Monday, April 27, 2020

फुंकर

             
पहिली फुंकर देव मारितो
प्राण उठे देऊन आरोळी.

रडण्याने हसताहे कोणी
स्तन्य दाटते!क्षोभ नसावा!

फुंकर घाली घास निवाया
लेकुरवाळी कुणी माऊली.

तशीच फुंकर ऊन सुखावर
देव मारितो,धीर धरावा!

फुंकर मारुन चुल चेतवी
सुगरण कोणी पाक कराया

तशीच फुंकर विपरिततेची
निग्रह अग्नी तीव्र करावा!

फुंकर घुमवी शंखनाद तो
मंगलमय मंदिर गुंजते.

ध्येयपथावर गुरुवाक्याचा
तसाच कानी मंत्र घुमावा!

फुंकर वाहे मुक्त वायुची
कलिकागाली गोड खळीतुन.

तसाच उन्मेषाचा वारा,
नाविन्याच्या बनी फिरावा!

फुंकर खेळे चपळ, वेणुतून
रंध्रांतून थरथरती सृजने.

तसा मोकळ्या मनवेणुतून
मुक्त मारवा मग ऐकावा!

जाते फुंकर शेवटची ती
दूर प्रवासाच्या ओढीने

तोवर पल्ला गाठून आपला
दीप स्वतःचा तो उजळावा.

                            . 🍃संतोष

Monday, April 13, 2020

संधीकाल



सांजसाउल्या सरकत आल्या
क्षितिजावरचे पिऊन केशर

दूर आक्रुती पैलतटावर
सख्या तुझी रे निवळे धूसर

व्योमपटी मेघांच्या वक्षी
रेखीत पक्षी,पळती नक्षी. 

मनी मारवा झिरपत राही
शुक्रचांदणी पश्चिम कुक्षी

बटांत खेळुन जाई सांगून
तवमिलनाचा निरोप वारा. 

किती युगे मी वाट पाहते
रोज मांडुनी संधीपसारा. 

जोवर जागी जुनी आठवण
जोवर नेत्री दीप आशेचे

तोवर ये रे ऐलतटावर
भय मजला निष्ठुर निशेचे.

होईल अंबर झुलते झुंबर
चांदणचांदी वर्ख माखुनी

कुठले मिलन भुलता स्वप्नी
जाईल निद्रा वेस आखुनी

सरले यौवन थकली गात्रे, 
सर्व रिकामी माझी पात्रे.

ये रे आता पुसण्याआधी
संधीकालची व्याकुळ चित्रे.

                             . 🍃संतोष

Thursday, April 9, 2020

पवन पाहुणा

पवन पाहुणा टकटक दारी,
करुनी विचारी, आत येऊ का?

बावरली ती गवाक्षद्वारी!
आणि म्हणे, मी दार लावू का?

त्याची खटपट फटीफटीतून
कडीकोयंडा हलवून पाही

भिरभिर चाहूल चहूबाजूंनी
जरा जीवाला उसंत नाही.

कुणी म्हणे, आला तर आला!
पाहुणाच तो!फिरेल मागे.

उरांत धडधड घेऊन का गं
असे पाहसी रागे रागे!

"तुज ना माहीत खोड तयाची
पुरती आहे मी हे जाणून."

येईल, जाईल, स्वच्छंदी तो!
परि मनी दर्या येई उधाणून.

घुसळून आठव स्म्रुतींचे ताटव
विसळून क्षण ये स्वप्नी उसळून

 मीपण वितळून जाईन मी त्या
 नादावून नादांते मिसळून.

म्हणून टाळते मजला भिती
नव्हेच त्याची परि इतरांची.

काय बहाणे सांगू कोणां
विस्कटता घडी निजवस्त्रांची.

वाट पाहते त्या दिवसाची
लाजफुले गळतील पायाशी.

तनमन सारे उधळून त्याला
एकत्वे कवळीन ह्रदयाशी!

                              . 🍃संतोष

Monday, April 6, 2020

वहाणा

माझ्या दारातले तुझे
तळ झिजलेले जोडे
करी हळवे उगाच
मना आठवांचे वेढे.

काय असेल उमर
किती कापले अंतर?
किती काटे किती फाटे
कीती कर्दमाचे थर.

किती तुडवली राने,
किती घाटांची वळणे.
किती दगडांची ठेच,
किती ओलांडली बने.

किती रापले तापले
बंध बंदांचे ईमानी.
नाही डगमगू दिली
तुझी चाल स्वाभिमानी.

रुप ओबडधोबड,
अंगी खिळे टोचखुणा.
कसा शोभावा शेजारी
कुणी राजस देखणा.

म्हणे अशी अडगळ
ठेवू नयेच घरात
असे सूचनाशिंतोडे
येताजाता उडतात.

खरे आहे! का गुंतावा,
माझा निर्जीवात जीव.
जाता जीव ओलांडून
जीर्ण शरीराची शीव.

जरी पटते बुद्धीला
परि धजावेना मन.
वाटे करारी पाऊल
पुन्हा येईल चालून.

माझ्या पायी शोभतात
मऊशार पादत्राणे.
किती रंग रुप कळा
नामवंत ती निशाणे.

वाट खुणावे दूरची
देते धावण्या आव्हान.
उरी आशेचा समुद्र
होते चालही बेभान.

परि ठाकता समोर
पुढे निसरडी वाट,
चुके काळजाचा ठोका,
सुटे निग्रहाचे बोट.

तेव्हा डोळ्यांपुढे येती
तुझ्या व्रुद्धशा वहाणा.
येतो भुलण्याचा गांव
तरी पाऊल चुकेना!


                             . 🍃संतोष

 नमन मम तव प्रति,...गणपती! गजानन, हे हेरंब..।ध्रु। झुणझुणझुण नुपुरनाद। थिरकतद्वय चपलपाद। घुणघुणघुण प्रणवनाद। भक्ती सुरस तव प्रसाद। मूलाधार, ...