Monday, September 27, 2021

माझी गज़ल


माझिया कवितेस माझे भान आहे,

तीच आहे थोरली,मी सान आहे.


बीज होते आत त्याचे रोप झाले

व्यर्थ बाकीचे तसे गुणगान आहे.


झाड माझे पोसले ती हीच धारा,

मूळ गेले खोल,हिरवे पान आहे.


सोडले मी मोजणे माझ्या कळ्यांचे,

अंगणी माझ्या फुलांचे रान आहे.


षड्ज आहे लागलेला स्थिर माझा,

रोमरोमी ही विजेची तान आहे.


स्वाभिमानी अन् ईमानी रक्त माझे,

हिंडताना ताठ माझी मान आहे.


माझिया भाषेस सुटतो रोज पान्हा,

रोज मजला अम्रुताचे पान आहे.


प्रार्थनेची टाळ वाजे आत माझ्या,

माझिया झोळीत त्याचे दान आहे.


                              .🍃संतोष

No comments:

Post a Comment

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...