Monday, May 19, 2025

 नमन मम तव प्रति,...गणपती!

गजानन, हे हेरंब..।ध्रु।


झुणझुणझुण नुपुरनाद।

थिरकतद्वय चपलपाद।

घुणघुणघुण प्रणवनाद।

भक्ती सुरस तव प्रसाद।


मूलाधार, मुळारंभ....।१।


सूक्ष्मद्रुष्टी विचक्षण।

वक्रतुंड रक्तवर्ण।

उदरगुरू शूर्पकर्ण।

करित दुरित विघ्न चूर्ण।


आत्मरूप पूर्णबिंब....।२।


तवप्रकाश,होय प्रकट।

सोम,भौम,रवीही फिकट।

वितळत भव घन तमपट।

क्षीण क्षणिक रजखटपट।


नित्यमुक्त प्रेमकुंभ...।३।


नमन मम तव प्रति।....गणपती!


                                 .🍃संतोष

लता दीदी

 सप्तसूरांच्या आम्रतरुंची 

बने पोरकी,

तालही होई खुळाबावळा,

गुंजन विरले गंधाराचे,

*उडोन गेली आज कोकिळा।*


शतकांमाजी असे कुणीतरी

रसिकजनांच्या साठी येते.

बघता बघता आयुष्याचा

अतूट हिस्सा बनून जाते.


ओळख माझी,स्वर हे माझे

सांगून गेली जी कळिकाळा,

नाद गुंजतो घुंगुरवाळा,

*उडोन गेली आज कोकिळा।*


स्वर जे झरले,अम्रुत झाले.

कान नव्हे,हे प्राण पोसले।

अजून घुमतो मनगाभारा

दिपकळ्यासम सूर तेवले।


स्वरसाम्राज्ञी तुझिया दारी

श्रुतीपुष्पांचा फुले मळा।

अमरचि हा राहील गळा,

*उडोनी गेली जरी कोकिळा।*


          🙏🙏🙏



                                   .🍃संतोष

पाहुणा गोजिरा

 पाहुणा गोजिरा|जीवीचा जिवलग|

ठेवतो सजग| सर्वकाळ||


येई नित्यनेमे|क्षेम देई प्रेमे|

वासना ही शमे|पायी त्याच्या||


कष्ट करि नष्ट|आणि भेद भ्रष्ट|

दुर्गुण हे दुष्ट|घालवितो||


काळमूषकाचा|स्वामी हाच साचा|

सकल सुखांचा|सत्य दाता||


कैसेनि म्हणावे|याला पाहुणा मी?|

सदा अंतर्यामी| सर्वांच्या हा||


उत्सवाकारणे|करी येणे जाणे|

प्रेम देणे घेणे|भक्तांसवे||


एरव्ही हा नित्य|नामसंकीर्तनी|

रमतो भजनी|भाविकांच्या||


द्यावी शुद्ध बुद्धी|नको रिद्धी सिद्धी|

व्हावी भावव्रुद्धी|दिसोदिस||

मेघाचे जांभूळ

 मेघाचे जांभूळ टचकन फुटले,

मोहोळ उठले काळेनिळे.


पिसाट गोंगाट,वार्याचा बेफाट

भरून सांडले नभतळे.


विजेचा हा लोळ,उठला कल्लोळ

सुटले वादळ वेडे खुळे.


थेंबांची झुंबरे हालती डुलती

मौक्तिकांची सर खाली पळे


टपोर थेंबात मिसळे कस्तुरी,

वाहतो सु्वास वायूबळे


नेमाने, प्रेमाने नाचतो पर्जन्य

कित्येक युगे हा कोणा कळे?


मनाची तनाची शांत हो काहीली

त्रुप्ततेचे दान जीवा मिळे.

प्रकाशप्राशी पक्षी

 तेजाळ दिव्याच्या खाली मी प्रकाशप्राशी पक्षी.

मांगल्यमनोहर मार्गी लखलखती सुंदर नक्षी


चंचूच्या पात्री माझ्या रस अर्काचा उतरावा.

पाचूच्या हिरव्या रानी मग माझा व्हावा रावा


कोंदणात झगमगणार्या मोत्यांचे नयनीं पाणी

कंठात कोकीळेच्या जी तैसीच वैखरी वाणी


मी विहंग वनीचा होता,वायूचे पंख फुटावे

नेत्रांत निळ्या निलिमेचे नितनूतन चित्र नटावे


प्राजक्त पहाटेचा जो तैसाच सुवास सुटावा

लवलवत्या पात्यांजैसा स्रुजनाचा कोंब फुटावा


मग व्हावे सोज्ज्वळ गान भक्ती चे अम्रुतपान

त्रुप्तीची विहरो तान क्षणभर विसरू दे भान


सणसोहळाच हो नित्य, सर सौख्याची वरुषावी

ह्रुदयाची घुमता विणा,मग चित्तव्रुत्ती हरुषावी


                                🍃.संतोष

कोजागिरी

 कोजागिरी ची आज पौर्णिमा

मनात चांदणजाई फुले.

फिकट कौमुदीप्रभा मिसळली

पूर्णचंद्र हा मधे डुले.


को जागर्ति इति वदतसे

विष्णुप्रिया रजनी समयी.

क्रुपाद्रुष्टीने न्याहाळून ती

मग आपुल्या सदनी जाई.


आटीव गोरस घालून केशर 

जायफळा किंचीतसा अवसर,

शीतल शशीचे शुभ्रधवल कर

त्यात उतरता प्राशु सत्वर


शरदऋतुचे रुप देखणे

आज निरखूया स्वस्थ पणे

नीरव शांतता त्यात वितळता

सुखालागी मग काय उणे.

 म्हणणं तरी काय तुझं सांग बरं पावसा?

अजून का रे पडतो आहेस यंदा रात्रंदिवसा?


वाहून वाहून तुला झाले मेघही बिचारे

शरद,आश्विन मास गेले विसरून सारे तारे!


माळ्यावरचे रेनकोट,टोप्या आल्या पुन्हां खाली.

मोडक्या तोडक्या छत्र्यांच्याही झाल्या आता ढाली.


गेलास म्हणता येतोस पुन्हा जायचं नाव नाही.

केविलवाणा पावशा पक्षी तोंड चुकवत जाई.


कविता तरी करु कशी लेखणी हातात धरु?

सांगणं तुझं संपत नाही संततधार सुरु.


पाणथळलेले रस्ते सगळेजिकडे तिकडे ओल.

आडोश्याच्या पत्र्यांवरही विनाकारण ढोल.


आता मात्र आळीमिळी,घे मौनाचा वसा!

राहून गेलं पुढील वर्षी बोल बरं कसा!


                                   .🍃संतोष

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...