Sunday, September 19, 2021

लेखणी


देखणी ती लेखणी 

जी दाविते पैलातले.


शब्द होती सजीव आणि,

बोलती ह्रदयातले.


लाल काळ्या आईच्या,

गर्भातला हुंकार होते.


अन् शिवाच्या मंदिरातील

सोवळा ओंकार होते.


पूर्वजांच्या थोरवी चा

सार्थ जी अभिमान होते.


नवनव्या ज्या कल्पना,

त्यातील कंवळे पान होते.


लाल तांबूस केशरी,

अन् नीलजांभूळ शेंदरी,


या नभाच्या कागदावर

कुंचल्यांचे रान होते.


चिमुकल्या चिमण्या जीवांचे

मुग्ध बालांच्या श्रवांचे,


कोकिळेच्या काळजातील

आर्त ती स्वरगान होते.


लेखणी झरते कधी

अश्रूंसवे गालावरी,


राबत्या हातांसवे,

ती ओघळे निढळावरी.


लेखणी ती आग ओकित

झुंजते सीमेवरी,


वा विठूच्या वाळवंटी,

नाचते भीमेवरी.


शब्दप्रसवा लेखणीची 

धार ही तलवारशी.


थेट घाली घाव,नाही

फिकीर तिजला फारशी.


व्योमव्यापी ती तथापि,

सुक्ष्म रेणुरेणुची.


पंडीतांच्या पंगतीची,

गोकुळीच्या वेणुची.


अक्षरांच्या मोतियांना 

गुंफुनी शब्दांतरी,


लेखणी ही माळते 

ही मालिका काव्यांतरी!


                                 .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...