Saturday, June 27, 2020

पहाट

आली पहाट कोवळी,
केशरानी गंधाळून.
सज्ज फुले,वेली पाने,
दंव मौक्तिक माळून.

शुभ्र मऊ धुक्याच्या त्या,
दुलईत लुप्त वाट.
गिरीमाथे डोकावीत,
धूसरसा दिसे घाट.

थोडा कुंद,तरी धुंद,
शीत मंद, वात वाहे.
चाळवले चराचर,
सृष्टी हळू जागताहे.

स्वप्नचंद्र विरुनिया,
झाला कापूर नभात.
बालरवी करी स्मित,
झाली मंगल प्रभात.

जाई निशा,येई उषा,
किरणांनी दिप्त दिशा.
जागे नवा कार्योत्साह,
नव्या दिनी,नवी आशा.

         .🍃 संतोष

खगांंच्या नभी,चालल्या रम्य पंंक्ती

खगांंच्या नभी,चालल्या रम्य पंंक्ती,
किती आकृतीबंध साकारले।
कुणी त्या दिले ज्ञान,शिक्षा कुणाची?
मिटेना कधी गुण रक्तातले।

पिले कोकीळेची,जरी काकसंगी,
गातात गाणी, मधुरताच अंगी।
जळी मत्स्य पोही,उपजता लीलेने,
प्रतिक्षिप्त क्रिया,घडे सुप्त ज्ञाने.

तशी मानवाला, मिळे स्वप्नदृष्टी।
विचारी मनाला,खुले आत्मसृष्टी।
कृती ही तयाचे असे मूर्त रुप।
जशी ज्याची वृत्ती,तसे त्या स्वरुप।
             
                                .🍃संतोष

आकडे

बातमी तशी ताजी ताजी,
गणिताच्या तव्यावर,
भाषेची भाजी!

बावन्नकशी सोन्याचे,
पन्नास,दोन असे तुकडे,

बत्तीशी काढू नका बरं,
सरळ अर्थ होतील वाकडे.

आकडेमोड की आकडेफोड,
आकड्यांनाच येतेय आकडी,

सरळ रस्ता सोडून मधेच,
कशासाठी वळणं वाकडी?

चांगदेवपासष्ठी म्हणजे काय?
दत्तबावनी पदार्थ काय?

एकवीस मोदक मोजायचे कसे?
आपलेच व्हायचे पोरात हसे!

पाढे पढवून होतात पोपट?
शिक्षा सोडाच,वर्ज्य चापट!

नवीन वर्ष,नवीन युक्ती,
पोरांमाथी शिक्षण सक्ती!

शिक्षण नावाची नवरीच नकटी,
करायचयं खरंच लग्न?

दहा वीस लाख हुंडा हवा,
नाहीतर सत्राशे विघ्नं !

                     .🍃संतोष

प्रवास पक्षी

बरसत असता,पाऊसधारा,
मन माझे जणू प्रवास पक्षी.

कुडकुडणारा देह चिंबसा,
इवल्या नेत्री,तुषारनक्षी.

नको नकोसा ओलेता क्षण,
अंगी बिलगता,हवाच वाटे.

विस्कटलेल्या पंखांमधुनी,
जुन्या स्मृतींचे रेशीमकाटे.

संकोचाचा टिचभर पडदा,
गेला फाटून निवले लोचन.

हजार नेत्रांतुनी निखळले,
सर मोत्यांचे गेले शिंपून.

एकच घटिका,अमृतघुटका,
प्राशुनी परि हे नवसंजीवन,

पुन्हा अनामिक,अनंत व्योमी,
नव्या प्रवासाचे आवाहन.
             
                  .🍃संतोष

Tuesday, June 23, 2020

सांग नरा रे

सांग नरा रे इतुके भोगून,
अजुनी कसा हा जीव उपाशी?

किती शोषल्या नाही गणती,
तरी तुझी का नजर अधाशी?

किती कळ्यांनी फुलण्या आधी
 मूकपणे अंगार झेलले,

किती जिवांनी खेळ त्यागूनी,
पोक्त तुझे संसार पेलले.

त्यागून असले पौरुष घे रे,
मांगंल्याची जोडुन नाती,

नात्यांतील उज्ज्वल उर्जेने,
विझणार्या उजळव त्या ज्योती.

कधी वाटते ही तर वृत्ती,
नाही तिजला लिंगभावना.

जेथे विकृत घुसमट तेथे,
जळमटते उपभोग वासना.

अद्वैताचा पडुनी पाऊस,
देहखुणा मनीच्या निवळाव्या.

नाद वेणुचा पुनश्च ऐकून
गाई आपुल्या घरी वळाव्या.

                 . 🍃संतोष

Thursday, June 4, 2020

कविंची चाळिशी

जे न देखे रवी ते आम्ही पाहतो.
असा माज आम्ही उरी वाहतो!

असा माज त्याचे शिरी होत ओझे
पळे चालली श्वास आयुष्य मोजे.

दिले जे तीने, ते, तिचे ऋण बाकी!
भरु  रिक्त प्याले श्रमे मुर्ख साकी.

फुटेना तरु पालवी म्लान झाली,
कितीदा तुरे व्यर्थ छाटायचे.

जुन्या फांदीला बांधू ग्रीष्मात झोके,
उगा हेलकावे किती घ्यायचे?

अकाली पिके त्या फळां नाही गोडी
तरी ताजवे धूर्त तोलायचे?

नसे गायनाची कळा ती गळ्याते,
तरी घोकले काही रेकायचे!

आम्हा पुर्वजांची मिळालीत काही
तारांगणे खेळण्या आयती.

तिथे शोधू तारे जुने अन् निनावी
करु सर्व ग्रंथालये पालथी.

आताशा कवींना छळे चाळीशी
विशींचे उमाळे पुढे आळशी!

परि साथ देते जुनी मान्यता.
हसू ओळखीचे! मिळे धन्यता.

असे धन्य जगणे! चकाकीत चकणे!
बुडाला रवी अन् फिके चांदणे.

                             . 🍃संतोष

क्षण सुचण्याचा

क्षण सुचण्याचा जणु स्फोटासम
परि चांदणे त्यातून फुटते.

मौनमिठी मन सोडून उठते,
खूण पुन्हा पुर्वीची पटते.

स्फोटच! पसरे परि शांतता
शितल शामल शब्दशहारा.

गाफील होतो तर्क जरासा
उठे तयाचा शिष्ट पहारा.

या स्फोटांच्या जखमांमधुनी
स्रवते अत्तर घाव मखमली.

गंध दरवळे धूपाचा अन्
तेजातच ती जाणीव लपली.

ह्या स्फोटांतून होते क्रांती.
युद्ध चळवळी मागून येती.

इथेच विरतो कोलाहल अन्
इथेच मिळणे अंती शांती.

ज्यांना झाले घाय इथे ते
शूर शिपाई मनसीमेवर.

हेच सुरेश्वर अन् लयसागर
गाणे यांचे अचूक समेवर.

नियमित नेमिक अन् चौकोनी
चाकोरीचे जे अभिमानी.

घायाळांचे तुम्हा आवाहन
एक तरी घ्या घाव ईमानी.

क्षण सुचण्याचा आला गेला
छेडून दीड दा शब्द सतारी

स्पंदन उरले तेच गुंजते
पुनःप्रत्यये साक्षात्कारी!

                              . 🍃संतोष

भूत भयाचे

भूत भयाचे भूतांपाठी
भूतदया ना भूतकाळाला.

भीतभीत ते भविष्य भेटे
क्वचित कधी ये सौख्य गळाला.

आले म्हणता जळी पळाले
दुःखसागरी ते मीनासम.

चरफडणाऱ्या हातांसंगे
पुन्हा नव्याने तोच दिनक्रम.

टीचभर पोकळ खोळ भराया
आयुष्याच्या रित्या ओंजळी.

क्षण सोन्याचे अवतीभवती
कधी न दिसले, चाल आंधळी.

भिरभिर पक्षी, निळ्या नभाचा
थांग शोधती म्हणुनी वेडे?

चकवाचांदण मनी तुझ्या रे
विकारवेलींचे त्यां वेढे.

बुद्धी म्हणते म्हणून शहाणा
पोर मानवी परि अर्धवट.

अर्ध्या हळकुंडाने पिवळा
डुचमळणारा अर्धा हा घट.

फुंकर येता पडती पत्ते,
कुठे बंगला कुठे इमारत.

स्वप्नमनोरे चढणे पडणे
जीवघेणी ही उगाच कसरत.

अमृतभरल्या तळ्यात पोही
अन् घाबरतो बुडीन म्हणोनी.

स्वप्ने बघतो आगबोटीची
वाट पाहुनी जात शिणोनी.

कीट अडकती जाळ्यामाजी
कोळी त्यातून निवांत फिरतो.

आपले जाळे आपण विणावे
जीव जिथे स्वच्छंद विचरतो.

जगलो म्हणता येण्याजोगी
एकतरी खूण उरी असावी.

जरा वृद्धपण मग चंदेरी
मिरवीत मरणा वाट पुसावी.

                         . 🍃संतोष

ख्वाईश

गुमसुमसी मनके किनारे खडी थी.
सूकूं के लम्होंकी वो ख्वाईश अकेली!

उसे अब अचानकसे मिलनेको आयी
सपनोंकी कश्ती मे ,नीली सहेली!

था फैला अंधेरा,कोहरा घना था
बहाने बहुत हमने उसमे पिरोये.

अभी ये घडी आ गयी जब मिलनकी
छाने लगे, बेरुखीके वो सांये!

वहां दूर, मजबूर, मजदूर पैदल.
कल का उठाये हुएं बोझ जाये.

छत है,गरम जेब, मुझको सताये
तनहा पलोंकी ये खाली घटांये.

जो है वो नहीं, जो नही उसको मांगे
अजब मनका बच्चा है कितना हटीला

पूरब चले कौम, पश्चिम को भागे
कभी साथ चलता, कभी ये अकेला.

नेता यूं बातोंमे उलझे हूए है,
कल का वो सूरज, है किसके हवाले?

बातोंकी कश्ती है, बातोंकी नदीयां
यहां तेज तैराक किसको बचाले?

बडा पेचिदा है सवालोंका ताला
न चाबी, न हल, ये तो मुश्किल समा है

चलो दिल को सहला सके उसको माने
सच तो है कडवा, जमाना थमा है!

हर इक आंसू पोंछे
हर इक गुल हो खिलता
मुन्कीन नहीं ये तो सपना सुहाना.

चलो अब टटोले जो है टोकरी मे
गया वो फसाना! है फिरसे कमाना.

                                . 🍃संतोष

माझ्या कवितेच्या शिरी

माझ्या कवितेच्या शिरी
नको किरीटकुंडले.

नको लौकिककुंकुम
नको शिरपेच, फुले.

नको पायांत पैजणे,
नको जोडव्याचा काच.

नको मदाऱ्याच्या पुढे
मिंध्या मर्कटाचा नाच

नको प्रवासाला तिच्या
रुढ आखलेली वाट.

कधी होऊ नये तिने
कुण्या दरबारी भाट.

परि माझ्या गणराया
तुला एकच मागणे.

जिथे प्रसवती शब्द
तेथे येऊन रहाणे.

शिरी वत्सल रहावा
नित्य हात शारदेचा.

मूढ वैखरीत माझ्या
अंश रुजावा परेचा.
                               . 🍃संतोष

वळीव (१)

ऊन जाळते माध्यान्हीचे
वैशाखाला फुटली उकळी

दाहक होतो वारा देखील
मलूल झाली तृणे कोवळी.

धगधगत्या रवीकुंडामाजी
होम चालला उठती ज्वाळा.

चढला पारा दिशा तापल्या
चरमसीमेवर उभा उन्हाळा.

या रणरणत्या शापझळांना
वळीवाचा उःशाप हवा,

गजमेघांच्या शुंडांमधुनी
धरणीला अभिषेक हवा.

हलता पात्रे नभभुमीवर,
वळीव आला तो धुसमुसळा.

गेला नाचून जीवन शिंपुन
आला, गेला, सरे सोहळा.

स्वल्प दिलासा, पुन्हा काहीली,
परंतु हाती, ओलेते क्षण!

वर्षाराणी येईल तोवर
असेच ठेवू हे सांभाळून..

                             . 🍃संतोष

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...