Thursday, July 30, 2020

बरगद दादा

     बरगद दादा

बरगद दादा गांव के बुढे 
खफा हैं,कहते,यूं मुंह मोडे, 

'नहीं खेलने कोई आता 
पंछी भी रुख मोडे जाता.' 

बेबस और बेचैन बडे है 
इसी बात पें यूंही अडे है.

उमर है कितनी,कौन बताये
किसे बिठाके साल गिनाये? 

लंबी मुंछे हवा पें डोले 
कहते,खेलो इनपे झुले!  

धूप लगे तो छांव दिलाते 
हवा के झोंके लोरी गाते...


चिंटी,तितली,किडेमकौडे  
सबका घर हैं बरगद दादा 

ढिलेढाले तेवर है और  
जीवन इनका सिधा साधा.

नभ की निली चादर ओढे 
बतियाते हैं तेज पवन सें 

कभी पुरानी यादे लेकर 
करे गुफ्तगु अपने मनसे.

ऐसे मेरे बरगद दादा, 
जरा हटिले,लेकिन प्यारे!

झुरियां जैसे, पहने गहने, 
जड से जुडे है सिर पें सितारे !

                               .🍃संतोष

Wednesday, July 29, 2020

स्वगत

आकाशाच्या निळ्याशार तबकात रुईचा कापूस पिंजून ठेवावा तसे हे मेघांचे पुंज.

निळ्या नभांगणावर निरनिराळ्या नक्षींच्या रेखाकृतींनी रांगोळ्या रेखाटणारे..
का,
व्यवहारशुन्य विद्वत्तेच्या व्यासंगाप्रमाणे व्यर्थ, रिक्तपणाचे पांढुरके अस्तित्व दाखवणारे?

वाऱ्याच्या अद्रुष्य कुंचल्यातून स्वतःतच निरनिराळ्या आक्रुत्यांचे आभास अवकाशात तयार करणारे..
का,
विखुरलेल्या ठिपक्यांमधुन पाठशिवणीचा खेळ खेळणारे आणि पकडल्यानंतर एकमेकांशीच एकरूप होऊन जाणारे?

आकाशाची खोळ उसवून हा निसर्ग नावाचा पिंजारी कसले विलक्षण आणि विचित्र खेळ खेळत असतो नाही?

आपल्या पक्षी हा निरर्थकाचा
विभ्रमविलास निव्वळ!

ना तिथे गर्भार स्त्रीच्या जडशीळ पावलांप्रमाणे पर्जन्य कुशीत जपुन हळूहळू येणारे सावळमेघ आहेत,

ना प्राची किंवा संध्येच्या रंगखुणा..

ना निशेचा चांदणचुऱ्यात चमचमणारा नक्षत्रनखरा.

तरीही या निरर्थकतेत काहीतरी जादू आहे नक्की, नजर खिळवून ठेवणारी.

ते काही असो, माझ्या आयुष्यातील चार क्षण त्यांनी शुभ्रधवल केले एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे.

 *वलयांकित अभ्रांचा विभ्रम*
 *विरळ वायुच्या करांत खेळे.*

*निरर्थकांच्या भासआक्रुत्या*
*पिंजुन पडती कापुसगोळे!*

*पाठशिवणीचा खेळ खेळता*
*विस्कटली वाऱ्यावर वस्त्रे.*

*जलदांनो जा मुक्तपणाने*
*रेखाटत झुलणारी चित्रे !*

                             . 🍃संतोष

Tuesday, July 28, 2020

सावन

नभ पिघलासा, घन पगलासा,
सावन मे खेले ये होली!

ये रस बरसा, जो था तरसा ,
वो तृप्त हुआ, मन का माली.

नवकुसुमित फुलोंकी गालोंको
चुमे नन्हीं बुंदनिया,

वो महक उठी, सौंधी खुशबु
माटीपर छनकी पैजनियां?

ये कविता की, पुस्तक से निकले,
शब्द दूरसे तकते है,

अब तो ,सावन के, कुछ टुकडें
खिडकी के बाहर दिखते है!

वो मोर पपिहें, यादोंकी
बादल मे खोये गुम से हुएं,

और छत पे बजते थे ताशें,
बूंदोंके, वो भी थम से गएं.

ये समय समय की बात है
लेकीन,अब भी सावन गाता है!

मीठा मल्हार भले न सही,
ईक धुनकी मस्त लगाता है

वो सूर उसका है ज्यों के त्यों!
जो मिल जाये तो क्या कहना!

महसूस करें भीगे पल को,
हर बात जरुरी है कहना?

                                   .🍃संतोष

Saturday, July 25, 2020

मौनाचा जोंधळा

मौनाचा जोंधळा झाला लाही लाही
तेव्हा जगा झाली जाणीव ती काही.

परि पुढे ठाके नित्याचा बाजार
होता दर भाव पुरता बेजार.

बरे होते जुने अव्यक्त जीवन
मुठीतला जीव अबोधसे मन.

मातीत रुजलो असतो भिजलो
खोल कुशीमधे असतो निजलो

तिथेही वेदना आहेच सोसणे
परि नवा जन्म!अंकुर फुटणे.

किंवा घरोट्यात रिती होता मूठ
सोडून आकार निराकार पीठ.

त्रयस्थ द्रुष्टीने दोन्ही एक व्यथा
एक एकांताची दुजी जनकथा.

जन्म सृजनाचा,मृत्यू वारी भूक!
कोणासाठी खेद, कोणाचे कौतुक?

सारी तत्वज्ञाने, वांझेची अपत्ये
जन्म,भूक,मृत्यू हीच तीन सत्ये.

                                 . 🍃संतोष

मुरलीमाधव


हळुवार फुंकरीमधुनी
तो कृष्ण स्वरांसम वाहे
जी निर्मळ अंतर्बाही
ही मुक्त बासरी आहे.

लालस ओठाची शय्या
तिजसाठी ही स्वरमाया
ते नादब्रह्म कवळाया
आतुर ही मुरली आहे.

जो निर्गुण अन निःसंगी
जो भोग भोगता योगी
त्याचे चित् यौवन भोगी
ही मुरली राधा आहे.

ते गुंजन इंन्द्रियरंध्री
अद्वैती लागे तंद्री
नर नाही,नाही पुरंध्री,
तो मुरलीमाधव आहे.
.........

तो नाद गोकुळी घुमता
गोपींची तुटली ममता
नादाशी हो समरसता
ही कृष्णभुलावण आहे.

ती भूमि गोपजनांची
अन प्रीती सरलमनांची
ती कदंबछाया वनीची
स्मृतिगंधीत केशव आहे.

तो उद्धव दिङ्मुढ झाला
अन कृष्णामृत हे प्याला
तो आतून गोपी झाला
हे  ज्ञान सुकोमल आहे.

ही स्वयंसिद्ध अभिलाषा
ही निखळ प्रीतीची भाषा
नच आशा येथ निराशा
हे भाग्य सुगंधित आहे.

आणखीन सुचलेल्या काही ओळी....


वारी (2020)

यंदा वारी झाली नाही
विठूस बोले ती रखुमाई.

शांत कसा रे, नेम मोडला
तुला काही का वाटत नाही?

विठू म्हणे तुज दिसले नाही?
पुंडलिक अन श्रावण काही?

हजार लाखों पाय चालले
उत्तरेकडे उत्तर शोधत.

आषाढीच्या आधी यंदा
वारी माझी झाली बाई!

वो बात कहाँ

नर्म हाथोंकी बात,
गर्म होठोंमे कहाँ?

शर्म जो कह सके वो
बात अदाओंमे कहाँ?   ।१।

सब्र के छांवतले,गम जो पले,
वो खालिस!
गिलेशिकवोंकी मेहमाँको ये
एहसास कहाँ?           ।२।

बूँद की किश्तमे,उनको मिली है,
ये बारिश।
जिनको बादल है मिला,
बात वो, छिंटोंमे कहाँ?    ।३।

शाम ढलते ही, डरे लोग
जलाते है दिये।
चांदनी रात की, वो बात,
उजालोंमे कहाँ?     ।४।

खुद को जिंदा दिखाने के लिये ,
सज रही लाशे,
मौत को आँख दिखाये,
यहां औकात कहाँ?  ।५।

हुआ संतोष मुझे,
आईना पाकर ऐ दोस्त!
खुदका चेहरा दिखे,
बडी इससे यहां ,बात कहाँ?  ।६।

                                .🍃संतोष

तूच

समईची ज्योत शुभ्र
त्यात निळी झाक तुझी।

धेनुव्रुंद भरकटता
वेणुस्वरे हाक तुझी।

नेत्रदले दोन परि
चित्ती चित्र एक तुझे।

क्रुष्णवर्ण अभ्रपुटे
नीलाकाश रुप तुझे।

नाजुकशा सुमनांगी
अरुपाचा गंध तूच।

नादलुब्ध गोकुळात
रासमग्न धुंद तूच।

रेखीव त्या रांगोळ्या,
भरताना रंग तूच।

कमलदली गाभ्याला
लुचणारा भ्रुंग तूच।

वियोगात मिलनाची
बीजरुप आस तूच।

मेघांच्या झाकोळी
चपलेचा भास तूच।

गोपींच्या निजरंगी
रंगुनी श्रीरंग तूच।

भोगुनीया बाह्यसुखे
अंतरी निःसंग तूच।

भिरभिरत्या पंखांना
कोटरी विश्रांती तूच।

थकलेल्या डोळ्यांना
निद्रेतील शांती तूच।

सळसळत्या पात्यांचा
संगरी आवेश तूच।

सलत्या भलत्या जखमा
निरवित निःशेष तूच।

सुखदुःखे शीतउष्ण,
तू गौरी क्रुष्ण तूच।

म्रुत्यू उत्तर देता,
भिडणारा प्रश्न तूच।

मुंगीच्या धडपडत्या
पाऊलात जिद्द तूच।

हपापल्या प्रगतीला
रोखण्यास हद्द तूच।

गहिवरला नेत्र जसा
पतितांचा मित्र तूच।

परि दांभिक दैत्यांना
कुरुक्षेत्री शस्त्र तूच।

थरथरत्या हातांना
चिमुकलाच स्पर्श तूच।

चिवचिवत्या चिमण्यांच्या
नयनांतील हर्ष तूच।

तूची सख्या प्रणयरंग
परि अनंगहीन संग।

कलीमलभय घडो भंग
ये भजनी,करवी दंग।

                             .🍃संतोष

नभ गाभुळलेले

नभ गाभुळलेले,भरला सावळगाभा
ते क्षितिज वाकले,कृष्णछटांची शोभा.

ते पाझरले रस,सृष्टी चातक झाली,
निमिषांत सुगंधी अत्तरशिंपण खाली.

ती आळस झटकून तृणें उंचवित मान,
अन विझे निखाऱ्यापरी तापले रान.

सर शुभ्र जलाची जशी सोवळी राधा,
तो कृष्ण सावळा मेघ, सावळी बाधा.

की दाटून आले आठव अलगद ओले,
अन थेंबांमधुनी आत्मनिवेदन झाले?

तो नाद सुगंधी रेशीम पांघरलेला,
जलथेंबांचा जणू कशिदा वरि विणलेला.

तो शीळ घालतो हलके भिजला वारा,
अन पिंपळ पसरे पायी पर्ण पसारा.

ती पेंगुळलेली फुले सावरून बसली,
अन जलमोत्यांची माळ घालुनी हसली

जल नेत्रांमधले जळात मिसळून जावे,
अन ग्रीष्मझळांचे पर्व पालथे व्हावे.

तो येतो नेमे ,तरी नवोन्मेषाने,
का उगा जळावे क्षुद्र अशा क्लेशाने?

हे शांत धरातल,शांत मनाचा पारा,
नभ आत उतरता,आता अंतरी धारा.

                                .🍃संतोष

Monday, July 6, 2020

गीतांजली 4(भावानुवाद )

The rain has held back for days and days,my God,in my arid heart.
The horizon is fiercely naked,not the thinnest cover of a soft cloud,not the vaguest hint of a distant cool shower.
Send thy angry storm, dark with death,if it is thy wish and with lashes of lightening, startle the sky from end to end.
But , call back,my Lord, call back this pervading silent heat, still and keen and cruel, burning the heart with dire dispair.
Let the cloud of grace bend low from above like a tearful look of the mother on the day of father's wrath.

Ravindra nath thakur/Tagore.
Geetanjali.

शुष्क माझिया ह्रदयभुमीवर
मेघ क्रुपेचा तव वर्षेना.

फिकट पांढरे क्षितिज बोडके
म्रुदुलमेघ एकही झाकेना.

शितलशा जलधारेचीही
खूण दूरवर कुठे दिसेना.

प्रभो! किती हे दिवस कंठले
उष्ण काहीली मज सोसेना.

तव इच्छा ही! कभिन्न काळ्या
यमदूतांची येवो सेना.

परजत हाती क्रुध्द वादळे
वीज आकाशी करुदे दैना.

परंतु देवा! घे माघारी
ह्रदयांतरिची दाहनिराशा..
चिवट क्रूर ज्वालेची भाषा..

बाप गरजतो निजपुत्रावर
तेव्हा जैसी पाहे माता

तिच्या नेत्रीच्या जलमेघापरि
क्रुपाघना!!
शिरी झर तू आता...
शिरी झर तू आता ....

मूळ कविता.. रविंद्रनाथ ठाकूर /टागोर
( गीतांजली)

भावानुवाद. . 🍃संतोष

गीतांजली 3(भावानुवाद )

Thou hast made me endless, such is thy pleasure.
This frail vessel thou emptied again and again,and fillest it ever with fresher life.
This little flute of reed thou hast carried over hills and dales and hast breathed through it melodies eternally new.
At the immortal touch of thy hands my little heart loses its limits in a great joy and gives birth to utterance effable.
Thy infinite gifts come to me only on these very small hands of mine.
Ages pass and still thou pourest and still there is  room to fill.
--- Ravindra nath thakur/Tagore
Geetanjali.

निज आनंदे अंतहीन त्वां केले.
मम पात्र रिकामे केले.

हे पुनःपुन्हा जरि करिसी,
जीवनरस नूतन भरसी.

ही वेळूची, घेऊन माझी मुरली,
तव मुर्ती दऱ्यांतून फिरली.

तव पद गिरीकंदर फिरले
मधुस्वर मुरलीचे झरले.

तव अमरहस्तस्पर्शाने
मम ह्रदय आमोदे भरले

अस्फुटशा आनंदाचे
ते बोल ओठी थरथरले.

ते अनंत तव उपहार
शिशु हातांना हो भार.

युग युगामागुनी जाते
तव दानाला ये भरते!

ही ओंजळ अविरत भरते
तरी... रिक्त काहीशी उरते!

मूळ कविता.
रविंद्रनाथ ठाकूर /टागोर
गीतांजली.

भावानुवाद. . 🍃संतोष

गीतांजली 2 (भावानुवाद )

I am like remenant of a cloud of autumn uselessly roaming in thy sky.
My Sun, ever-glorious! Thy touch has not melted my vapour making me one with thy light and thus I count months and years separated from thee.
If this be thine wish and if it is thy play, then take this fleeting emptiness of mine, paint it with colours, gild it with gold, float it on the wanton wind and spread it in varied wonders.
And again when it shall be thy wish to end this game at night,I shall melt and vanish away in the dark and in the smile of white morning shall permeate in a coolness of purity, transparent.
-- Ravindra nath thakur/Tagore 
Geetanjali.

उरला सुरला मेघ हिवाळी,
निरुद्देश मी तैसा भटकत.

तेजस्वी हे हिरण्यगर्भा,
तव स्पर्शा मी अजून वंचित.

बाष्परुप होऊन मिळावे,
प्रकाशांतरी तव स्पर्शाने,

यांस्तव मी हे दिवस कंठतो,
मोजित वर्षे आणि महीने.

हीच खरोखर जरी तव इच्छा,
अन् लीला जर तुझीच सगळी,
तरी घेऊन जा रिक्तपणा हा,
चंचल जैसी जळी मासोळी.

मढव तयाला मग सोन्याने,
अन् रंगांनी टाक रंगवून,
तरंगू दे त्यांं मुक्त वायूवर,
विविधाश्चर्यांवरी दे पसरुन.

आणि पुन्हा जर झाली इच्छा,
संपवण्याची खेळच अंती,

वितळुन विलया तमांत जाईन,
फिटेल सारी मग ती भ्रांती.

धवल प्रभातीच्या स्मितातून,
परिवर्तीत मी येईन होऊन.

स्वरुप घेऊनी करीन धरातल,
आरस्पानी ,शुद्ध ,सुशीतल.

..गीतांजली
( रविंद्रनाथ ठाकुर/ टागोर)

भावानुवाद. .🍃संतोष

गीतांजली 1(भावानुवाद )

  I was not aware of the moment, when I first crossed the threshold of this life.

What was the power that opened me out upon this vast mystery, like a bud in the forest in midnight.

When in the morning, I looked upon the light, I felt in a moment that, I was no stranger in this world, that the inscrutable power without name and form has taken me in its arms in the form of my own mother.

Even so, in death, the same unknown will appear as ever known to me

And because I love this life, I will love death as well.

The child cries out when, from the right breast the mother takes it away to find its consolation in the left one in the very next moment.

Ravindranath thakur /Tagore
Geetanjali.


निबिड काननी,उमले कलिका,
मध्यरात्रीच्या गूढ कुशीतून,

माझे माझ्या नकळत झाले
जीवनात या तसे पदार्पण.

किरणपाखरे दिसता विहरत,
ओळखीचे हे भासे त्रिभुवन,

अनाम आणि अरुप शक्ती,
मातेसम मज घेई कवळुन.

परिचीतसे ठाकेल समोरी,
अनोळखी ते तत्वच अंती.

मृत्यूचा क्षण येता जवळी,
फिटेल सारी मग ती भ्रांती.

जगण्यावर या प्रेम खरोखर,
यांस्तव मजला आहे ठाऊक,

मृत्यूवरही धरीन प्रीती,
अंतकाळ तो येता सन्मुख.

स्तनामृताचा वियोग घडता,
रडे तान्हुले जरी परंतु,

क्षणीच दुसऱ्या, दुज्या स्तनातून
मिळे तयाला जेवी निजसुख.

--- गीतांजली
( रविंद्रनाथ ठाकुर/टागोर)

भावानुवाद .. .🍃संतोष 

Sunday, July 5, 2020

श्रावण

श्रावणातले ऊन ल्यावे,
सोन्याचे लखलखणारे.

श्रावणातले ऊन प्यावे,
जलधारांनी भिजणारे.

हा लपंडाव खेळावा,
किरणांनी धारांसंगे.

ओलेता गंधीत वारा ,
ते गुज लतांना सांगे.

हा खेळ चिरंतन चाले,
किती पर्व ऋतुंचे सरले.

परि साक्ष कुणाची घ्यावी,
हे दिगंत मंतरलेले.

मन झोक्यांवरती झुलते,
मोहूनी अंतरी फुलते.

जाणुनी भासमय सारे,
का स्वप्नांवरती भुलते?

दरवर्षी श्रावण यावा,
रंगांचा उत्सव व्हावा.

त्या स्निग्ध उष्ण स्पर्शाने,
जगण्याला मोहर यावा.

संक्रांत

स्निग्धमधुर सण संक्रातीचा,
करी सुखावह शिशीर शैत्यता।
मधुर क्षणांची करुनी पखरण,
परस्परांतील विसरु कटुता।

स्निग्ध तिळाला गुळात घोळून,
प्रेम,माधुरी,तयात मिसळून,

करु साजरा,तिळगुळ देऊन,
श्यामल सुंदर वसने लेऊन।

सुर्य करितसे,मकर संक्रमण,
दिन दिन व्रुद्धी,पुढती येथून.
तशीच होवो,सौख्य व्रुद्धी ही,
अशी शुभेच्छा,मंगल चिंतून!

                   🍃 संतोष

कविता राणी

शब्दसुमांंच्या हिंदोळ्यावर,
कविता राणी, ही झुलते,

व्यर्थ बोलणे,'कविता करणे',
 (ती) होते,घडते,वा फुलते! (१)

तीक्ष्ण तीरांसम,कधी शूलांसम
खोचक बनूनी ही सलते,

सलते,परि मग बनुनी सांत्वना,
पुसते नेत्रांतील जल ते.        (२)

मऊ मखमली, कधी मुलायम,
रेशिम पेरित ही जाते,

नभी तळपत्या कधी सुर्यासम,
तेजाशी जडवी नाते।           (३)

मुग्धमनांच्या भावक्षणांतून
उगाच केव्हा ही रमते,

प्रतिभा सखीसह मुक्त विहरते,
स्वच्छंदी पण तीस गमते.     (४)

हीच्याच प्रसवांतूनी जन्मली,
जगतामाजी ही भाषा,

तिमिरतळांतून बनुनी शलाका,
हीच जागवील नवआशा.     (५)

काक शहाणा

चिऊकाऊच्या गोष्टी मधला,काकच आज शहाणा।

गबाळग्रंथी वेष,बोलतो,फिरवून डोळा काणा।

जरी शेणाचे घरकुल माझे,वाहून जाई नेहमी।

अनुदानातून पुन्हा बांधणे,हाच शिरस्ता नामी।

उदार तत्पर सुगृहिणी तू,देशील मज अंतर?

लोकशाहीच्या अंगणातले बांधव आपण जर।

शपथा घालून घटनेच्या,मी करीन उखळ पांढरे,

पटते तोंवर, समता,ना तर करीन माझे खरे!

                   🍃.संतोष

विवेक

निर्गुण आणि निराकार,
अमूर्त आणि व्योमाकार,
अशा शब्दांची पिसे चार,
खोचून भरविती बाजार!

जिवंत दु:खे टाळत जाती,
पूर्वसुरींचा गरिमा गाती.
प्रश्न कठीण,त्या,सोडून भिडणे,
प्रतिप्रश्नांच्या वळती वाती ।

झडकरि सोडून पदर तयांचा,
रुढी भ्रष्टांना दूर करुया,

अनुभव चमके,तेथ नमूया,
जरी कस लागे ,नित्य श्रमूया।

परलोकाचे आमिष नको
परि नास्तिकतेचे दंश नको,
सात्विक परिमल गंध हवा,
पण तर्कदुष्ट तो दर्प नको.

विवेक मनीचा,धर्म आजचा,
सर्व सुमंगल त्या पाठी,

नच समजा उपदेश,
प्रार्थितो ,
उकलण्यास अवघड गाठी.
                .🍃संतोष

वेडे मन

काळा,घट्ट दाटलेला,
भवताल अंधाराने.
परि वेडे मन माझे,
गाई प्रकाशाचे गाणे।

भुई तापली,रापली,
धग उष्ण उसास्यांची.
परि वेडे मन माझे,
गाई गीते पावसांची।

कोलाहल कर्णकटू,
माजूनिया, कानी दडे,
परि वेडे मन शिंपी,
शांत एकांताचे सडे.

अश्या शहाण्या मनाला,
म्हणू बाई कसे वेडे.
कधी चढे,कधी पडे,
घाली जीवाला साकडे।

               .🍃संतोष

नारायणा!

मधुकैटभांचे पुरे रे पुरावे,
हवा रोकडा धर्म नारायणा!

इथे भग्नमूर्ती,तुझी क्षीण किर्ती,
कशी साहवे तीव्र,अवहेलना.

जरि तू अकर्ता,तरि विघ्नहर्ता,
त्वरे या विवर्ता आता थांबवी.

"गतीस्त्वं भवानी", हजारो रुपांनी,
आता नाचूदे रे,पुन्हा शांभवी.

तुझी स्मित भाषा,कळेना आम्हासि,
अगा ज्ञानराशी,तुलां सांकडे.

कळावे,वळावे,स्वरुपी मिळावे,
असा योग दे रे,आम्ही बापुडे.

            .🍃संतोष

फुलपाखरू

आज तिचा दिवस,म्हणून
काढली उसनी आठवण.

पदर डोई,नजरेत भुई,
अशीच 'स्मृती' साठवण.

सतीत्वाचे जीर्ण पट,
पुराणांचे जुने मठ,

कहाण्यांतले गळके घट,
दिसली नाही तिथं.

तुटक्या बेड्या कुरवाळणारी,
उरली ओशाळ भुतं.

घर,दार,परस,अंगण,
भरुन तिचेच श्वास,

माजघरातून उंबरठ्याचे
आखलेले प्रवास.

दिसली नाही, तसा झाला
अहंकार जागा,

भित्रं माझं मन!,
तिच्या सुरक्षेचा त्रागा.

कोषांत मऊ नात्यांच्या मग,
शोधू लागलो धागे,

वाटले की ती भेटणारच
इथं आगे मागे.

कोष म्हणाले,पुरे आता,
नको व्यर्थ झुरु..

वर बघ ,झालंय कसं,
तिचं फुलपाखरू...

           .🍃संतोष

शब्दचि आले घन बनुनी

ते शब्दचि आले घन बनुनी.
आशय मग झरतो,सर बनुनी....

सरसर ये धनूतुनि तिरांसम.
दुडकत ये अवखळ पोरांसम.

रुद्रापरि कधी वाजत गाजत.
नवयुवती सम कधी ये लाजत.

प्रगट कधी अन् मुग्ध कधी,
ये,अर्थवाही निर्झर बनुनी..

ते शब्दचि आले घन बनुनी.(१).

टपटपल्या " स्मृती" पागोळ्यांपरि.
जळी भिजला हा ऋतुच कळ्यांपरि.

थरथरल्या अधरांवर भाषा.
धरतीची सोज्वळ अभिलाषा.

पुरवी कधी,नुरवी कधी..
ये भूमिवरि अमृत बनुनी.

हे शब्दचि आले,
शब्दचि न्हाले.
शब्दचि धाले.
...घन बनुनी..(२)

                .🍃संतोष

पाऊस 1

सोनसळी नागिणीचा
दंश त्या आभाळा,

भिनला हा ऋतु,अंगी,
जलद सावळा.

धरतीच्या उरीपोटी
पाहुनिया तडे,
मेघ ओते भुईवर
घड्यांवर घडे.

ऐसा दानशूर कोण
आहे खरं सांगा,
साक्षी याला,महावृक्ष,
पर्वतांच्या रांगा.

लहरीपणाचा त्याला
लावू नये टिळा.
चौकटी मोडून ,मुक्त
निसर्गाची शाळा.

रिक्त होऊनिया सांडे
ऐसे त्याचे दान,
मोजती मानव त्याला
एककांमधून.

फुत्कारत्या नागांपरि
इंधनांचे लोळ,
पर्वतांचा खून पडे,
वृक्षांचा कल्लोळ.

ऐशा मानवाला हक्क
आहे तो कितीसा?
आधी कर्तुत्व तपासा,
मग पर्जन्याला पुसा.

पाऊस पडत असताना

पाऊस पडत असताना,
झेलावा अलगद ओला,

अन् स्वत:शीच धरलेला,
मग सोडावा अबोला.

मन म्हणते ,गाऊ गाणे
श्वासांचे होती तराणे,

नाचावे,आपण गावे
धारांत शुचिर्भूत व्हावे.

जो सचैल येथे न्हाला,
थेंबांतून अम्रुत प्याला.

चेहर्यांचे रंग दिखाऊ,
विरघळता,सोज्ज्वळ
झाला.

जन हसले तर मग हसूदे
कुणी रुसले तरीही रुसुदे.

आपुली ओळख आपणाशी,
पटल्यावर मग जग फसूदे.

पाऊस हा नसतो पाणी,
जो फक्त ढगांतून झरतो,

पाऊस हा उत्सव असतो,
जो सरल्यावरीही उरतो.

तो खुणा ठेवतो ओल्या,
अन् शपथा देऊन जातो.

त्या शपथांसाठी पुन्हा,
दरवर्षी फिरुनी येतो.

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...