Wednesday, March 31, 2021

दाखला

 

मिचमिच डोळे,पाठ कमान

लटलट थोडी हलते मान,


हाती काठी तिसरा पाय,

हळूहळू ती टेकत जाय.


चेहऱ्यावरती ग्रीष्म किती!

नजर करारी, नसे भिती.


कुठे जातसे,कुतूहल दाटे 

अंदाजांना अनंत फाटे. 


हाती पुस्तक कागद काही,

चाचपुनी वरचेवर पाही.


आजी काही मदत हवी का?..

...लुकलुकल्या डोळ्यात तारका


म्हणे मुला मज उमजत नाही

पहा तुला का कळते काही?


पाहुनी कागद ओशाळे मन,

अगतिकसे ये अवघडलेपण!


नव्हता विठ्ठल!....पुढची वारी?..

बोळक्यातले हसू विचारी!


व्रुद्ध जिद्दीचा बुरुज झुंजत

मरणापुढती उभा ठाकला!


अन् कागद हे तिला सांगती,

जिवंततेचा हवा दाखला!


                                    .🍃संतोष

Monday, March 29, 2021

प्रश्न (बालकविता )

कधी कधी मला काही 

कळतच नाईं!


असं का गं मोठी माणसं

वागतात,सांग आई?


नेहमी खरं बोलावं हं!

बाबा सांगत असतात.

घरात नाही,निरोप ठेवून

खोलीत जाऊन बसतात.


साधी रहाणी उच्च विचार!

सांगत असते ताई,

आरशासमोर नट्टापट्टा

कित्ती करते बाई !


कम्प्युटरवर बघत दादा

बडवत बसतो बोटे,

देत नाही मला,

दमते,खेळून सागरगोटे!


लहान आहेस अजून!

असं आजोबा म्हणत असतात,


मोठी झालीस! म्हणते आजी,

तेव्हा फक्त हसतात!


आता ठरलयं माझं गुपचूप

देवबाप्पा पुढे,


भरभर होईन मोठी!

कुण्णाला सांगू नको हे गडे!


                                    .🍃संतोष

भाजी ( बालकविता )


भाजीवाल्या मावशींच्या

डोक्यावर पाटी!


काय काय भाजीपाला

कुणा कुणासाठी?


आजीसाठी लाल माठ 

आणि पालक,अळू,


पालेभाजी हवीच,म्हणते

अळूवड्याही तळू.

 

तिखट तिखट 

मिरच्या हिरव्या,

आजोबांना हव्या,


लोणच्यासाठी आणून देतो

म्हणती बरण्या नव्या.


बाबा घेतात कोबी फ्लॉवर

डब्यात भाजीसाठी,


ताई घेई छोटी वांगी

भरून करण्यासाठी.


भेंडी पडवळ,कडू कारली

आई सगळं घेते,


कोथिंबीर कडीपत्ता लिंबू

आले जरासे नेते.


मला आवडे लाल टमाटा, 

आणि गाजर गोड,


देते आई चिरता चिरता

हळूच खाया फोड.


                                    .🍃संतोष

Sunday, March 28, 2021

सिकंदर आणि सिंधू


मत्त हत्तीच्या मदात भिजला अश्व यशाचा माझा,

मी प्रुथ्वीपती, मीच सिकंदर ,मीच येथला राजा!


पायी पर्शिया,अर्धा आशिया, सिंध बलोच ही आहे.

जगती जिंकून घेईल मजला कोण असा तो आहे?


न्रुप थोर अन् महावीर मी भूमीवर लोळवले,

पराक्रमाची शर्थ करोनी राज्य असे मेळविले.

तारांगण ही कवेत घेईन,चुरगाळीन नक्षत्रे,

पौरस,दारस क्षुल्लक राजे,हलवीन मी न्रुपछत्रे.


ओलांडीन मी समुद्र साती,पोलादी ही छाती,

आहे वांच्छा,सूर्य गिळावा,चंद्र पिळावा हाती.

ज्वालामुखी चा लाव्हा बनुनी,पोळावे दिनरात,

वन्ही होऊन वन जाळावे तसे रिपु समरात.


खडकावरती घेई धडका जसा जलधि फेनिल,

अथवा दाटे,घेरुन टाके,क्रुष्णमेघ नभ नील.


कराल दाढांतुनी कालीची,जिव्हा,वीजेचा लोळ,

कुरूक्षेत्रीच्या शंखध्वनीपरि,अवचितघनकल्लोळ.


तसा दरारा माझा,देतो दहा दिशांना आज्ञा,

झुकवुन माना,गजपती,हयपती,नडे,कुणाची प्राज्ञा?


दिसे पुढे ती खळखळ वाहे विशाल पात्री, सिंधू.

नदी नव्हे ही महानदचि जणू नावासम वा सिंधू!


सिंधू जर का ओलांडीन मी,भारतभू घेईन,

आणि खरोखर त्रिखंड जिंकून जगजेता होईन.

परि जिद्द ही पटे न सर्वां सैन्य अतां चुळबुळते,

पुढे जावया पद रेटेना,निष्ठाही डळमळते।


भुकेजलेले कोणी,कोणी धीर खचोनि पडे, 

कुणी जाहले उतावीळ ते नेत्र पश्चिमेकडे.

वाट अडवुनी नागिण पडली तशीच सिंधू पुढे,

आणि सिकंदर प्रिय सैनिकांमाजी एकटा पडे!


कधी न अडला घोडा आता परत फिराया वळे,

अंतरातला विश्वविजेता मूकपणाने जळे!



उपसंहार:-


हिच सिंधू जी हिंदरक्षिता,ग्रीकभक्षिणी झाली,

पुढे मौर्य अन् चाणक्याला सूचित करूनी धाली.

जनगणमन म्हणताना का ही जिव्हा अडे तिजपायी?

सिंध,सिंधु ही खंडीत धुंडीत विभागलेल्या देहीं.

मला वाटते प्रश्न विचारी,सिंधु भारतीयां ही! 

मम पात्री ह्या रवीबिंबाला अर्घ्य कोण ते देई?

Thursday, March 25, 2021

संवाद


तो -

दाट अंधाराची साय, 

त्यात भिजती चांदण्या.

तुझ्या डोळ्यातले उन

तरी का गं मावळेना?


उष्ण उसासेही गेले

गेले गर्द गहिंवर.

परि नजरेच्या काठी

दिसे अनोळखी पूर.


मुके ओठांचे टपाल,

नाही पत्र चिठ्ठी तार,

फक्त ऐकू येते तुझी

मध्यरात्रीची सतार.


ती -


नको छेडछाड करु

माझ्या आतल्या तारांशी

किती सायास करुन

षड्ज जुळला स्वतःशी.


माझे उन माझ्यापाशी

आहे जुने अविनाशी.

जेव्हा भिजते हे मन

तेव्हा धावे त्याच्यापाशी.


तुझा हात हवा हाती

नको मला तुझा खांदा.

तुझ्यासवे मनोभावे!

आत मनाचा पोशिंदा.


                                   .🍃संतोष

Wednesday, March 24, 2021

वसंत


वृत्त - वसंततिलका.


आला वसंत हलके,म्रुदु पाउलांनी, 

येताच व्रुक्ष लतिका,भरती फुलांनी.

गंधांत गंध मिसळे,उसळे सुगंध,

शाखांस पुष्प झुलती,जणु बाजुबंद.


तेथे पलाश इकडे फुलला बहावा 

नाजूक कोंब,फुटवा,नयने पहावा.

येती तयास पुढती मग स्वर्ण घोस 

जाते सुदूर कीर्ती कित्येक कोस.


तैशी पलाश तनूही मग रक्तवर्णी   

माखून लाल उटणे जणू पुष्प पर्णी.

येतो बहार दारी गुलमोहराला,  

शोभे छटा सुरेख नीलमोहराला.


काटेच अंगभरुनी जरी शाल्मलीला.

ल्याली सहस्त्रपंखी पुष्पे दुशाला.

ऐसेच कांचन,कुडा अन् पांगिरा हा

गेळा,अशोक,करमळ सुमलाजरा हा.


स्वांगे धरी वसंत जणू देवचाफा

श्वेतांबरात किंवा करी भस्मलेपा.

ऐसा वसंत फुलता,कवी ये भरासी

गाते वसंततिलका,कुसुमाकरासी.


    

                                  .🍃संतोष

Monday, March 22, 2021

सांज


सांजभूल,दिवेलागणीच्या वेळी, 

गेली,निसटली,मानस मासोळी.


जशी रात्र लख्ख चांदण्याची भाषा,

किंवा दिस दावी ठळकशा रेषा,


तसे हिचे काही सांगता ना येई,

वाही पालखीत नहुषाचे भोई.


म्हणे आता शोधा उत्तरेला तारा

आणि तिथे द्रुष्या अद्रुष्य किनारा!


दिन क्षितिजा पल्याड दूर जाई,

रात्र विंगेत नटून वाट पाही.


हिचे औट घटकाच राज्य जरी,

आणि अंधुक दिशांचे मानकरी, 


खोल काळजात आत उठे ठसा

वरपांगी करु काही मिटे कसा?


झुंजूमुंजू होई त्याचे प्रतिरूप,

तरी वेगळेच संध्येचे स्वरुप.


कोरी चंद्रकोर तिची पडछाया,

किंवा फिकटला अत्तराचा फाया.


दूर पाण्यावर हलणारी होडी

किंवा धुक्यामधे दऱ्यांतील खेडी.


शांत डोही,पडे खडा,डहुळते 

आणि उठती तरंग हळू तेथे.


तैशा तरंगांची भाषा तिला येते, 

कसे करू त्याचे भाषांतर येथे? 


कसे चीक पडद्यांचे तिचे घर!

दिसे,तरीही न दिसे खरोखर.


तिचे आर्त तिच्या हृदयात झरे 

आणि तीची मिठी सृष्टीभर उरे.


ओली वाळू पायी,लाट फिरे मागे

किंवा पीळ हाती, सुटतात धागे, 


तसे तिचे वाजे कानी अलगुज,

कळे काही,राही काही,गुढ गुज.


घरी फिरे जेव्हा पाखरांची भिरी 

चुके चुकार पाखरू कोठेतरी,


त्याच्या मनी तेव्हा जे जे काही होते

ते ते सारे तिच्या रुपे प्रसवते.


नव्हे सांज धुंद प्रमदा पदर,

नव्हे षोडशी बालिका मनोहर,


हिने खेळविली किती युगबाळे?

हिचे स्तन्य किती अंगांतून खेळे!


तिचे नेत्र तृप्त, तरीही विरक्त,

स्निग्ध द्रुष्टी केश मोकळे विमुक्त,


जैशी योगिनी तापसी एकभुक्त

बसे ध्यानमग्न ध्यात गात सूक्त!


जप गायत्री,सामगे,दशपथे,

पुढे यज्ञहीन यज्ञ-उपवीते!


सारे तिच्या पोटी,तिच्याच साक्षीत्वे, 

सारे पाप पुण्य,सारी ही कवित्वे.


अशी सांज तिची गूढरम्य कथा, 

फक्त अनुभव!कळण्यास स्वतः!


तिनी सांजा जरी,तिन्हीसांजमाता

लागे निरांजन आत,गाता गाता.


                                   .🍃संतोष

पावनखिंड


ते फक्त तीनशे होते

परि भीष्म द्रोणसे होते!

हातांत खुल्या तलवारी,

अन् पाय अचलसे होते!


ती झुंड मुसंडी मारे

म्लेंच्छांचे आले भारे

मारा मारा कापा रे!

दुमदुमले ते हाकारे.


दमदार बाहू फुरफुरले

उरी तेज चंडीचे भरले

अंगात रुद्र संचरले,

शत अभिमन्यू रणी शिरले.


गरगरा फिरे तो बाजी

जंव सूर्य ग्रहांच्या माजी

घेऊनीया बंधू फुलाजी

प्राणांची लावीत बाजी.


ती फिरते नच समशेर,

जणू चक्र सुदर्शन फिरते.

शिशुपाल शेकडो कंस

हतवीर्य करोनी चिरते.


जणू अग्नीकुंड धगधगते

समिधांसम रिपुंना गिळते

किती यत्न लाविले बळ तें,

परि वाट पुढे ना मिळते!


तनु लालतांबडी झाली

रक्ताने भूमी न्हाली.

वस्त्रांची झालर झाली,

परि शस्त्र न येई खाली.


तो थकला जिद्दी सिद्दी,

कोठून ही झाली बुद्धी!

हा सैतान की ह्या सिद्धी?

खिंडीत सैन्यअवरूद्धी!


मग मागविली बंदुक, 

बाजींवर धरिला रोख

ती गोळी सुटे निर्धोक,

बाजींचा जाई झोक..


तरीही धडपडती,उठती,

नच नेत्र आपुले मिटती.

कर शस्त्र धराया झटती,

शिवराय..तोफ..पुटपुटती.


व्याकुळ प्राण कानांशी,

'मी शब्द दिला शिवबांसी'

रोखीन घोडखिंडीशी,

जाऊ न देई मसूदाशी.


अन् तोफ खुणेची झाली,

स्मितरेषा वदनी आली.

क्रुतक्रुत्य जीवने झाली

त्या पावन खिंडी खाली.


                                       


                                  .🍃संतोष

पक्ष्यांचे गाणे(बालकविता)



चिमणीच्या चोचीमध्ये, 

तीन चार दाणे,


कबूतर गोरे गोरे

भरते बकाणे,


कावळ्याचे गाणे 

कसे भसाडे बेसूर.


कोकीळ लपून

त्याला शिकवतो सूर.


लाल लाल चोचीमध्ये

गोड गोड पेरू,


पोपटाचे पिल्लू कसे

बोले चुरूचुरू.


फदक,फदक,बदक आले,

चपटी चोचवाले,


पाण्यामध्ये पोहताना

पाय कुठे गेले?


मोर आला लांब लांब

ओढत पिसारा,


फुलवताना निळाभोर!

राजावाणी तोरा.


गुलगुल बोलत बुलबुल आले

भिरभिर शिंजीर करी.


चोचीवरती चोच चढवून

धनेश फांदीवरी.


वटवट्याची अखंड वटवट,

सुतार ठकठक करी,


कोतवाल हा फेरी मारे

गगनी वरचेवरी.


सगळे पक्षी आले आणि,

नाचून नाचून गेले.


मुलांसाठी एक एक पीस

बक्षीस ठेवून गेले..


                                    .🍃संतोष

Tuesday, March 16, 2021

डोळस आंधळा

 

एक आंधळा पुसे दुज्याला 

असेल कैसी दुनिया न्यारी 


रंगबिरंगी नाट्य मनोहर, 

असेल गंमतजंमत भारी 


म्हणे दुजा,मज वाटत नाही 

असेल काही येथ रम्य ते 


रोज ऐकतो मी कोलाहल  

चित्र खरे नच फक्त भास ते. 


जाई तेथून डोळस कोणी 

म्हणे बोलसी सत्य परंतु 


भास भोगल्यावाचून उत्कट 

कळेल कैसे सत्य परंतु?


म्हणे आंधळा पहिला तेव्हा 

मजपुरते मज कळले उत्तर 


भास जगावे डोळस होऊन 

मनगटास या लावून अत्तर. 


हसे दुजा मग उदासवाणे

म्हणे पुरे हे व्यर्थ तराणे. 


शुन्य प्रसवते केवळ शून्ये.

कसली दृश्ये कसले दिसणे? 


डोळस तेव्हा बोले अंती 

मिटुनी डोळे मग एकांती 


कळले जे मज वळले नाही! 

पहिला मिळविल अंती शांती!


                               .🍃संतोष

परी



हिरमुसलेली परी पंखहीन 

पाय चालली ओढत ओढत.


दुःख अनामिक घेउन पदरीं

पिसे खुणांस्तव सोडत सोडत.


पवना जा रे हळुच अलगद

मौनकळी फुलते का बघ ना!


जा पक्ष्यांनो शीळ ऐकवा 

अळिमिळी सुटते का बघू ना!


काय करावे उमगेना त्या 

खारुताईला पडले कोडे!


उगाच बुलबुल घिरट्या घाली

बोलून पाही वाडेकोडे!


पारंब्या पसरून पाहतो 

वड म्हातारा मिश्कील हासे.


ठावे सारे काही त्याला,

परि वागणे तटस्थ भासे.


कलला दिनकर पश्चिमेकडे 

अंधुक झाली द्रुष्ये भवती.


निशा नाचवी नवीन पात्रे

रातकिडे ते किरकिर करती.


कसे कळावे मनातले अन 

कसे खुलावे हसू लाघवी.


नभी चांदण्या चिंतीत वरती

आणि चंद्रमा रात्र जागवी.


मिटले डोळे तिचे परी नच

निद्रा घाली तिजवर पाखर,


अंधुकश्या मनीच्या स्वप्नांची 

अश्रूंतच विरघळली साखर!


कोण परी ही?नव्हे कल्पना!


नव्हेच आशा, नव्हे निराशा 

नव्हे घडीव सोनेरी भाषा.


अनुकंपा नच ,नव्हेच समता. 

ही आपुली संवेदनक्षमता!

 

संवेदनक्षमता ही आपुली

पहा कशी ती मलूल झाली!


कसे जपावे तिला,मलाही ठाऊक नाही!

कसे रुचावे तिला जगातील घाऊक काही? 

 

ती यावी परतून म्हणून करा काहीही,

द्या बुडी खोल वा पहा दिशा दाहीही.


असले काही उत्तर तर 

द्या धाडुनी मजला. 


हा विशाल वाडा तिच्याविना 

शब्दांचा सजला!

      

                                    .🍃संतोष

Monday, March 15, 2021

तहरीऱ

तहरीऱ


अब ये दिदार भी ,

तहरीऱ का, ना भाएँ मुझे!


अब क्यूँ है, गैर से

यूँ, लफ़्ज़ भी, ना चाहे मुझे?


अश्क भी सूख गये,

जिनसे मिले ,कुछ तारिक़!


अब तो बेखौफ़ है ,

ये राहें जो, ले जाये मुझे!


बात ईतनी न थी,

संगीन की तुम इतराओ!


मान भी जाओ,

की अब,तल्खीयाँ सतायें मुझे!


हुए गमगीन भी,

साये हमारे,तब थे हमराही!

 

आज तो,आब-ओ-हवा,

खुशनुमा! दो साथ मुझे!


वादा ये कर न सकू,

साथ जियूँ, मै हर पल!


पर कुबुल़,तुझसे मिली,

खुदकी यूँ,पहचान मुझे!


                                   .🍃संतोष

मेरा मन


यूं बादल की गोदमे, 

छिप रहा चाँद हैं, 

या मेरा मन!


खयालोंके दिये हैं 

बुझ रहे,हैं शाम,

या हैं, मेरा मन? 


रात के बाल बिखरें,  

चांदनी हैं फुल सीं 

फिर क्यूँ शिकन? 


होंठ क्यूँ सिल गये,  

खामोश चिलमन के, 

ये हैं फिर, मेरा मन?


तप रही धूप से, 

ना हैं गिला,  

ना ये चुभन!


हैं याद, झुलसीं ख्वाहिशें!

उसमे थी, क्या वो 

मेरा मन?


उम्रकैदी को,

झरोखा दिखायें

साज़़-ए-चमन, 

उस नजारो,को ही 

सच,मान चला 

भोला ये मन!


रुबरु दर्द से यूं, 

आबरु बेपर्दा हो जाये, 

तो भी मंजूर हमे!

मय के प्याले ,पडे खाली, 

या हैं फिर, मेरा मन!


नन्हीं चिडियाँ या

भरी चुडीयाँ, ढुंडे घर ही!

उम्र की चांदनी हो,

सिरपे उन्हे, ना हो घुटन!


सादगी साफ दिखे,

और जुबां, हो ये नयन! 

ह़़या उनकी हैं या अब, 

आ़ईने-रब,मै मेरा मन!


                                  .🍃संतोष

शब्दोच्छ्वास

 *शब्दोच्छ्वास!*


चालत्या गाडीत मस्तकी ओझे 

तसे माझ्या शिरी मीपण माझे. 

खाली ठेववेना,फजिती टळेना 

कच्चे हे मडके कोण गा भाजे?


ओझे ही संपत्ती?अथवा भ्रम? 

पुष्कळ केले की त्यासाठी श्रम !

वाटोळा वेदांत कर्म व्युत्क्रम,

जन्म जरा यम, चालला क्रम.


लाचारी चे पुच्छ हालते मागे 

भरजरी दिमाख आणखी मागे. 

सदिच्छा,सदाशा सारून मागे 

वासना इच्छांचे वेताळ जागे.


नेमस्त नाटक चांगुलपणा 

अंतरी मत्सर काढतो फणा 

सात्विक संताप,त्याला पश्चाताप!

कोडगा सुखात मिरवी गुन्हा.


मधाच्या बोटाला शेकडो मुंग्या 

साधूच्या बोटाला डसती नांग्या 

गंजल्या तलवारी मनात नंग्या.

कानाशी वाजती गाजरपुंग्या!


सोवळे सोज्वळ सुकून गेले 

बेरकी मनात घुम्मे हे चेले. 

सहज सरळ सांडून गेले.

शांतीसाठी आता सुगंधी तेले.


असा हा प्रवास रात्रंदिवस 

पेंगत्या स्वप्नांचा खुळा उरूस. 

कसले प्रयोग सत्याचे भास 

अहिंसेचा खाटीका घरी वास.


क्षितिज कोरीत उगवो उषा, 

भिन्न काली भिन्न क्रांतीची भाषा. 

समभाव भोंगळ भाबडी आशा 

स्वतःची ओळख,स्वतःच्या देशा!


                                   .🍃संतोष

Friday, March 12, 2021

उष्म्याचे दिवस

दिन हे दाहक उष्म्याचे,🔥

टोपी, काळ्या चष्म्याचे.🧢😎


सूर्याचा का चढला पारा 🌞

म्हणे त्रासुनी कुणी बिचारा.


धगधगतो परिसर जरी सारा

मिळे शोधता काही उतारा.


कुणी घेतसे ऊस पिळोंनि,🎋

ताक कुठे सैधवे घोळूनि.


लिंबू सरबत,कुठे शहाळे,🍋🌴 

कुठे कलिंगड रसाळ काळे.🍉


थंडगार वाळ्याचे पाणी 

फुले मोगरा,मनी,अंगणी. 


मधुर अंजिरे टरबूज खरबूज.🍈

संत्री, द्राक्षे करिती हितगुज.🍊🍇


कोकम,जांभूळ अन करवंदे 

अगडबंब फणसांची दोंदे.🥔


येतो मागून टाकीत पाऊल 

भूपापरी दे आधी चाहूल.

 

कोकीळ सांगे,ऋतू हा धाला 

बहराला आंबा हा आला.🥭


पन्हे गारसें पहिल्या बहरी, 

मंद उष्ण चैत्राच्या लहरीं. 


राजा हापूस,प्रधान केसर 

सचिव पायरी,रस अग्रेसर. 


आंबरसास्तव पिळले कोणी 

अधीर कोणी चोखे धरुनि.


कुणी नेमस्ते,चिरल्या फोडी

कुणी चाखे कोयींची गोडी. 


सुहृद खरे हे गोड सोबती, 

सह्य उन्हाळा आपुला करिती.


असा ग्रीष्म येतो दर वर्षी, 

शोषदायी परी रसपरिपोषि!


                                    .🍃संतोष

दिनचक्र


लाल केशरी अन सोनेरी

छटा दाखवीत अशा मनोहर 

पश्चिम द्वारी घेऊन स्वारी 

जरा थांबतो क्षितिजी भास्कर.


करी उजळणी दिवसभराची, 

काय पाहिले,काय राहिले? 

कोण उमलले प्रभात समयी 

अन माध्यान्ही कोण रापले?

 

उन्हे उतरता शीतल वारा 

हळूच देई सायंचाहूल, 

पल्याड डोळे तरी अडखळे, 

बुडताना सवित्याचे पाऊल !


कोण पुसे त्या कितवा दिन हा? 

कोण पुसे अन किती राहिले? 

सापेक्षच हे सारे सारे 

काळ टाकतो संथ पाऊले. 


तटस्थ! पाही पळ दो पळ अन 

होय नाहीसा क्षितिजावरुनी.

औटच घटका राज्य मांडण्या

येते लगबग संध्या राणी.. 


थवे खगांचे मांडून ओळी

परत कोटरी मग जाताना 

निशा खुणावे चांदणगात्री 

चंद्रसाक्षी ने नभ सजताना.

 

राज्य तियेचे स्वप्नसावळे, 

अर्धंतंद्र जगतावर चाले,

जाणीव जाता विरले सारे, 

सुरु जाहले,म्हणता सरले!

 

पहा वाजले घुंगुरवाळे 

प्रभातरवीचे चिमणे पाऊल, 

चक्र संपले,काल कालचे,  

आज, उद्याची, देतो चाहूल!


                                  . 🍃संतोष

संध्या


सोन्याच्या गोळ्याला,केशर बोटे 

तेजाळ चेंडू हा चालला कोठे? 


आकाश तळ्याला,क्षितिज काठ 

संध्या ही उकले,अंधार गाठ.


धड ना दिवस,धड ही रात. 

हळूच सोडवि, दृश्याचा हात. 


कापरासारखा उडाला दिस 

हळूच पालटे धरित्री कूस. 


जळे सायंधूप,निवला ताप,

गारश्या वाऱ्याचे जीवा उ:शाप!


उरला उबारा शांत होई सारा 

उतरला पारा,पाखरां निवारा.


रोजच सोहळा,रोज सायंवेळ

नवाच परंतु रोजचा हा खेळ.


अशाच संध्या ह्या कातर कातर!

 हवीशी हुरहूर! मनाला अत्तर!


                                .🍃संतोष

Wednesday, March 3, 2021

ती ची कथा

एक खाच,वरी काच 

तोच तसा जुना जाच.

वरी संसाराचा नाच

कुशीतून धीमी आंच. 


पापणीला मीठपाणी, 

आत उन ऊन गाणी. 

वाही वारा ही विराणी 

तीच दासी तीच राणी.  


अठ्ठावीस युगे भोग. 

तेव्हा विठूला ह्या जाग, 

थोडी आग थोडा राग 

परी पोटी अनुराग. 


आता हवा हात हाती 

नको सेवा वा आरती 

थोडी प्रीत थोडी गती, 

विश्वासाची अनुमती. 


उंबऱ्याला वाट फुटे, 

आता तिला सीमा कुठे? 

झेपावण्या व्योम थिटे

पोटी भविष्य गोमटे!

काजळ रात

 काळीज कातरे काजळरात 

उरात थरारे श्वासाची वात. 

टाकून सावळी संध्येची कात, 

आली ही नागीण ऐन भरात. 


काळोख शाईत मौनाचा बोरू 

भयार्त भाषा लागते कोरू.

शब्दांना लगाम,थांबला वारू,  

किर्रर्र रातकिडा लागला घोरू. 



झाकल्या पापण्या,

तरी जागा डोळा. 

टिक टिक घड्याळी,

सर्व काटे गोळा.


वाजता पाचोळा,

धीर चोळामोळा, 

जाणीव तळाशी,

नेणीव धांडोळा.


मिथ्याच तरीही स्वप्ने तू सजव.

उद्याचा भाबडा दिवस रुजव.

खेळ हा रात्रीचा रात्रीच निजव, 

भीतीची ही बिळे धृतीत मुजव.


मिटल्या डोळ्यांना पहाटआशा,  

दवांत भिजेल कोवळी भाषा. 

तोवर सावर,भीतीचा वावर, 

निराशा आवर, सरेल निशा.


                                  .🍃संतोष

स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती

 *स्वातंत्र्य वीर सावरकर स्मृती*


गुलाब पुष्पे कोणासाठी 

हार कुणाला, रोज फुले, 

मार्ग तुझा रे परी काटेरी 

पलाश तुझिया साठी फुले. 


वसंत कोणा कुणास वर्षा 

कुणा गुलाबी शिशिर मिळे 

ग्रीष्म सखा तव,तया सोबती 

अखंड जीवनज्योती जळे.


कबुतर कोठे भिरभिरणारे, 

कुठे पारवळ घुमणारे.  

मोर नाचरे, कुणी पाळले, 

पोपट वटवट करणारे. 


गरुड तुम्ही ते स्थिर गगनींचे, 

विहंग वनीचे,फिरणारे!

घुबड दाविती तुम्हा वाकुल्या 

स्वतः ढोलीतून लपणारे!


कढत अश्रू तव 

सुकती आतच,  

वरती परी चैतन्य फिरे !

पदवी,पदके क्षुद्र तुम्हांस्तव 

क्रांतिवीरा! कैवल्य उरे


                          . 🍃संतोष

वैनायक वृत्त

 *ये मृत्यो ! ये तू ये यावयाप्रती*

*निघालाच असशील जरी ये तरी सुखे.* 


काय आहे हे? काहीतरी अद्भुत लिहिलं आहे एवढं मात्र जाणवतय?  

या आहेत सावरकरांच्या एका कवितेच्या पहिल्या ओळी... 


अक्षरश: हजारो पानांचे सावरकरांचे साहित्य हे विविध लेख,नाटकें,ग्रंथ, कमला आणि गोमांतक यांसारखी खंडकाव्ये आणि इतर स्फुटकाव्य यांनी समृद्ध आहे. 


थोर व्यक्तींना असामान्यत्व किंवा देवत्व प्रदान करून आपली सुटका करून घ्यायची आपली खोड जुनी आहे.

त्यातून अंदमान येथे त्यांनी काव्य कसे रचले, पाठ केले याच्या फक्त कथा आपण ऐकत आलो आहोत.

म्हणूनच त्यांच्याच एका पुढे प्रसिद्धी पावलेल्या कवितेतून त्यांची त्यावेळी काय मनोभूमिका असेल हे जाणून घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.. 

 

तुरुंगात केलेलं काव्य कसं जन्माला आलं असावं याचा तर्क त्यांचं चरित्र वाचताना बांधता येतो. 


आजूबाजूला नैराश्य पसरलेलं,शरीर यातना सहन करत कुपथ्य,अपचन यांना वेळोवेळी बळी पडत असलेलं, 

यावेळी मनातल्या नैराश्यावर मात करण्यासाठी काव्य प्रतिभेचा त्यांनी उपयोग करून घेतला असावा.

शरीरावर तुरुंगाधिकारी ताबा दाखवू शकत होते, 

मन तर मुक्त होतं ना !ते त्यांनी कवितेत गुंतवून टाकलं.


सुरुवातीला अनुष्टुभ सारखा सरळ  छंद त्यांनी कमला या महाकाव्यात वापरला परंतु त्याचे नियम त्यांना सुरुवातीला आठवेनात,ते कुणाकडून मिळतील अशी शक्यताच नव्हती. स्मरण शक्ती ला ताण दिल्यानंतर पुढे ते आठवले. 


मात्र नंतर त्यांनी स्वतःच  स्वतःला अनुकूल होईल असे जे वृत्त निर्माण केले होते त्यात गोमांतक महाकाव्य लिहिलं. त्याचं नाव *वैनायक वृत्त*.


त्यांना तीन वेळेस प्रबळ नैराश्य आले.  (डिप्रेशन).तीनही वेळेस त्यातून

ते इच्छाशक्ती च्या जोरावर बाहेर पडले.त्यातील एका प्रसंगी,शरीर आजाराने,श्रमाने गलितगात्र झालेले असताना त्यांना वाटलं की बहुतेक आता सगळं संपलं.....

आता मृत्यू येणार. 

त्यावेळी तीच चिवट इच्छाशक्ती कवितेच्या रूपात बाहेर पडली. 

तीच ही वैनायक वृत्तातील कविता.      *मरणोन्मुख शय्येवर*

 

वैनायक वृत्त फारसं कुणाला माहिती नसावं. या वृत्तात सावरकरांच्या मूर्ती दुजी ती, वीर बंदा अश्या काही कविता आहेत. 

या वृत्ताचे वैशिष्ट्य असं आहे की ये निर्यमकी, म्हणजे यमक नसलेले म्हणजेच मुक्तछंदी आहे पण मात्रावृत्त असल्यामुळे नियम बद्ध आहे,चालीत  म्हणता येते. 

दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पुढील चरण,  मागील चरण यात अन्वय म्हणजेच सुसंगती आहे. 


हे वृत्त म्हणजे यमक म्हणजे कविता, असं समजणाऱ्या चाकोरीपंडितांना,आणि स्वैर उतारे लिहून त्यांना 'मुक्त छंद कविता' समजणाऱ्या नवकवींना एक धडा आहे असं मला वाटतं.


याचं व्याकरण असं आहे-

गा गा गा, गा गा गा, गा ल गा ल गा.

2  2  2,  2,  2,  2, 2, 1, 2, 1, 2.


थोडक्यात 6, 6 चे दोन आणि पुढे 8 चा एक असे खंड आहेत.


अर्थातच मात्रा वृत्त असल्यामुळे 

मधल्या खंडात, गा गा गा ऐवजी 

गा लल गा, किंवा गा लल लल अशी मोकळीक आहे.


नुसतं व्याकरण कितीही लिहिलं तरी म्हटल्याशिवाय त्याचं आकलन होत नाही,आणि सौंदर्य ही कळत नाही. 

म्हणून, पहिला काही भाग मी म्हणून दाखवला आहे. 


ही दीर्घ कविता आहे. संपूर्ण कविता नेट वर उपलब्ध आहे,शोधून,चालीवर म्हणून पाहायला हरकत नाही.लिंक दिलेली आहे.


हे वृत्त समजून घेण्यासाठी त्याच वृत्तात फक्त उदाहरण म्हणून मी काही सोप्या ओळी रचल्या आहेत त्याही देतोय.

वृत्त कळावं इतकाच उद्देश. 


जा तू जा मेघा जा वर्षण्या पुढे 

तप्त काहिलीच जणू पृथ्वी जाहली. 

शीतलता वाऱ्याची छळून चोरली 

रवीला त्या कैद करी संपुटांबळे. 


उष्ण ओठ धरणीचे विलग जाहले 

धार धरी त्यावरी अन सुखवी कौतुके, 

देई दान जीवन पान रिक्त तृप्त हो,

चाल पुढे वायू सवे,पुढील देशी रे.

----

पुढील देशी,जाशील तरी, विसर ना पडो, 

पुढील वर्षी याच स्थळी ,गाठ तुझी पडो.

( इथं माझ्यातला यमक्या जागा झालाय 😃)


सावरकरांचा अप्रकाशित पैलू उजेडात आणण्यासाठी केलेला हा एक अल्पसा प्रयत्न.


                                  .  🍃संतोष

विनायका !

हे क्रांतिदान दायका, 

विनायका विनायका!


परवशता तमपटला 

छेदण्यास किरणशरे 

निबिड घोर अरिकुहरी 

मृत्युन्जय सूर्य शिरे.


जशी झेप घेई व्याघ्र 

मत्त हत्ती गंडावर,  

अथवा शिव रुद्राचा 

घाव असुर मुंडांवर, 


धाक तसा अभिनव तव, 

शौर्यसुक्त गायका !


विनायका, विनायका !


अंदमान यमकारा, 

भेसूर परिसर सारा

वरी सोशीत अग्निशरा, 

अंतरी तव काव्य झरा.


काली बने सरस्वती !

भारती प्रिय बालका !


विनायका विनायका !



उल्लंघी जलधि जसा 

अगस्तीचा तुम्हा वसा !

स्फुल्लिंगे पसा पसा,  

हाच तुझा अम्हा वसा!


अहि स नकुल ते तव कुल !

भार्गव तप सायका !


विनायका विनायका!


                                  . 🍃संतोष

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...