तो वळीव चाहूल देतो,
सूर्याचे झाकून डोळे,
अन् हुंबदांडगा वारा
गडबडा भुईवर लोळे.
गरगरा,धरुनिया फेर
पानांचे रिंगण नाचे,
वेलींची सुटता वेणी
कर सावरती शाखांचे.
ती डोलडोल करणारी,
जणू माड तान्हुली बाळे,
तो जोजवणारा वारा,
मेघांत स्तन्य हिंदोळे.
नभ गच्च दाटूनि आले,
अन भरले त्याचे डोळे,
मेघांचे काजळ काळे,
मग मुखभर माखून गेले.
टपटपती थेंब टपोरे,
जणू व्रात्य हूडशी पोरे,
वाऱ्याच्या दोऱ्यांवरचे,
धरतात धुळींचे भंवरे.
धडधडा धडकती धारा,
तडतडा ताडिती गारा,
सळसळता पर्णपिसारा,
धुळभेट घेतसे वारा.
भय दाखविता ती चपला,
दचकून पाहती सारे.
परि धरा म्हणे धीराने,
हे सरेल नाटक सारे.
हा धुसमुसळा धिंगाणा!
लय माझ्या उदरी आहे,
आवेश,खेळ हा लटका,
घटका दो घटका आहे!
हे शमतील वादळवारे,
अन् उरतील धूळपसारे,
हा वळीव,दूत वर्षेचा,
दे चाहूल,तिज पाचारे.
.🍃संतोष
No comments:
Post a Comment