते त्यात गोमांतक महाकाव्य लिहिलं. त्याचं नाव *वैनायक वृत्त*.


त्यांना तीन वेळेस प्रबळ नैराश्य आले.  (डिप्रेशन).तीनही वेळेस त्यातून

ते इच्छाशक्ती च्या जोरावर बाहेर पडले.त्यातील एका प्रसंगी,शरीर आजाराने,श्रमाने गलितगात्र झालेले असताना त्यांना वाटलं की बहुतेक आता सगळं संपलं.....

आता मृत्यू येणार. 

त्यावेळी तीच चिवट इच्छाशक्ती कवितेच्या रूपात बाहेर पडली. 

तीच ही वैनायक वृत्तातील कविता.      *मरणोन्मुख शय्येवर*

 

वैनायक वृत्त फारसं कुणाला माहिती नसावं. या वृत्तात सावरकरांच्या मूर्ती दुजी ती, वीर बंदा अश्या काही कविता आहेत. 

या वृत्ताचे वैशिष्ट्य असं आहे की ये निर्यमकी, म्हणजे यमक नसलेले म्हणजेच मुक्तछंदी आहे पण मात्रावृत्त असल्यामुळे नियम बद्ध आहे,चालीत  म्हणता येते. 

दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुढील चरण,  मागील चरण यात अन्वय म्हणजेच सुसंगती आहे. 


हे वृत्त म्हणजे यमक म्हणजे कविता, असं समजणाऱ्या चाकोरीपंडितांना,आणि स्वैर उतारे लिहून त्यांना 'मुक्त छंद कविता' समजणाऱ्या नवकवींना एक धडा आहे असं मला वाटतं.


याचं व्याकरण असं आहे-

गा गा गा, गा गा गा, गा ल गा ल गा.

2  2  2,  2,  2,  2, 2, 1, 2, 1, 2.


थोडक्यात 6, 6 चे दोन आणि पुढे 8 चा एक असे खंड आहेत.


अर्थातच मात्रा वृत्त असल्यामुळे 

मधल्या खंडात, गा गा गा ऐवजी 

गा लल गा, किंवा गा लल लल अशी मोकळीक आहे.


नुसतं व्याकरण कितीही लिहिलं तरी म्हटल्याशिवाय त्याचं आकलन होत नाही,आणि सौंदर्य ही कळत नाही. 

म्हणून, पहिला काही भाग मी म्हणून दाखवला आहे. 


ही दीर्घ कविता आहे. संपूर्ण कविता नेट वर उपलब्ध आहे,शोधून,चालीवर म्हणून पाहायला हरकत नाही.लिंक दिलेली आहे.


हे वृत्त समजून घेण्यासाठी त्याच वृत्तात फक्त उदाहरण म्हणून मी काही सोप्या ओळी रचल्या आहेत त्याही देतोय.

वृत्त कळावं इतकाच उद्देश. 


जा तू जा मेघा जा वर्षण्या पुढे 

तप्त काहिलीच जणू पृथ्वी जाहली. 

शीतलता वाऱ्याची छळून चोरली 

रवीला त्या कैद करी संपुटांबळे. 


उष्ण ओठ धरणीचे विलग जाहले 

धार धरी त्यावरी अन सुखवी कौतुके, 

देई दान जीवन पान रिक्त तृप्त हो,

चाल पुढे वायू सवे,पुढील देशी रे.

----

पुढील देशी,जाशील तरी, विसर ना पडो, 

पुढील वर्षी याच स्थळी ,गाठ तुझी पडो.

( इथं माझ्यातला यमक्या जागा झालाय 😃)


सावरकरांचा अप्रकाशित पैलू उजेडात आणण्यासाठी केलेला हा एक अल्पसा प्रयत्न.


                                  .  🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...